म्हैसूर हे शहर भारताच्या कर्नाटक राज्यातील प्रसिध्द असे पर्यटन स्थळ आहे.पूर्वी म्हैसूर हे कर्नाटक ची राजधानी म्हणून ओळखले जात होते.सध्या म्हैसूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून कर्नाटकची राजधानी बंगलुरू पासून १४० कि.मी. दक्षिण-पश्चिमेला चामुंडी टेकड्यांवर वसलेले आहे.
म्हैसूर शहराचे क्षेत्रफळ १२८ चौ.कि.मी. असून हे शहर भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.म्हैसूर शहराला “पॅलेस सिटी ऑफ इंडिया” म्हणूनही ओळखले जाते.
इतिहास:-
म्हैसूर मध्ये असलेले सात पॅलेस शहराची शोभा वाढवतात.भारतामध्ये ताजमहाल नंतर सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेल्या ठिकाणांमध्ये म्हैसूर चे नाव येते.
विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर म्हैसूर हे स्वतंत्र राज्य बनले.देवराज व नानराज या हिंदू-वाडियार घराण्यातील बंधूनी म्हैसूर साम्राज्याचा विस्तार केला.यानंतर काही काळ हे साम्राज्य निजाम व मराठ्यांशी झुंजत राहिले.
हैदर अली या सैनिक म्हणून कारकीर्द सुरु करणाऱ्या जवानाने म्हैसूरच्या राजघराण्याची सत्ता उलथवून टाकली व स्वतः च्या ताब्यात राजकारभार घेतला.त्याने सन १७६७ मध्ये निजामांशी युती करून इंग्रजांचा पराभव केला व त्यांना मद्रासचा तह मान्य करायला लावला.त्यानंतर सन १७८० मध्ये निजाम आणि मराठ्यांशी युती करून पुन्हा एकदा इंग्रजांचा अपमानकारक पराभव केला.हैदर अली चा मृत्यू सन १७८२ मध्ये झाला.त्यानंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान ने म्हैसूर साम्राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
म्हैसूर मधील पर्यटन स्थळे :-
म्हैसूर मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.म्हैसूर मध्ये एकूण सात महाल असून म्हैसूरला “महालांचे शहर” म्हणूनही ओळखले जाते.
म्हैसूर पॅलेस :-
म्हैसूरच्या प्रमुख पर्यटन स्थळांचा विचार केला तर,सर्व प्रथम नाव येते म्हैसूर पॅलेसचे.म्हैसूर पॅलेस हे म्हैसूर मधील प्रमुख आकर्षण केंद्र आहे.
म्हैसूर मधील मिर्झा रोड वर असलेला म्हैसूर पॅलेस हा भारतातील सर्वात मोठ्या महालांपैकी एक आहे.हा महाल म्हैसूर संस्थानाचे राजे वाडियार यांचे मुख्य निवासस्थान होते.
पूर्वी या ठिकाणी असलेला लाकडी महाल जाळल्यानंतर १९१२ मध्ये या महालाचा नकाशा ब्रिटीश आर्किटेक्ट हेनरी इर्विन यांनी तयार केला होता.या महालाच्या अंतर्गत भागातील कल्याण मंडपात काचेचे छत व बाजूच्या भिंती आहेत.भिंतींवर लावलेली अमूल्य अशी पेंटिंग आणि सोनेरी सिंहासन हे या महालाचे वैशिष्ठ्य आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सामान्य नागरिकांना हे रत्नजडीत सुवर्ण सिंहासन पाहता येते.
भारत-सार्सेनिक शैलीमध्ये बांधकाम करण्यात आलेला हा पॅलेस आपल्या भव्य आकार आणि अत्यंत सुंदर कलाकुसरी मुळे ब्रिटनच्या बंकिंघम पॅलेस शी साधर्म्य साधतो.
शाही हत्ती साठी असलेला सोन्याचा हौद,दरबार हॉल आणि कल्याण मंडप हे या महालाचे वैशिष्ठ्य आहे.महालाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच भारतीय व युरोपियन शैलीचे नक्षीकाम असलेल्या वस्तू दिसून येतात.
हत्तीद्वार हे या महालाचे मुख्य असून आत प्रवेश करताच उत्तरेला हत्ती हौद असून २४ कॅरेट ८४ कि.ग्राम.सोन्यापासून बनवण्यात आला आहे.
महाल पाहण्याची वेळ:
दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३०
शुल्क: प्रौढ व्यक्ती : ४० रु.
लहान मुले : २० रु.
विदेशी नागरिक : २०० रु.
