कर्नाटक राज्यातील कुर्ग किंवा कोरगू हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे.कुर्ग ला ‘भारतातील स्कॉटलंड’ किंवा ‘कर्नाटकचे काश्मीर’असे ही म्हटले जाते.म्हैसूर पासून १०० कि.मी.अंतरावर कुर्ग असून निसर्ग सौंदर्या साठी प्रसिद्ध आहे.प्रदूषण व रहदारी पासून मुक्त असलेल्या कुर्ग ला भेट दिल्यानंतर मन प्रसन्न होते.
कुर्ग हे समुद्रसपाटीपासून १५२५ मीटर उंचीवर इथले वातावरण आल्हाददायी असते.पश्चिम घाटातील जैवविविधता इथे पाहायला मिळते.
कोडगू चे इंग्रजी नाव कुर्ग असून या जिल्ह्याचे मुख्यालय मडिकेरी हे आहे.कोडगू चे डोंगर,चहा व कॉफी च्या बागा,हिरवीगार वनराई,धबधबे,वाहत्या पाण्याचे झरे पर्यटकांचे मन मोहून घेतात.
पर्यटक ट्रेकिंग,कॅम्पिंग,हायकिंग,बोटिंग,रिव्हर राफ्टींग इत्यादी गोष्टी सुद्धा करू शकतात.सुट्टी घालवण्यासाठी कुर्ग हे आदर्श पर्यटन स्थळ आहे.
इतिहास:-
कोडगू नावाच्या उत्पत्ती मागे अनेक कथा सांगितल्या जातात.काही लोक असे मानतात की,कोडगू शब्दाची उत्पत्ती क्रोड देशा अर्थात कोडवा जमातीच्या लोकांची भूमी असा होतो.तर काही लोक या भूमीला कावेरी नदीची भूमी म्हणून ओळखतात,तर प्राचीन साहित्यामध्ये ‘कोडूमले’ म्हणजेच उंच पर्वतांची भूमी असा अर्थ होतो.
ऐतिहासिक दाखल्यांचा विचार केला तर अशी माहिती मिळते की,८ व्या शतका पासून इथे लोक वास्तव्यास आहेत.सर्व प्रथम गंगा राजवंशाची सत्ता इथे होती,त्यानंतर चोल,कदम्ब,चालुक्य,चंगलवास इत्यादी शासकांनी कोडगू वर राज्य केले.ई.स.पू.११७४ मध्ये होयसळ घराण्याने कोडगू काबीज केले.त्यानंतर १४ व्या शतकात कोडगू प्रदेश विजयनगर साम्राज्यात सामील झाले.विजयनगर साम्राज्या नंतर कोडगू ने अनेक सम्राटांचा उदय आणि अस्त पाहिला.
१८ व्या शतकात इंग्रजांनी कोडगू आपल्या ताब्यात घेतले.इंग्रजांनीच कोडगू चे नामकरण कुर्ग असे केले.देशाच्या स्वातंत्र्य नंतर १९५० पर्यंत कोडगू हे स्वतंत्र राज्य होते.१९५६ मध्ये नवीन राज्यांच्या निर्मिती वेळी कोडगू हे कर्नाटक राज्याचा जिल्हा म्हणून अस्तित्वात आले व मडिकेरी,सोमवारपेट,विराजापेटे हे तीन तालुके तयार करण्यात आले. मडिकेरी या शहराला कुर्ग म्हणजेच कोडगू या जिल्ह्याचे मुख्यालय मानण्यात आले.
कुर्ग मधील पर्यटन स्थळांची माहिती :-
अब्बे धबधबा :-
अब्बे धबधबा कुर्ग मधील सर्वात मोठा व प्रसिद्ध धबधबा आहे.मडिकेरी शहरापासून ८ कि.मी.अंतरावर हा धबधबा आहे.
कॉफीच्या बागांमधून जाणाऱ्या लहानशा वाटेने या धबधब्यजवळ जावे लागते.वाटेमध्ये अनेक मसाल्याच्या बागा लागतात,या बागेमधून येणारा मसाल्याचा वास आपले मन मोहून घेतो.
इंग्रज राजवटीमध्ये या धबधब्याचे नाव जेस्सी धबधबा असे होते,त्यानंतर मडिकेरी चे इंग्रज अधिकारी यांनी आपल्या मुलीच्या नावा वरून या धबधब्या चे नाव अब्बे फाल्स असे ठेवले.१७० फुटावरून कोसळणारा प्रचंड जलप्रपात पाहून पर्यटक खुश होतात.इथे बगीचा,हॉटेल,स्वच्छतागृह इत्यादी भौतिक सोयी उपलब्ध आहेत.
राजा ची सीट :
मडिकेरी शहरातील प्रमुख आकर्षण स्थळ म्हणून राजा ची सीट या स्थळाला ओळखले जाते.उंच टेकडीवर सुंदर अशी बाग तयार करण्यात आली असून या बागेमध्ये विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात.तसेच संगीताच्या तालावर नृत्य करणारे कारंजे पाहायला सायंकाळच्या वेळी पर्यटकांची गर्दी असते.
मडिकेरी च्या राजा च्या स्मरणार्थ ही बाग तयार केली गेली.हिरवळ आणि विविध प्रकारच्या वनस्पतींनी बहरलेली ही बाग फोटोग्राफी साठी उत्तम ठिकाण आहे.उंचावर असल्याने इथून परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.राजा ची सीट या बागेतून सूर्योदय व सूर्यास्त खूप सुंदर दिसतो.
नामड्रोलिंग बौद्ध मठ :
कुर्ग या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणापासून ३४ कि.मी.अंतरावर असलेल्या कुशालनगर गावाजवळील नामड्रोलिंग बौद्ध मठ गोल्डन टेम्पल म्हणूनही ओळखला जातो.
परिसरातील लोकांच्या आस्थेचे केंद्र असलेला हा बौद्ध मठ दक्षिण भारतामधील एकमेव असे बौद्ध संस्कृती व वास्तूकलेचे उदाहरण आहे.
सन १९६९ मध्ये स्थापन झालेल्या या मठा मध्ये भगवान पद्मसंभव,शाक्यमुनि आणि अमितामय यांच्या ४० फुट उंचीच्या सोनेरी रंगातील मूर्ती आहेत.या मठाच्या भिंतींवर तिबेटी पौराणिक कथांमधील प्रसंग चित्रित केलेले पाहता येतात.अतिशय निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या या मठाला भेट देण्यासाठी असंख्य पर्यटक येतात.
धार्मिक स्थळ तालाकावेरी:
तालाकावेरी हे स्थळ कुर्ग पासून ४४ कि.मी.अंतरावर आहे.ब्रम्हगिरी पर्वताच्या शिखरावर हे स्थळ असून १२७६ मीटर उंचीवर आहे.
पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की,माता कावेरी अगस्त्य ऋषींच्या तपश्चर्ये ला प्रसन्न होऊन अवतीर्ण झाली.इथे तालाकावेरी कुंड आहे,ज्यामध्ये भाविक स्नान करून शेजारच्या मंदिरामध्ये दर्शन घेतात.श्रद्धाळू आणि निसर्ग प्रेमी लोकांसाठी हे स्थान आवर्जून भेट देण्यासारखे आहे.
रिव्हर राफ्टींग:
कुर्ग पर्यटनाला आलेले पर्यटक रिव्हर राफ्टींग करण्याचा आनंद घेऊ शकतात.साहसप्रेमी लोकांसाठी कुर्ग एक आदर्श पर्यटन स्थळ आहे.
बारापोला नदीमध्ये रिव्हर राफ्टींग करण्याची सोय उपलब्ध आहे.ब्रम्हगिरी पर्वतातून वाहत येणारी बारापोला नदी राफ्टींग साठी आदर्श स्थळ आहे.
जुना मडिकेरी किल्ला :
कुर्ग अर्थात कोरगू ने अनेक राजवटींचा उदय व अस्त पाहिला.मेदिकेरी इथे असणारा किल्ला या शहराच्या सांस्कृतिक वारश्याचे प्रतिक आहे.सन १८३४ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हाती आला,ब्रिटिशांनी या किल्याचे नाव मर्कारा किल्ला असे ठेवले होते.
ब्रिटीश भारतातून गेल्या नंतर हा किल्ला म्हैसूर सम्राटांच्या ताब्यात गेला व त्यांनी या किल्ल्याचे नामकरण मडिकेरी चा किल्ला असे केले. कुर्ग पर्यटनाला गेल्यानंतर आवर्जून भेट देण्यासारखा हा किल्ला आहे.
ओमकारेश्वर मंदिर :
मडिकेरी मध्ये असणारे ओमकारेश्वर मंदिर प्रमुख धार्मिक स्थळ आहे.सन १८२० मध्ये या मंदिराची उभारणी लिंगराजेन्द्र द्वितीय यांनी केली होती.अतिशय आकर्षक रचना असलेल्या या मंदिराची वास्तुकला गोथिक आणि इस्लामिक शैली मधील आहे.या प्रकारची रचना असलेले हे कर्नाटक मधील एकमेव मंदिर मानले जाते.
मंदिरात प्रवेश करताच प्रवेशद्वारा जवळ ताम्रपटामध्ये या मंदिराचा इतिहास लिहलेला पाहायला मिळतो.गर्भगृहामध्ये शंभू महादेवाची सुंदर अशी पिंड आहे.या मंदिराच्या बाहेर पाण्याचा मोठा तलाव असून रंगीबेरंगी मासे त्यामध्ये पोहताना दिसतात.निसर्गरम्य वातावरण असल्याने असंख्य पर्यटक या मंदिराला भेट देतात.
प्रमुख पर्यटन स्थळ सोमवारपेट:
सोमवारपेट हे कुर्ग मधील तालुक्याचे ठिकाण आहे.शांत व प्रदूषण मुक्त हवापाणी हे सोमवारपेट चे वैशिष्ठ्य आहे.
या ठिकाणी सेंद्रिय शेती वर भर दिला जातो.कॉफी,मसाले, हळद,आले,वेलची यांची मोठ्या प्रमाणात शेती सोमवारपेट या परिसरात होते.इथे अनेक फार्म हाउस असून पर्यटक शेती बरोबरच ग्रामीण जीवनाचा आनंद घेतात.
होनामाना केरे तलाव:
सोमवारपेट पासून ७ कि.मी.अंतरावर असलेला होनामाना केरे तलाव नैसर्गिक तलाव असून आपल्या शांत व प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.देवी हनामाना च्या नावावरून या तलावाचे नाव होनामाना असे ठेवण्यात आले,तलावाच्या परिसरात देवीचे सुंदर मंदिर असून भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात.
इराप्पू धबधबा:
कुर्ग मधील इराप्पू धबधबा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.केरळ च्या वायनाड सीमेजवळ असलेला हा धबधबा लक्ष्मण प्रताप धबधबा म्हणून ही ओळखला जातो.
कावेरी नदीची सहायक नदी लक्ष्मण नदी वर असणाऱ्या या धबधब्या चा प्रवाह वेगवान असून उंचावरून खाली कोसळतो.कुर्ग पर्यटनाला आलेले पर्यटक इराप्पू धबधब्याला आवर्जून भेट देतात.
पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य:
सोमवारपेट तालुक्यात असलेले पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य १०२ चौ.कि.मी.क्षेत्रात पसरलेले असून भारतातील २१ प्रसिद्ध अभयारण्या पैकी एक असून ज्यामध्ये नामशेष होत चाललेल्या वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण केले जाते.
मल्लाली धबधबा:
सोमवारपेट पासून २६ कि.मी.अंतरावर असलेला मल्लाली धबधबा सफेद जलप्रपातासाठी प्रसिद्ध आहे.कुमारधारा नदी वरील हा धबधबा आजूबाजूच्या वनराई मुळे खूप निसर्गरम्य वाटतो.कुर्ग मधील प्रसिद्ध अब्बे फाल्स जवळच असल्याने हे दोन्ही धबधबे एका भेटीत पाहता येतात.
भगामंडला तीर्थक्षेत्र:
भगामंडला हे कुर्ग मधील प्रमुख तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. मडिकेरी पासून ३४ कि.मी.अंतरावर असलेल्या भगामंडला ला त्रिवेणी असेही म्हटले जाते.तालाकावेरी च्या पायथ्याला हे स्थळ असून इथे तीन नद्यांचा संगम होतो.
कावेरी,कनिका आणि सुज्योती या तीन नद्यांचा संगम भगामंडला या ठिकाणी होतो.निसर्गसौंदर्या बरोबरच हे स्थळ पवित्र असल्याने असंख्य भाविक व पर्यटक भगामंडला ला भेट देतात.
ब्रम्हगिरी ट्रेक:
ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्या पासून सुरुवात करून ५२७६ फुट उंची पर्यंत आपण ट्रेकिंग करून जाऊ शकतो.हा ट्रेकिंग मार्ग अतिशय विलोभनीय असा आहे.
हिरव्यागार वनराईतून जाताना,स्वच्छ पाण्याचे ओहोळ,जलप्रवाह ओलांडताना मन अगदी आनंदी होते.या ट्रेकिंग वेळी आपण कॅम्पिंग करण्याचा आनंद ही घेऊ शकतो.
प्रसिद्ध खाद्यपदार्थ :
इडली,डोसा,वडा,रस्सम,इडीअप्पम असे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ सहज मिळतील.त्याचबरोबर इथले स्थानिक असे खास पदार्थ जसे की,कदमबुत्ता( तांदळाचे लाडू),बांस शूट कढी,पंडी कढी,नोलपुत्ता से पदार्थ ही आवर्जून खायला मिळतील.
कुर्ग हे हिल स्टेशन असल्याने इथे मांसाहारी पदार्थ ही मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
कधी जाल:
मार्च ते मे हा उन्हाळ्याचा काळ उत्तम आहे.किंवा तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळातही कुर्ग ला भेट देऊ शकता,या काळात कुर्ग चा परिसर हिरवाई ने नटलेला पाहायला मिळतो.परंतु या काळात हवा थंड असल्याने उबदार कपडे सोबत आणणे गरजेचे असते.
कुर्ग ही पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. इथे असंख्य धबधबे पाहायला मिळतील,धुक्याच्या दुलई मध्ये लपेटलेले रस्ते व वनराई वातावरण अधिकच शांत बनवते.पावसाळ्यात कुर्ग चे वातावरण काही औरच असते.
कसे जाल:
विमान सेवा:
सर्वात जवळचा विमानतळ मंगलोर हा आहे.मंगलोर विमानतळ कुर्ग पासून १६८ कि.मी. अंतरावर आहे.देशातील सर्व प्रमुख शहरातून मंगलोर साठी नियमित विमानसेवा उपलब्ध असते.
रेल्वे सेवा:
कुर्ग साठी सर्वात जवळची रेल्वे स्टेशन म्हैसूर (१२१ कि.मी)व मंगलोर (१६८ कि.मी.) ही आहेत.त्याच बरोबर केरळ मधील थलास्सेरी व कन्नूर ही रेल्वे स्टेशन ही कुर्ग साठी जवळची आहेत.या सर्व रेल्वे स्टेशन वरून कुर्ग साठी कॅब/ बसेस सहज मिळतात.
रस्ता सेवा:
कुर्ग ला पोहोचण्यासाठी रस्ता मार्ग हाच एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.जवळच्या विमानतळ किंवा रेल्वे स्टेशन असलेल्या शहरातून बस,मोटारीने कुर्ग ला येणे हा पर्याय बहुतांश पर्यटक वापरतात.तसेच काही पर्यटक स्वतः च्या अगर भाड्याच्या मोटारीने कुर्ग ला येणे पसंद करतात.
कुर्ग ला येणारा मार्ग खूप सुंदर व नयनरम्य आहे.भारतातील सर्वात सुंदर मार्गांमध्ये कुर्ग ला येणारा मार्ग समाविष्ट आहे.या मार्गाने जरूर प्रवास करा.चहा,कॉफी च्या बागा मधून तर कधी घनदाट वनराई मधून जाणारा हा रस्ता कधीही संपू नये असेच वाटते.
बसने कुर्ग ला जाणे खूप आरामदायी व किफायतशीर मानले जाते.कारण दक्षिण भारतातील सर्व प्रमुख शहरातून कुर्ग साठी आरामबस मिळतात.तसेच मंगलोर,म्हैसूर,उटी,हसन,थलास्सेरी,कोच्चि या शहरातून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस कुर्ग साठी नियमित सेवा देतात.
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा