google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : कामाख्या देवी | Kamakhya Devi

माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

कामाख्या देवी | Kamakhya Devi

आसाम ची राजधानी दिसपूर पासून जवळच व उत्तर-पूर्व भारताचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या गुवाहाटी पासून पश्चिमेला ८ कि.मी.अंतरावर नीलांचल पर्वतावर कामाख्या देवीचे प्रसिद्ध असे मंदिर आहे.भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेले कामाख्या मंदिर सर्वात जुने मानले जाते तसेच हे मंदिर तांत्रिक विद्येचे मुख्य केंद्र म्हणूनही ओळखले जाते.देवीच्या मासिक पाळी मुळे हे मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.


कामाख्या देवी बाबतची पौराणिक कथा | Kamakhya temple story 

पौराणिक कथांच्या अनुसार माता सती ही शंकराची मोठी भक्त होती.तिची इच्छा होती की,तिचा विवाह भगवान शंकराशी व्हावा.तिने आपली ही इच्छा शंकरांना बोलून दाखवली व विवाह केला.तिच्या या निर्णयावर वडील राजा दक्ष नाराज होते.एकदा दक्ष राजाच्या दरबारात यज्ञाचे आयोजन केले होते पण शंकराला यज्ञाचे आमंत्रण दिले नाही.देवी सती तडक आपल्या पित्याच्या घरी गेली.दरबारात दक्ष राजाने शंकराचा अपमान केला.आपल्या पतीचा झालेला अपमान देवी सतीला सहन झाला नाही व तिने यज्ञ कुंडात उडी घेतली.यामध्ये सतीचा मृत्यू झाला.जेंव्हा शंकराला हे समजले तेंव्हा ते यक्ष राजाच्या दरबारात जाऊन सतीचे शव दोन्ही हातावर घेऊन तांडव करू लागले.पृथ्वीला कंप सुटू लागला भयभीत झालेल्या देवांनी विष्णूला साकडे घातले.यावेळी विष्णूने सुदर्शन चक्र सोडून सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले.हे सर्व तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले.त्यापैकी देवी सतीच्या योनीचा भाग नीलांचल पर्वतावर जाऊन पडला.जिथे कामाख्या देवीचे मंदिर उभारण्यात आले.


कामाख्या देवीच्या मंदिराबाबत काही मनोरंजक गोष्टी| Interesting facts about Kamakhya temple


  • आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे भारतातील एकमात्र असे मंदिर आहे की,जिथे देवीच्या मूर्तीचे नाही तर देवीच्या योनीचे पूजन केले जाते.
  • कामाख्या देवी च्या मासिक पाळी चा कालावधी संपल्यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमा होते.
  • माता कामाख्याचे मंदिर दशमहादेवता जसे की,त्रिपुरा सुंदरी,मातंगी,कमला,काली,तारा,भुवनेश्वरी,बगलामुखी,छिन्नमस्ता,भैरवी,भूमावती यांना समर्पित आहे.
  • कामाख्या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे ज्यावेळी देवीचा मासिक धर्म चालू असतो त्यावेळी जलकुंडातील पाण्याचा रंग लालसर होतो.
  • कामाख्या मंदिर परिसरात कामेश्वर,सिद्धेश्वर,केदारेश्वर,अमृतेश्वर व अघोरा ही पाच शिव मंदिरे आहेत.
  • कामाख्या मंदिर नीलांचल नावाच्या उंच पर्वतावर असून हा पर्वत नावाप्रमाणेच निळसर आहे.
  • कामाख्या देवी मासिक पाळी साठी प्रसिद्ध आहे.दर वर्षी आषाढ महिन्याच्या सातव्या दिवशी देवीची मासिक पाळी सुरु होते.ज्या दिवशी ही मासिक पाळी संपते तिथून पुढे चार दिवस मोठ्या यात्रेचे आयोजन होते.
  • दरवर्षी आषाढ महिन्यात कामाख्या मंदिराच्या परिसरात मोठी यात्रा भरते. “अम्बुबाची”यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे.देश भरातून भाविक या यात्रेसाठी जमा होतात.
  • कामाख्या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे जेंव्हा देवीची मासिक पाळी सुरु होणार असते त्या अगोदर गर्भग्रहात सफेद वस्त्र अंथरले जाते व गर्भग्रहाचे दरवाजे बंद केले जातात.
  • ज्या वेळी हे दरवाजे उघडले जातात त्यावेळी हे सफेद वस्त्र संपूर्ण लालरंगात रंगलेले असते.
  • यात्रेला येणाऱ्या भाविकांना या वस्त्राचे तुकडे प्रसाद म्हणून दिले जातात.हा प्रसाद मिळवण्यासाठी अनेक भाविक रांगेमध्ये बराच काळ उभे असतात
  • कामाख्या मंदिर पशु बळी साठी प्रसिद्ध आहे.यात्रेच्या वेळी इथे अनेक पशूंची बळी दिली जाते.सर्व पशु नर पशु असतात.मादा पशूंची बळी इथे दिली जात नाही
  • कामाख्या मंदिर तंत्र विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते.प्रसिद्ध आम्बुबाची यात्रेच्या वेळी देशभरातील तांत्रिक देवीच्या दर्शनाला येतात


कामाख्या देवीच्या दर्शनाच्या वेळा :-

कामाख्या देवीच्या मंदिराचे दरवाजे पहाटे पाच वाजता उघडले जातात.पहाटे साडेपाच ते साडेसहा या काळात देवीला स्नान व नित्यपूजा संपन्न होते.सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी गर्भगृहाचे दरवाजे उघडले जातात.दुपारी एक वाजता नैवेद्य दाखवून दरवाजे पुन्हा बंद केले जातात.व नैवेद्याचा प्रसाद भक्तांना वाटला जातो.दुपारी अडीच वाजता दरवाजे पुन्हा उघडले जातात.सायंकाळी सात वाजता आरती होऊन दरवाजे बंद केले जातात.

 

राहण्याची सुविधा:

कामाख्या मंदिर हे भारतातील ५१ प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असल्याने वर्षभर भाविक दर्शनाला येतात.या मंदिराच्या परिसरात अनेक भक्तनिवास असून एका कुटुंबासाठी ३०० ते ५०० पर्यंत साधारण खोली व ५०० ते ८०० पर्यंत वातानुकुलीत खोली मिळू शकते.तसेच गुवाहाटी शहरामध्ये रेल्वे स्टेशन पासून जवळ पलटण बाजार परिसरात कमी बजेट पासून जास्त बजेट पर्यंत सर्व प्रकारची हॉटेल्स उपलब्ध आहेत.


कसे जाल:-

नॉर्थ-ईस्ट भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुवाहाटी पासून कामाख्या मंदिर फक्त ८ कि.मी.अंतरावर आहे.गुवाहाटी हे शहर देशभरातील सर्व प्रमुख शहरांशी दळणवळणाच्या सोयींनी जोडले आहे. खालीलपैकी कोणतेही माध्यम वापरून कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊ शकता

विमान सेवा:-

कामाख्या मंदिरापासून जवळच १३ कि.मी.अंतरावर गुवाहाटी चा गोपीनाथ बोरडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देश-विदेशातील प्रमुख शहरांशी नियमित विमानसेवेने जोडला गेला आहे.मुंबई,पुणे,नागपूर येथून गुवाहाटी साठी नियमित विमानसेवा उपलब्ध असते.विमानतळावरून गुवाहाटी सिटी सेंटर साठी वातानुकुलीत बस सेवा तसेच कॅब उपलब्ध असतात.


रेल्वे सेवा:-

कामाख्या येथे रेल्वे स्टेशन असून गुवाहाटी किंवा दिब्रुगड च्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे कामाख्या स्टेशनवर थांबतात.तसेच गुवाहाटी रेल्वे स्टेशन सुद्धा कामाख्या मंदिरापासून खूप जवळ आहे.या दोन्ही रेल्वे स्टेशन वरून कामाख्या मंदिराकडे जाण्यासाठी बस रिक्षा उपलब्ध होतात.


रस्ता सेवा:-

गुवाहाटी हे शहर रस्ता मार्गाने देशातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे.आसाम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आसपासच्या राज्यांना नियमित सेवा देतात.अदबारी,पलटण बाजार किंवा ISBT बस डेपो इथून बस सेवा सहज उपलब्ध होते.


लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



































 

४ टिप्पण्या:

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...