कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यामध्ये हाळेबीडू नामक गाव जरी फार मोठे नसले, तरी दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये या गावाला अनन्यसाधारण महत्व आहे. हे ठिकाण एके काळी होयसाळा वंशाची राजधानी म्हणून नावारूपाला आले होते.
आजच्या काळामध्ये अस्तित्वात असलेला कर्नाटक राज्याचा बहुतेक प्रदेश आणि आंध्र प्रदेश व तमिळ नाडू या राज्यांचा काही प्रदेश एके काळी होयसाळा वंशाच्या अधिपत्याखाली होता. अकराव्या ते चौदाव्या शतकाच्या काळा दरम्यान होयसाळा वंश येथे राज्य करीत होता.
होयसाळा साम्राज्य अतिशय वैभवशाली असून, त्या वैभवाची साक्ष देणारे हाळेबीडू येथील होयसाळेश्वर मंदिर तत्कालीन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना म्हणता येईल.
हळेबीड इतिहास:-
हळेबीडु किंवा हळेबीड हे कर्नाटक राज्यातील हासन जिल्ह्यातल्या बेलूर तालुक्यातील एक गाव आहे. हे हळेबीडु इ.स. बाराव्या शतकातील होयसाळ साम्राज्याची राजधानी होती. या गावात होयसाळ शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली श्री होयसाळेश्वर आणि श्री केदारेश्वर मंदिरे आहेत. याचे पूर्वीचे नाव द्वारसमुद्र असे होते.
अल्लाउद्दीन खिलजीचा सेनानी मलिक काफुर याने हे गाव दोन वेळा उध्वस्त केले, म्हणून याला तुटलेले-फुटलेले गाव म्हणजेच कन्नड भाषेत हळेबीडु असे म्हटले जाते.
होयसाळ हे देवगीरीच्या यादव वंशातील होते. हळेबीडु ही इ.स. १२ व १३ व्या शतकात होयसाळ साम्राज्याची राजधानी होती.
हळेबीडु पर्यटन प्रेक्षणीय स्थळे:-
श्री होयसाळेश्वर
होयसळेश्वराचे मंदिर बिट्टिदेव ऊर्फ विष्णुवर्धन (कार. १११०–५२) याने साधारणतः इ. स. ११४१–५० दरम्यान बांधले असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे मंदिर द्विकूट (दोन गर्भगृहे) पद्धतीचे जुळे मंदिर असून सुरुवातीस होयसळेश्वर व त्याच्या शेजारी शांतलेश्वर अशी दोन स्वतंत्र मंदिरे होत यांचे मंडप जोडून ती एक केली गेली. या दोहोंची मिळून लांबी ४५.५ मी., रुंदी ३६ मी. आणि कपोतापर्यंतची उंची ७.५ मी.आहे. याचे शिखर अस्तित्वात नाही, मात्र मंदिराला पूर्वेस दोन आणि दक्षिणोत्तर प्रत्येकी एक अशी चार प्रवेशद्वारे आहेत.
श्री केदारेश्वर
केदारेश्वर हे येथील कालौघात पडझड झालेले दुसरे मंदिर. ते त्रिकूट (तीन गर्भगृहे) पद्धतीचे असून दुसरा बल्लाळ (कार. ११७३–१२२०) आणि त्याची कनिष्ठ राणी अभिनव केतलदेवी यांनी १२१९ मध्ये बांधल्याचा उल्लेख शिलालेखात मिळतो. ते सोमनाथपूरच्या चेन्नकेशव मंदिराप्रमाणेच असून कलात्मक दृष्ट्या होयसळ वास्तुशिल्पशैलीतील माणिक मानण्यात येते
श्री शांतालेश्वर व दिगंबर जैन मंदिरे
हळेबीडपासून पाऊण किमी.वर बस्तीहळ्ळी नावाचे एक स्थान आहे. त्या ठिकाणी तीन जैन बस्त्या असून त्यांतील पार्श्वनाथ बस्ती गोलाकार आणि अत्यंत गुळगुळीत आरसपानी स्तंभांकरिता प्रसिद्ध आहे. तिच्यातील काळ्या वालुकाश्मात घडविलेली पार्श्वनाथाची मूर्ती सु. चार मी. उंच आहे. मधल्या बस्तीत आदिनाथ आणि शेवटच्या बस्तीत शांतिनाथ यांच्या मूर्ती आहेत. होयसळांच्या राज्यात राजघराण्यातील स्त्री-पुरुषांनी व त्यांच्या मंत्र्यांनी बांधलेल्या सु. ७२० जैन बस्त्या असल्याचे उल्लेख आढळतात. शतकादरम्यान होयसळ राज्याची राजधानी असलेल्या हळेबिडू पारिसरामध्ये जैन लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती.
केदारेश्वर व होयसळेश्वर मंदिराबरोबरच तीन जैन मंदिरांची उभारणीही येथे करण्यात आली. राजा विष्णुवर्धन जैन होता. परंतु त्याने हिंदू संत रामानुजचार्य यांच्या प्रभावाखाली वैष्णव धर्मात प्रवेश केला; मात्र त्याची पत्नी शांतलादेवीने मात्र जैन धर्म सोडला नाही.
जैन मंदिरांपैकी पार्श्वनाथ मंदिर हे त्यातील सुंदर नवरंग हॉल आणि खांबावरील उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. १८ उंचीची पार्श्वनाथाची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य. यक्ष आणि पद्मावतीची इतर सुंदर शिल्पे येथे आहेत. जवळच संग्रहालय आहे. तेथे अनेक पुरातन वस्त्यांचा ठेवा जपून ठेवला आहे. हे सगळे काही वर्णन करता येणार नाही एवढे सुंदर आहे.
पुराणवस्तु संग्रहालय
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे येथे एक पुराणवस्तुसंग्रहालय (१९६१) असून त्यात परिसरातील भग्न मंदिरांचे अवशेष जतन केले आहेत. याशिवाय ब्राँझ व काष्ठशिल्पे, भूर्जपत्रे, प्राचीन हस्तलिखिते, नाणी, ताम्रपट व काही शिलालेख यात असून या संग्रहालयातील नृत्यगणेश, ध्यानमग्न सरस्वती, दुर्गा, महिषमर्दिनी, तांडवनृत्य करणारा शिव अशी काही शिल्पे लक्षणीय आहेत. येथील संग्रहालय प्रसिद्ध असून त्यात पुरातत्त्वविद्या व वस्तुसंग्रहालयशास्त्रविषयक सुसज्ज ग्रंथालय आहे.
तेथील शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. इ.स. १४ व्या शतकात मलिक काफुरने हे नगर उद्धस्त केले.
कधी जाल:-
राहण्याची व्यवस्था चांगली आहे. कर्नाटकातील इतर ठिकाणांच्या तुलनेत येथील हॉटेलचे दर माफक आहेत. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी.
कसे जाल:-
हाळेबीडू या ठिकाणी असलेले होयसाळेश्वर मंदिर हसन शहरापासून तीस किलोमीटर, आणि बंगळूरू शहरापासून २१० किलोमीटर अंतरावर आहे.
विमानसेवा:-
बेंगळुरू - २१०किलोमीटर.
रेल्वे सेवा:-
भारतातील सर्व मोठ्या शहरांतून हसन पर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहेत.बंगळूरू, हुबळी,पुणे-मुंबई येथून हसनपर्यंत रेल्वेसेवा आहे.
रस्ता सेवा:-
हसन ३२ किलोमीटर. म्हैसूर ते हळेबिडू - १५० किलोमीटर.
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा