भारतातील मुख्य पर्यटन राज्यामध्ये कर्नाटक चौथ्या क्रमांकावर असून भारतीय व विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.भारतातील सर्वात जास्त प्राचीन संरक्षित स्मारके कर्नाटक राज्यात आहेत.
निसर्ग सौंदर्य आणि प्राचीन वारसा यांचा अनोखा संगम कर्नाटक राज्यामध्ये पाहायला मिळतो.सुंदर समुद्रकिनारे,जैवविविधतेने नटलेली अभयारण्ये,प्राचीन इतिहासाच्या खाणा-खुणा,धबधबे,किल्ले सर्व प्रकारची पर्यटन स्थळे या राज्यात आहेत.
कन्नड या प्रमुख भाषेबरोबरच तमिळ,मलयालम,मराठी,कोकणी या बोलीभाषा काही प्रमाणात कर्नाटक मध्ये बोलल्या जातात.आहार,विहार व संस्कृती मध्ये विविधता पाहायला मिळते.
कर्नाटक ची राजधानी असलेले बंगलुरू हे शहर ‘गार्डन सिटी’ म्हणून ओळखले जातेच,पण भारताची “सिलिकॉन व्हॅली” म्हणूनही ओळखली जाते.भारतातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान उद्योग बंगलुरू मधून चालतात.
दरवर्षी बंगलुरू ला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.त्याच बरोबर हम्पी मधील विजयनगर साम्राज्याचे अवशेष,कुर्ग या थंड हवेच्या ठिकाणची सहल,किंवा म्हैसूर चा राजवाडा अथवा बांदीपूर चे अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये पर्यटनासाठी खूप काही आहे.
कर्नाटक प्राचीन इतिहास :-
कर्नाटक ची भूमी प्राचीन इतिहासाची साक्षीदार आहे.सिंधू संस्कृती मधील हडप्पा येथील उत्खननात जे सोने सापडले ते कर्नाटक च्या खाणीतून काल्याचे पुरावे आहेत.मौर्यांची सत्ता येण्यापूर्वी कर्नाटकचा प्रदेश नंद घराण्याच्या ताब्यात होता.त्यानंतर सातवाहन,कदम्ब,दक्षिण गंगा या राज घराण्यांनी कर्नाटक वर शासन केले.
चालुक्य,राष्ट्रकुट,होयसळ,चोल आणि विजयनगर या साम्राज्यानंतर कर्नाटक वर सर्वात अलीकडील शासन मराठ्यांचे होते.मराठ्यांनी मुघलांशी युद्ध करून कर्नाटक आपल्या ताब्यात घेतले होते.टिपू सुलतान च्या पराभवानंतर कर्नाटक ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्ती नंतर १९५६ मध्ये म्हैसूर हे भारताचे एक राज्य बनले.व १९७३ मध्ये म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे ठेवण्यात आले.
कर्नाटक पाहण्यासारखी ठिकाणे :
बंगळूरू / बंगलोर :-
कर्नाटक ची राजधानी बंगळूरू “गार्डन सिटी”म्हणून प्रसिद्ध आहे.बंगळूरू शहराला भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असे ही म्हणतात.भारतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेले राहण्यासाठी सर्वात जास्त पसंद केले जाते.
बंगळूरू ची आल्हाददायी हवा,नयनरम्य बागा,व विशाल सरोवरे पर्यटकांना आकर्षित करतात.बंगळूरू मधील शॉपिंग मॉल प्रसिद्ध आहेत.नाईट लाईफ हे बंगळूरू चे वैशिष्ठ्य आहे.बंगळूरू चे स्ट्रीट फूड भारतातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड पैकी एक मानले जाते.बंगळूरू पर्यटन मध्ये खालील पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.
इस्कॉन मंदिर
कबन पार्क
टिपू महल
नंदी हिल
बाणेरगट्टा उद्यान
बंगळूरू चा किल्ला
वंडरला पार्क
विजयनगर साम्राज्य हम्पी :
१३ व्या शतकात उदयाला आलेल्या व राज्यविस्तार व संपन्नतेच्या बाबतीत यशस्वी ठरलेल्या विजयनगर साम्राज्याचे अवशेष आजही हम्पी येथे पाहायला मिळतात.
युनेस्को ने जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद घेतलेले हम्पी हे पर्यटन स्थळ कर्नाटक राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
रामायण काळातील वानरराज सुग्रीवाची किष्किंधा नागरी ही याच ठिकाणी होती.हम्पी मध्ये १०० पेक्षा जास्त प्राचीन स्मारके आहेत.त्याचबरोबर हम्पी चा बाजार,तुंगभद्रा नदीतील नौकानयन व हिप्पी आयलैंड हे चुकवू नये.
थंड हवेचे ठिकाण कुर्ग:
कुर्ग ला भारतातील स्कॉटलंड किंवा कर्नाटक चे काश्मीर असे म्हटले जाते.थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले कुर्ग कर्नाटक बरोबरच देशभरातील पर्यटकांचे लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.शहरी जीवनापासून लांब काही काळ निवांत निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी पर्यटक कुर्ग ला पसंती देतात.
चहा,कॉफी च्या बागा,हिरवगार वनराई,खळाळत्या पाण्याचे झरे व प्रदूषण मुक्त वातावरण हे कुर्ग चे वैशिष्ठ्य आहे.ज्या प्रमाणे महाराष्ट्रात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.त्याच प्रमाणे कर्नाटकात कुर्ग हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर :
कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टी वरील प्रमुख तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून गोकर्ण महाबळेश्वर ला ओळखले जाते.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले गोकर्ण महाबलेश्वर आपल्या सोनेरी वाळूच्या स्वच्छ किनार्यांसाठी प्रसिद्ध आहे.
गोकर्ण महाबळेश्वर हे हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.पौराणिक काळाशी संबंध असलेल्या गोकर्ण महाबळेश्वराच्या मंदिराच्या दर्शनाने पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते.कर्नाटकातील सात मोक्षप्राप्ती स्थळांमध्ये गोकर्ण महाबळेश्वर चा समावेश होतो.
इथल्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर भारतीय पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटक सुद्धा पाहायला मिळतात.सुट्टीमध्ये बीच वर मौजमस्ती करायची असेल तर गोकर्ण महाबळेश्वर ला जरूर भेट द्या.
बांदीपूर राष्ट्रीय उद्यान :
बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असून कर्नाटक राज्यामध्ये आहे. “बांदीपूर राष्ट्रीय उद्यान” हे जवळजवळ १०० वर्षे जुने असून एकेकाळी हे अभयारण्य म्हैसूर संस्थानच्या महाराजांचे खासगी शिकारक्षेत्र होते.
म्हैसूर च्या महाराजांनी १९३१ मध्ये ९० वर्ग कि.मी. क्षेत्रामध्ये हे अभयारण्य उभारले व याचे नाव ‘वेणुगोपाल वन्यजीव पार्क’ असे ठेवले.त्यानंतर ‘प्रोजेक्ट टायगर’ या मोहिमे अंतर्गत वेणुगोपाल वन्यजीव पार्क मध्ये ८०० वर्ग कि.मी. क्षेत्र वाढवून याचे नामकरण “बांदीपूर राष्ट्रीय उद्यान” असे केले गेले.
ऐतिहासिक स्थळ विजापूर:
विजापूर चा गोल घुमट प्रसिद्ध आहे.कर्नाटक राज्यातील प्रमुख ऐतिहासिक स्थळांमध्ये बिजापूर चा समावेश होतो.आदिलशाही राजवटीचे राजधानीचे ठिकाण असलेले विजापूर हे शहर कर्नाटक राज्यातील प्रमुख व्यापारी शहर म्हणूनही ओळखले जाते.विजापूर हे विजयपुरा या नावानेही ओळखले जाते.
विजापूर चा सुलतान आदिलशाह (१६२६ ते १६५६) याने गोल घुमट निर्माण केला.या घुमटामध्ये एकदा बोललेले १० ते १२ वेळा ऐकू येते.त्याच बरोबर इथे असणारी मुलुख मैदान तोफ खूप प्रसिद्ध असून त्याकाळातील सर्वात शक्तिशाली तोफ मानली जायची.
प्रसिद्ध म्हैसूर :
कर्नाटक मध्ये पर्यटकांद्वारा सर्वात जास्त भेट दिले जाणारे स्थळ म्हणजे म्हैसूर होय.म्हैसूर ला “पॅलेस सिटी ऑफ इंडिया” म्हणूनही ओळखले जाते.
पूर्वी म्हैसूर हे कर्नाटक ची राजधानी म्हणून ओळखले जात होते.सध्या म्हैसूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून कर्नाटकची राजधानी बंगुलुरू पासून १४० कि.मी. दक्षिण-पश्चिमेला चामुंडी टेकड्यांवर वसलेले आहे.
म्हैसूर मध्ये असलेले सात पॅलेस शहराची शोभा वाढवतात.भारतामध्ये ताजमहाल नंतर सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेल्या ठिकाणांमध्ये म्हैसूर चे नाव येते.
म्हैसूर मधील चामुंडेश्वरी मंदिर,जगमोहन महाल,सेंट फिलोमेना चर्च,वृंदावन गार्डन ही काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
दांडेली अभयारण्य :
कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध दांडेली अभयारण्य पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.जैवविविधतेने नटलेल्या या अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातींचे प्राणी,पक्षी व वनस्पती पाहायला मिळतात तसेच या अभयारण्यात जंगल सफारी बरोबरच रिव्हर राफ्टींग,ट्रेकिंग,कॅम्पिंग,बर्ड वॉचिंग इत्यादी साहसी प्रकार करता येतात.
अगुंबे रेन फोरेस्ट :
अगुंबे ला दक्षिण भारतातील चेरापुंजी असेही म्हटले जाते,कारण भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणार्या ठिकाणांच्या यादीत अगुंबे दुसऱ्या क्रमांकावर येते.इथल्या हिरव्यागार वनराई मध्ये मन:शांती मिळते.
अगुंबे हे आणखी एका खास कारणासाठी ओळखले जाते,ते म्हणजे राजनाग (किंग कोब्रा) संवर्धन व संरक्षण केंद्र.गेली वीस वर्षे इथल्या परिसरात सापडणाऱ्या किंग कोब्रा नागांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम अगुंबे या ठिकाणी केले जाते.अगुंबे भेटीवेळी केंद्राला जरूर भेट दिली पाहिजे.तसेच जुन्या काळी मालगुडी डेज या प्रसिद्ध दूरदर्शन मालिकेचे चित्रीकरण याच ठिकाणी झाले होते.हा संपूर्ण परिसर पाहण्यासारखा आहे.
प्रसिद्ध खाद्यपदार्थ:
कर्नाटकच्या मुख्य जेवणात तांदूळ,ज्वारी,बाजरी,कडधान्ये यांचा समावेश होतो.शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची व्यंजने आहारात समाविष्ट असतात.दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ इडली,वडा,डोसा,सांबार,चटनी असे पदार्थ व उडुपी पद्धतीचे खाद्यपदार्थ कर्नाटकामध्ये सर्वत्र मिळतात.कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मत्स्याहार हा प्रमुख आहार आहे.गोड पदार्थांमध्ये धारवाडी पेढा,म्हैसूरपाक,तांदळाचे गोड पदार्थ यांचा समावेश होतो.कर्नाटकच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तामिळनाडू व केरळ या राज्यांच्या खाद्य संस्कृतीचा प्रभाव पडतो.
पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ :-
कर्नाटक चा पूर्वेकडील विजापूर,हम्पी,बदामी,पट्टद्कल हा भाग कमी पावसाचा असल्याने अगदी पावसाळ्यात ही या भागाची भटकंती करता येते.
१) धबधबे पाहायचे असतील तर पावसाळ्यात दांडेली,जोग धबधबा,अगुंबे ही पर्यटन स्थळे उत्तम आहेत.
२) इतर सर्व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम आहे.
३) कर्नाटकातील म्हैसूर,उटी,कुर्ग या थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी मार्च ते जून हा कालावधी योग्य ठरतो.
कसे जाल :-
कर्नाटक हे भारतातील प्रमुख पर्यटन राज्य असल्याने देशातील सर्व प्रमुख शहरातून कर्नाटक ला जाता येते.महाराष्ट्राच्या शेजारीच कर्नाटक हे राज्य असल्याने महाराष्ट्रातील लोक सहजपणे कर्नाटक पर्यटन करू शकतात.
विमान सेवा:-
कर्नाटक मध्ये सध्या आठ विमानतळ कार्यरत आहेत.भारतातील सर्व प्रमुख शहरातून कर्नाटक राज्यातील बंगळूरू,हुबळी,बेळगाव,मंगलोर,म्हैसूर,हम्पी,कलबुर्गी,
बेल्लूर या विमानतळा वर विमानसेवा उपलब्ध आहे.
१) बंगळूरू हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ असून भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.देशातील सर्व प्रमुख शहरा बरोबरच जगातील सर्व प्रमुख शहरातून बंगळूरू साठी विमानसेवा उपलब्ध आहे.त
२) मंगलोर हा विमानतळ ही आंतरराष्ट्रीय विमानतळ असून आखाती देशातून मंगलोर साठी नियमित उड्डाणे असतात.
रेल्वे सेवा:-
बंगळूरू,हुबळी,मंगलोर ही काही मोठी रेल्वे स्टेशन आहेत.कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकातील कारवार,गोकर्ण,उडुपी,मंगलोर ही काही महत्वाची स्थानके आहेत.मुंबई,पुणे,सोलापूर,कोल्हापूर या शहरातून कर्नाटक मध्ये जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध आहेत.
रस्ता सेवा:-
महाराष्ट्रातून कर्नाटक ला जाण्यासाठी रस्ता मार्ग हा सर्वात उत्तम व सोयीचा आहे.पुणे-बंगळूरू हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडतो.
कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या NERKTC व NWRKTC या दोन विभागाच्या बसेस महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून कर्नाटक साठी सेवा देतात.तसेच कर्नाटक महामंडळाच्या फ्लायबस,ऐरावत,अंबरी,राजहंस,शीतल या वातानुकुलीत स्लीपर व सेमी स्लीपर बसेस कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर,मुंबई,औरंगाबाद,पुणे,नागपूर इत्यादी अनेक शहरातून कर्नाटक राज्यातील शहरांसाठी सेवा देतात.
कर्नाटक राज्यामध्ये रस्ता मार्गाचे जाळे चांगल्या प्रकारे पसरलेले असून विविध पर्यटन स्थळांना जोडणारे उत्तम पद्धतीचे रस्ते कर्नाटकात आहेत.पर्यटक स्वतःच्या अगर भाड्याच्या वाहनाने कर्नाटक पर्यटन सहजपणे करू शकतात.
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.