गोव्याच्या दक्षिणेला १५ कि.मी.अंतरावर असलेले कारवार हे कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून अरबी समुद्राच्या कडेला व काली नदीच्या मुखाजवळ वसलेले लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
टिपिकल कोकणी गावाप्रमाणे दिसणारे कारवार हे आपली संस्कृती,परंपरा,बोलीभाषा व राहणीमान यामध्ये वेगळेपणा जपून आहे.इथले स्वच्छ समुद्रकिनारे,प्राचीन मंदिरे,धबधबे व खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल तर कारवारला नक्कीच भेट दिली पाहिजे.
कारवारची स्थापना सन १८५७ च्या उठावानंतर इंग्रजांनी केली.यापूर्वी इथे काजुबाग,कोडीबाग,हब्बुवाडा,काठीकोन,सुनकेरी,शिरवड,बिंगा अशा लहान-लहान वस्त्या होत्या.
होन्नावर हे कॅनरा जिल्ह्याचे मुख्यालय होते ज्याचा विस्तार काली नदीपासून मंगलोर पर्यंत होता.
पोर्तुगीज आणि ब्रिटीश काळात कारवार हे एक बंदर म्हणून प्रसिध्द होते.कपडा,मसाल्याचे पदार्थ इत्यादींची निर्यात या बंदरातून होत असे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कारवार जवळील सदाशिवगड ताब्यात घेतला होता.कालांतराने सदाशिवगड सह कारवार इंग्रजांच्या ताब्यात गेले.
सन १८८२ मध्ये प्रसिध्द कवी रवींद्रनाथ टागोर कारवार इथे वर्षे राहिले होते,त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे या ठिकाणी न्यायाधीश होते.
कारवार मधील पर्यटन स्थळे :
रवींद्रनाथ टागोर बीच
हा कारवार मधील प्रसिध्द बीच असून नेहमी पर्यटकांच्या गर्दीने भरलेला दिसून येतो.काली नदीच्या संगमाजवळ असलेला हा बीच निसर्गसंपन्न व स्वच्छ आहे.या बीच वर कोणत्याही जलक्रीडा करता येत नसल्या तरी सायंकाळी व सकाळी शतपावली करण्यासाठी लोक या बीच ला पसंती देतात.या बीच वरून दिसणारा सूर्यास्त अविस्मरणीय असतो.
दरवर्षी डिसेंबर,जानेवारी महिन्यात आयोजित केला जाणारा कारवाली उत्सव या बीच वर आयोजित केला जातो.चार दिवस चालणारा हा उत्सव उत्तर कन्नडा जिल्ह्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतिक असतो.सायंकाळच्या वेळी या बीच वर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते,ज्यामध्ये कारवारी संस्कृती व लोकजीवनाची झलक पाहायला मिळते.
युद्धनौका संग्रहालय
कारवार मधील रवींद्रनाथ टागोर बीच जवळच असलेले युद्धनौका संग्रहालय पर्यटकांसाठी पर्वणी ठरते.सन १९७१ च्या भारत-पाक युद्धात भाग घेऊन पाकिस्तानच्या कराची बंदरा पर्यंत धडक मारून कराची बंदर उध्वस्त करून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा घेतलेल्या आय.एन.एस.चपल (I.N.S.Chapal) वरील नौसैनिकांना २ परमवीर चक्र आणि ८ वीर चक्र देऊन गौरवण्यात आले होते.
५ मे २००५ रोजी या युध्दनौके ला भारतीय नौदलातून सन्मानाने निवृत्त करण्यात आले व कारवारच्या रवींद्रनाथ टागोर बीच वर युद्धनौका संग्रहालय म्हणून जतन करून ठेवण्यात आले आहे.
पर्यटकांना या युद्धनौकेच्या बाह्यांगा बरोबरच अंतरंगात जाऊन पाहता येते.आतमधील शस्त्रास्त्रे,इंजिनरूम,नौसैनिक व अधिकारी यांच्या खोल्या,स्वयंपाकगृह इत्यादी बाबी पाहता येतात,तसेच या युद्धनौकेच्या संपूर्ण माहितीची व भारतीय नौदलाच्या कार्याची माहिती देणारी १५ मिनिटांची ध्वनिचित्रफिती दाखवली जाते.
आय.एन.एस.चपल (I.N.S.Chapal) युद्धनौका पाहण्याच्या वेळा: सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० व दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.००
देवबाग बीच
कारवार मधील देवबाग बीच हा अत्यंत लोकप्रिय असा बीच असून भारतातील सर्वात सुंदर व निसर्गरम्य व कारवार मधील आवर्जून पाहण्यासारखा बीच आहे.कारवारच्या बस स्थानकापासून ८ कि.मी.अंतरावर काली नदीच्या उत्तरेला हा बीच आहे.
सोनेरी वाळू व स्फटिकासारखे शुभ्र निळसर पाणी हे या बीच चे वैशिष्ठ्य आहे.प्रसिध्द कवी रवींद्रनाथ टागोर हे ही या बीच च्या सौंदर्याच्या प्रेमात पडले होते.या बीच वर अनेक वॉटर स्पोर्ट्स चा आनंद घेता येतो जसे की,फिशिंग,स्नोर्कलिंग,स्पीडबोट राईड,बनाना बोट राईड,कयाकिंग,पेरासेलिंग इत्यादी.
या बीच वरून काली नदीमध्ये हाउसबोट राईड करता येते.तसेच बीच जवळच्या जंगलात पायी फिरता येते.
कारवार बीच
कारवारच्या बस स्थानकापासून १ ते १.५० कि.मी. अंतरावर असणारा हा बीच कारवार चा प्रमुख बीच म्हणून ओळखला जातो.
कारवार ला आलेले पर्यटक या बीच वर निवांतपणे सुट्टीचा आनंद घेताना व आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना पाहायला मिळतात.या बीच वरून दिसणारा सूर्यास्त विलोभनीय असतो.
कारवार बीच वर लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी,संगीत कारंजी,मत्स्यालय,टोय ट्रेन इत्यादी बाबी आहेत.तसेच समुद्रस्नान करण्यासाठी हा बीच सुरक्षित व इतर सोयींनी युक्त आहे.
माजली बीच
कारवार जवळ असलेल्या माजली गावानजीक असलेला बीच पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय असणारा बीच आहे.कारवार पासून १० कि.मी.अंतरावर हा बीच असून सुट्टी घालवण्यासाठी अत्यंत उत्तम आहे.
या ठिकाणी अनेक बीच रिसोर्ट असून आरामदायी राहण्याची सोय व स्वादिष्ट जेवण यासाठी प्रसिध्द आहेत.अनेक पर्यटक शहरी जीवनातून थोडा वेळ स्वतः साठी काढतात व या बीच वर आराम करतात.इथे अनेक वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत,तसेच जवळच जंगल असल्याने अनेक प्रकारचे पक्षी येथे पाहायला मिळतात.
सदाशिवगड
काली नदीच्या उत्तरेला असणारा सदाशिवगड हा कारवार नजीक काली नदी व अरबी समुद्र यांच्या मुखावर असलेला ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो.
आजही हा किल्ला सुस्थितीत असून पर्यटक आवर्जून या किल्ल्याला भेट देतात.
सन १५१० मध्ये पोर्तुगीजांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कारवार बंदरच्या संरक्षणासाठी या किल्ल्याचे महत्त्व लक्षात आले.कारण त्याकाळी कारवार हे अत्यंत मोठे बंदर होते व या बंदरातून सुती वस्त्रे व मसाल्याचे पदार्थ युरोपीय देशांना निर्यात होत असत.
२१ फेब्रुवारी १९६५ रोजी दक्षिण स्वारी वरून परतताना शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला होता.
या किल्ल्याच्या वाटेवर अत्यंत जुने असे शांतादुर्गा देवीचे मंदिर आहे.किल्ल्या पाहण्यासाठी १ ते २ तास लागतात.या किल्ल्यावरून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
खाद्य संस्कृती
कारवारच्या खाद्य संस्कृतीवर पोर्तुगीज आणि कोकणी चा समान प्रभाव दिसून येतो.जवळच असलेल्या गोवा व महाराष्ट्र या राज्याच्या खाद्य पदार्थापेक्षा व कर्नाटकी खाद्यपदार्थापेक्षा कारवारी खाद्यपदार्थ आपले वेगळेपण जपून आहेत.
भात,ओला नारळ व विविध प्रकारचे मासे हे कारवारी जेवणातील प्रमुख घटक असतात,परंतु दररोज च्या जेवणात शेवग्याची शेंग,वांगी,पालेभाज्या,डाळी तसेच काकडी,कैरी व विविध मसाल्याच्या पदार्थांचा वापर होतो.
नारळ व नारळाचे दुध हे कारवारी भाज्यांना एक अफलातून चव देतात,व सर्व शाकाहारी व मांसाहारी पदार्थांमध्ये नारळाचा भरपूर वापर केला जातो.
राहण्याची सोय:-
कारवार हे कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील पर्यटन स्थळ असल्याने वर्षभर पर्यटक कारवार ला भेट देण्यासाठी येतात.कारवारमध्ये लो-बजेट ते हाय बजेट मधील सर्व प्रकारची हॉटेल्स उपलब्ध आहेत.
कधी जाल:-
कारवार हे कर्नाटकच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या तटावर असलेले लहानसे पर्यटन स्थळ असल्याने इथले हवामान दमट प्रकारचे असते.पर्यटनाच्या दृष्टीने नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कारवार पर्यटनासाठी उत्तम ठरतो.या काळात हवा आल्हाददायी असते.मार्च ते मे हा कडक उन्हाचा असतो,तर जून ते ऑक्टोबर या काळात भरपूर पाऊस पडतो.
कसे जाल:-
विमाना सेवा:-
कारवार साठी सर्वात जवळचा विमानतळ गोवा येथील दाबोलीम हा असून ७१ कि.मी. अंतरावर आहे.गोवा हे देश-विदेशातील प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडले गेले आहे.तसेच हुबळी विमानतळ (१६९ कि.मी.),बेळगाव विमानतळ (२३५ कि.मी.) व मंगलोर विमानतळ (२६९ कि.मी.) हे अन्य विमानतळ कारवार साठी नजीकचे आहेत.
रेल्वे सेवा:-
कारवारला रेल्वेने जाणे हा अविस्मरणीय असा अनुभव ठरतो,कारण मुंबई-मंगलोर या कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणे म्हणजे निसर्गप्रेमी लोकांसाठी पर्वणी ठरते.कारवार येथे कोकण रेल्वेमार्गावरील स्थानक असून देशातील नवी दिल्ली,मुंबई,बंगलोर,म्हैसूर,चेन्नई,कन्याकुमारी,तिरुवनंतपुरम,इत्यादी प्रमुख शहरांशी रेल्वे सेवेने जोडले गेले आहे.
रस्ता सेवा:-
कारवार हे रस्ता मार्गाने सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेले असून गोव्यापासून ८६ कि.मी, बेळगाव पासून १७१ कि.मी.पुण्यापासून ५११ कि.मी.व मुंबई पासून ६५४ कि.मी.अंतरावर आहे.
मुंबई,पुणे कोल्हापूर या शहरातून कारवार साठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसेस नियमित सेवा देतात.तसेच अनेक खासगी आरामबसेस मुंबई,पुण्यावरून कारवार साठी प्रवासी वाहतूक करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा