google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : तंजावर | Tanjavur

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

तंजावर | Tanjavur


तमिळनाडूमधील तंजावरचा इसवी सन ८००पूर्वीचा इतिहास फारसा ज्ञात नाही, पण चोला राजवटीपासून हे गाव जगाच्या नकाशावर गेले. तंजावर हे नाव तंजन नावाच्या दैत्यावरून पडले असावे. नीलमेघ पेरुमल या विष्णूच्या अवताराने त्याचा नाश केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. ‘Thancheiur’ या शब्दापैकी Than म्हणजे थंड, Chei म्हणजे शेतजमीन आणि Ur म्हणजे गाव, त्यापासून Thanjavur (तंजावूर) असे नाव तयार झाल्याचेही सांगितले जाते. तंजावूर असे त्याचे नाव असले, तरी तंजावर असे नाव सर्वत्र वापरले जाते. चोला घराण्यातील राजांनी येथे ४०० वर्षे राज्य केले.


तंजावर इतिहास:-

तंजावर तामिळनाडूतील एक जिल्हा सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली. ती 1855 पर्यंत टिकली पुढे इंग्रज सत्ता सुरू झाली. भोसले वंशातील सरफोजी राजे 1878 ते 1932 हे थोर राजे होऊन गेले. सरस्वती महाल हे प्रख्यात ग्रंथालय निर्मिती केली. जगातील सर्वात मोठा शिलालेख त्यांनीच येथील प्रख्यात अशा बृहदेश्वर मंदिरात कोरविला आहे. त्यात भोसले वंशाचा इतिहास मराठीत दिलेला आहे. 


हे शहर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे.येथील सुबह्याण्य मंदिर प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात भव्‍यतम असे बृहदीश्वर मंदिर सुबद्ध, प्रेक्षणीय असे महत्त्वपूर्ण आहे 


बृहदीश्वर मंदिर :

ऐतिहासिक आणि धार्मिक, तसेच दाक्षिणात्य चोल स्थापत्याचे उदाहरण म्हणजेच बृहदीश्वर मंदिर. २०० फूट उंच अशा या मंदिराला ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे. 


विविध राजवटींच्या कालावधीतील सुमारे ७०० शिलालेख येथे आहेत. चोल घराण्यातील राजा अरुलमोशीवर्म अथवा प्रथम राजराजे चोल याने याची निर्मिती केली आहे. म्हणून या मंदिराला राजराजेश्वर मंदिर असेही संबोधले जाते. 


वास्तुकला, पाषाण व ताम्रपटावरील शिलालेख, प्रतिमा विज्ञान, चित्रांकन, नृत्य, संगीत, आभूषणे यांचा येथे खजिना आहे. या मंदिराचे एक अचंबित करणारे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला ८० टन वजनाचा, एकाच ग्रॅनाइट पाषाणातील घुमट (कलशाधार) आहे. एवढी प्रचंड शिळा कोणतीही यंत्रसामग्री नसताना १८० फूट उंचीवर कशी नेली असेल, याचा विचार करण्यासारखा आहे.


मंदिराचे वैशिष्ट्य :

  • मंदिरापासून ५० किलोमीटर त्रिज्येत ग्रॅनाइटची एकही खाण नसतानाही, ४४ एकरांवर पसरलेले हे मंदिर, संपूर्णपणे ग्रॅनाइट ह्या दगडात बांधले आहे! (हा हजारो टन ग्रॅनाइट कुठून आणला आणि कसा आणला, हे कोणालाही माहिती नाही.)
  • मंदिराच्या कळसाची उंची ६६ मीटर (२१७) फूट आहे! (सध्याच्या मापकांप्रमाणे २२ मजली इमारतीएवढी उंची आहे!)
  • मंदिराचा कळस आतून भरीव नाही आणि त्यात वापरलेले दगड हे कुठल्याही सिमेंट, काँक्रीट आणि/किंवा रसायनाच्या साह्याने एकमेकांवर बसवलेले नसून, सर्व दगड फक्त इंटरलॉकिंग पद्धतीने एकमेकांत गुंफून बसवले आहेत!
  • मंदिराच्या शिखरावरचा कळस हा तब्बल ८० टन वजनाचा आणि एकाच प्रचंड शिळेतून (मोनोलिथ) बनवला आहे!


गोपुरामधील नंदी

गोपुरामधील सुमारे २० फूट लांब, आठ फूट रुंद व ११ फूट उंच नंदी हेदेखील येथील वैशिष्ट्य आहे. संपूर्ण मंदिरासाठी एक लाख ३० हजार टन ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे. ८० टनी घुमट मंदिरावर चढविताना व मंदिर बांधताना सुमारे दोन-तीन किलोमीटर लांबीचा मातीचा रॅम्प करण्यात आला होता, असे उल्लेख आढळतात. 


या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दुपारी या देवळाच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही, अशी त्याची रचना आहे. भव्य, कलात्मक आणि दाक्षिणात्य पद्धतीची उत्तुंग गोपुरे हे मंदिराचे आणखी वैशिष्ट्य.


नृत्यमुद्रा

शिव ही संगीत, नृत्य यांची देवता असल्याने शैवांच्या अनेक प्रकारातील नृत्यमुद्रा येथे बघण्यास मिळतात. कटिसम, चतुर, ललित, तलसस्फोटित, भुजंगत्रसित ऊर्ध्वजानू, ललाटतिलकनादांत अशा अनेक प्रकारच्या मुद्रा येथे पाहायला मिळतात.  

असे सांगितले जाते की पूर्वी ४०० नर्तिका मंदिराबाहेरील प्रागंणात नृत्य करून राजाला मानवंदना देत असत..


सरस्वती महाल पुस्तक संग्रहालय

येथे ३० हजार पुस्तके आहेत. त्यात जुने संस्कृत ग्रंथ, ताम्रपट, ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. ज्यावरून शिवचरित्र सर्वच इतिहासकारांनी मान्य केले, त्या परमानंदकृत ‘शिवभारत’ या दुर्मीळ ग्रंथाची मूळ प्रत येथे सापडली. 

हा ग्रंथ शिवचरित्राचा आधार मानला जातो. सदाशिव महादेव दिवेकर यांनी १९२१मध्ये ते प्रथम प्रकाशित केले. त्या वेळची सहा रुपये किमतीची प्रत माझ्या वैयक्तिक संग्रहात आहे. 


शिवभारताचा शोध घेतानाची एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे. दिवेकर जुन्या संदर्भ ग्रंथांचा शोध घेत होते, त्या वेळी हा ग्रंथ तंजावर येथील ग्रंथालयात असल्याची माहिती त्यांना लिपझिग येथील जर्मन ओरिएन्टल सोसायटी या पौर्वात्य ग्रंथ ठेवणाऱ्या संस्थेने दिली. यावरून या ग्रंथालयाची माहिती पाश्चिमात्य राष्ट्रांतील विद्वानांना होती, हे दिसून येते.


या ग्रंथालयात संस्कृत, तमिळ, मराठी व तेलुगू या भाषांतील अनेक विषयांवरील ग्रंथ असून, त्यामध्ये ज्योतिष, आयुर्वेद, अभियांत्रिकी आदी विषयांचा समावेश आहे. दुर्मीळ असे, पर्णपत्रावरील जीर्ण झालेले सात ते आठ हजार ग्रंथही येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत.


कलादालन

चोल, पल्लव, नायक कालीन वस्तूंचा जणू खजिनाच येथील कलादालनात आहे. तेथे सुंदर अशी पाषाणातील, तसेच कांस्यशिल्पे पाहण्यास मिळतात.


सरफोजीराजे भोसले यांचा पुतळा, नटराजांच्या विविध राजवटीतील मूर्ती, तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात.


शिवगंगा गार्डन

येथे छोटे प्राणिसंग्रहालय आहे, तसेच बोटिंगचीही व्यवस्था आहे. तेथे छोटी केबलकारही आहे.


श्वार्टझ् चर्च 

हे चर्च सरफोजीराजे भोसले यांनी रेव्हरंड सी. व्ही. श्वार्टझ् यांच्या स्मरणार्थ उभारले.


त्यांनी सरफोजीराजेंना राज्य परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.



तंजावरच्या आसपासची ठिकाणे :

मनोरा:-

हे ठिकाण तंजावर जिल्ह्यात दक्षिणेकडे समुद्रकिनारी आहे. सरफोजीराजे भोसले यांनी ब्रिटिशांच्या नेपोलियनवरील वॉटर्लूच्या विजयाप्रीत्यर्थ सन १८१४मध्ये येथे किल्ला बांधला असून आठमजली मनोराही बांधला आहे.


 हे सहलीचे एक ठिकाण झाले आहे. २००४मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये त्याचे थोडे नुकसान झाले होते. हे ठिकाण तंजावरपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे.


कुंभकोणम : 

कुंभकोणम हे नारळासांठी तर प्रसिद्ध आहेच, ते नागेश्वरस्वामी मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. 


चोला राजा आदित्य याने नवव्या शतकात ते बांधले. कुंभकोणम येथे १८८ देवळे आहेत. त्यामुळे त्याला ‘सिटी ऑफ टेम्पल्स’ असे म्हटले जाते. हे ठिकाण तंजावरपासून ३६ किलोमीटर अंतरावर आहे.


दारासुरम : 

कुंभकोणमजवळ असणारे हे गाव रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. 


राजेंद्र चोला याने बांधलेले ऐरावतेश्वर मंदिरही बघण्यासारखे आहे. हे ठिकाण तंजावरपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे.


अतिरपट्टणम बंदर : 

हे इस्लाम धर्माचे पवित्र ठिकाण असून, येथे अल्लाउद्दीनसाहेब दर्गा आहे. हे ठिकाण तंजावरपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे.


**तंजावरचे संकेतस्थळ** : 

महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतामध्ये मराठी भाषा आणि संस्कृतीची पताका डौलाने फडकावत ठेवणारे तंजावर येथील राजघराणे आता आधुनिकतेची कास धरून माहितीच्या मायाजालात प्रवेश करत आहे. तंजावर राजघराण्याचे संकेतस्थळ (वेबसाइट) विकसित करण्यात आली असून तंजावर राजघराण्याची माहिती जगभरातील लोकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहे.


काय खरेदी कराल:-

तंजावर हे रेशीम उद्योगाचे प्रमुख ठिकाण आहे. त्यामूळे येथे रेशमी वस्त्र खूप सुंदर मिळतात.येथील कुंभकोणमचे नारळही प्रसिद्ध आहेत. 

तंबोरा, वीणा, व्हायोलिन अशा अनेक वाद्यांची निर्मिती येथे होते. तंजावरची चित्रशैली कला क्षेत्रात खूपच प्रसिद्ध आहे. 

येथील चित्रांचा दर्जा उत्तम असल्यामुळे पर्यटकांची पसंती असते. येथे पंचधातूंच्या मूर्ती, तसेच पूजासाहित्यही मिळते.


कधी जाल:-

या ठिकाणाला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे.


कसे जाल:-

विमान सेवा:-

तंजावरला जवळचा असलेला विमानतळ त्रिची येथे असून, त्याचे तंजावरपासूनचे अंतर ५८ किलोमीटर आहे. 


रेल्वे सेवा:-

तंजावर हे रेल्वेने चेन्नई व मदुराई कोईमतुर, तिरुचिरापल्ली, सालेम, रामेश्वरम्, त्रिची,या ठिकाणांना जोडलेले आहे. 


रस्ता सेवा:-

बंगलोर, चेन्नई, मदुराई, कोईमतुर,तिरुचिरापल्ली तसेच तमिळनाडूतील प्रमुख शहरांनाही तंजावर रस्त्याने जोडलेले आहे. खाजगी तसेच सरकारी बस सेवा नियमित उपलब्ध आहेत.


जल सेवा:-

चेन्नई बंदर हे तंजावर येथील जवळचे बंदर आहे. येथील काही जहाज कंपन्या पर्यटकांना जल सेवा उपलब्ध करून देतात. जहाजाने चेन्नई बंदरावर येऊन तिथून तंजावर पर्यंत टॅक्सी किंवा बस सेवा उपलब्ध आहेत.ज्या ज्या पर्यटकांना जल मार्गाने जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा एक सुंदर पर्याय उपलब्ध आहे.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती आम्हाला थेट मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...