म्हैसूर पॅलेसच्या आसपास पाहण्यासारखी ठिकाणे:
म्हैसूर राजघराण्याचे धार्मिक स्थळ चामुंडेश्वरी मंदिर:-
म्हैसूर पॅलेस पासून १३ कि.मी.अंतरावर असलेल्या उंच टेकडीवरील चामुंडेश्वरी मंदिर हे म्हैसूर मधील प्रमुख प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळ आहे.१२ व्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या मंदिरात शुध्द सोन्यात बनवलेली दुर्गा मातेची मूर्ती आहे.
द्रविडी शैलीतील उत्तम बांधकाम असलेल्या या मंदिराचा कळस सात माजली असून त्याची उंची ४० मीटर इतकी आहे.मंदिराजवळच महिषासुराची विशाल प्रतिमा ठेवण्यात आली आहे.मंदिरापासून म्हैसूर व परीसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
मंदिराची वेळ:
सकाळी ७.३० ते दुपारी २.०० व दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.००
सेंट फिलोमेना चर्च:-
सेंट फिलोमेना चर्च १९३३ साली तयार करण्यात आले होते.हे चर्च भारतातील सर्वात मोठे व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे चर्च आहे.म्हैसूर शहरापासून ३ कि.मी.अंतरावर कॅथेड्रल रोड वर असणाऱ्या या चर्च चे बांधकाम निओ-गैथिक शैलीतील आहे.या चर्च च्या तळमजल्यावर तिसऱ्या शतकातील संतांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत.
या चर्च चे दोन्ही मनोरे १७५ फुट उंचीचे असून खूप दूर वरून पाहता येतात.सध्या हे चर्च सेंट जोसेफ चर्च या नावानेही ओळखले जाते.
चर्च ची वेळ: सकाळी ५.०० ते रात्री ८.०० पर्यंत
जगमोहन महाल :-
म्हैसूर पॅलेसच्या जवळच असणारा हा महाल ‘पॅलेस सिटी’ म्हैसूर मधील प्रमुख पॅलेस आहे.जगमोहन पॅलेसची निर्मिती कृष्णराज वाडियार तृतीय यांनी १८६१ रोजी केली होती.
म्हैसूर मधील सर्वात जुनी वास्तू म्हणून जगमोहन पॅलेस ला ओळखले जाते.सन १९१५ मध्ये या महालाचे रुपांतर आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले असून यामध्ये म्हैसूर व तंजावर शैली मधील पेंटीग,मुर्त्या व दुर्मिळ वाद्ये ठेवण्यात आली आहेत.
भेट देण्याची वेळ:
सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०
वृंदावन गार्डन:-
म्हैसूर चे नाव घेतले की,डोळ्यासमोर येते वृंदावन गार्डन.कित्येक चित्रपटांतील गीतांचे चित्रीकरण झालेले हे गार्डन म्हैसूर मधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळ आहे.कृष्णराजसागर धरणाच्या भिंतीजवळ तयार करण्यात आलेल्या या बागेमध्ये असलेली हिरवळ व रंगीबेरंगी फुले मन मोहून घेतात.
दररोज सायंकाळच्या वेळी संगीताच्या तालावर रंगीबेरंगी प्रकाशात नृत्य करणारी कारंजी पाहायला मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात.
कृष्णराजसागर धरण:-
म्हैसूर शहराजवळच असलेले कृष्णराजसागर हे धरण खूप प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे.या धरणाची निर्मिती सन १९३२ मध्ये करण्यात आली होती.
म्हैसूर शहरापासून १२ कि.मी.अंतरावर हे धरण आहे.स्वातंत्रपूर्व काळातील भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचे दर्शन हे धरण पाहताना होते.या धरणात बोटिंग ची सुविधा उपलब्ध आहे.
रेल्वे संग्रहालय:-
म्हैसूर मधील रेल्वे संग्रहालय भारतीय रेल्वे द्वारे स्थापन करण्यात आले आहे.दिल्ली च्या रेल्वे संग्रहालया नंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे संग्रहालय असून भारतीय रेल्वेचा इतिहास व प्रगती या संग्रहालयात पाहता येते.
वाफेच्या इंजिनापासून आधुनिक विद्युत इंजिनापर्यंत व सिग्नल यंत्रणेपासून १८९९ मध्ये खास ब्रिटीश महाराणीच्या प्रवासा साठी सर्व सुखसोयींनी युक्त रेल्वे बोगी पर्यंत सर्व पाहता येते.लहान मुलांच्यासाठी हे संग्रहालय म्हणजे ज्ञानाचा खजिनाच ठरते.
वेळ:
सकाळी १०.०० ते दुपारी १.०० व दुपारी ३.०० ते रात्री ८.००
म्हैसूर प्राणी संग्रहालय :-
म्हैसूर मधील प्राणी संग्रहालय हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण स्थळ आहे.भारतातील सर्वात जुन्या प्राणी संग्रहालयामध्ये म्हैसूरच्या प्राणी संग्रहालयाचा समावेश होतो.
या प्राणी संग्रहालयात अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी पाहायला मिळतात.तसेच या ठिकाणी एक बॉटनिकल गार्डन असून खूप जुने वृक्ष इथे पाहायला मिळतात.त्यामध्ये देशी आणि विदेशी ८५ प्रकारचे वृक्ष जतन करून ठेवण्यात आले आहेत.
वेळ:
सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.३० (मंगळवारी बंद)
रंगनाथस्वामी मंदिर :-
रंगनाथस्वामी मंदिर हे म्हैसूर मधील जुने मंदिर असून हिंदू देवता रंगनाथ यांना समर्पित आहे.कावेरी नदीच्या तीरावरील हे मंदिर कर्नाटक राज्यातील प्रमुख पाच तीर्थ क्षेत्रापैकी एक आहे.हे मंदिर कावेरी नदी मध्ये नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बेटावर असून याचे उंच शिखर गोपुरम म्हणून ओळखले जाते.
प्रसिध्द बांदीपूर राष्ट्रीय उद्यान :-
कर्नाटकातील प्रसिध्द असे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे म्हैसूर पासून जवळच असून भारतातील मुख्य दहा अभयारण्यात समाविष्ठ आहे.या अभयारण्यात वाघ व हत्तींची संख्या लक्षणीय असून दक्षिण आशिया मधील सर्वात जास्त जंगली हत्ती या अभयारण्यात आहेत.
पर्यटनासाठी योग्य कालावधी :-
म्हैसूर पर्यटनाचा सर्वात योग्य कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा आहे.या काळात म्हैसूर पर्यटनासाठी योग्य तापमान असते.
प्रसिध्द खाद्य पदार्थ:-
म्हैसूर हे दक्षिण भारतातील प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने इथे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ सहज मिळतात.त्यामध्ये म्हैसूर पाक, इडली,बडा,बोंडा,आलू बाथ,खारा बाथ,उत्तपम,सादा डोसा,मसाला डोसा,नीर डोसा,पालक डोसा,रवा डोसा,पकौडा इत्यादी पदार्थ सहज उपलब्ध होतात.
कुठे राहाल:-
म्हैसूर हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने इथे पर्यटन पूरक सर्व सोयी सहज मिळतात.राहण्यासाठी हॉटेल चा जर विचार केला तर इथे बजेट नुसार हॉटेल सहज मिळतात.
कसे जाल:-
म्हैसूर ला हवाईमार्गाने,लोहमार्गाने किंवा रस्ता मार्गाने सहज जाता येते.बजेट व सोयीनुसार यातील कोणताही पर्याय निवडू शकता.
विमान सेवा:-
म्हैसूर साठी सर्वात जवळचा विमानतळ बंगुलुरू येथे असून १७० कि.मी.अंतरावर आहे.बंगुलुरू विमानतळ भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने देश-विदेशातील प्रमुख शहरांशी नियमित विमानसेवेने जोडला गेला आहे.बंगलुरू विमानतळावरून म्हैसूर साठी कॅब/मोटारी सहज मिळतात.
रेल्वे सेवा:-
म्हैसूर येथे रेल्वेस्टेशन असून भारतातील सर्व प्रमुख शहरातून म्हैसूर साठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.म्हैसूर रेल्वे स्टेशन शहरापासून दोन कि.मी.अंतरावर आहे.बंगलुरू रेल्वे स्टेशन वरून म्हैसूर साठी दररोज १७ रेल्वे धावत असतात.कमी खर्चात जलद गतीने म्हैसूर ला जाण्यासाठी पर्यटक रेल्वेला प्राधान्य देतात.
मुंबई-पुण्यावरून म्हैसूर ला जाणाऱ्या रेल्वेगाड्या पुढीलप्रमाणे
म्हैसूर फेस्टिवल स्पेशल (ट्रेन क्र.०६२०९)
शरावती एक्स्प्रेस (ट्रेन क्र.११०३५)
म्हैसूर हमसफर एक्स्प्रेस (ट्रेन क्र.१९६६७)
अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस (ट्रेन क्र.१६२०९)
रस्ता सेवा:-
म्हैसूर हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,केरळ,तामिळनाडू राज्यातून म्हैसूर साठी आरामबस नियमितपणे सेवा देत असतात.
बंगलुरू,उटी,कोचीन इत्यादी शहरातून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सहज मिळतात.पुणे ते म्हैसूर हे अंतर ८६८ कि.मी.तर मुंबई ते म्हैसूर हे अंतर १०११ कि.मी.आहे.पुणे-मुंबई-कोल्हापूर-सोलापूर इत्यादी ठिकाणा वरून म्हैसूर साठी अनेक आरामबसेस दररोज सेवा देतात.
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा