google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : अरुणाचल प्रदेश |Arunachal Pradesh

माझी ब्लॉग सूची

शनिवार, ५ मार्च, २०२२

अरुणाचल प्रदेश |Arunachal Pradesh

 निसर्गाचे भरभरून वरदान मिळालेले राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे.रम्य अशी बर्फाच्छादित पर्वत शिखरे,खोल दऱ्या,हिरवीगार कुरणे,शांत व नितळ पाण्याची सरोवरे,प्राचीन संस्कृती जतन करून असलेल्या जमाती,बौध्द मठ असे सर्व काही पर्यटकांना खुणावत असतात.


अरुणाचल प्रदेश या संस्कृत मधील शब्दांचा अर्थ होतो “उगवत्या सूर्याचा प्रदेश”.अरुणाचल प्रदेशच्या दक्षिणेला आसाम,उत्तरेला चीन,पूर्व-उत्तरेला म्यानमार,व पश्चिमेला भूतान यांच्या सीमा आहेत.


अरुणाचल ला भारताचे ‘ऑर्किड राज्य’ (Orchid State of India)म्हणूनही ओळखले जाते.वनस्पतिशास्त्रज्ञांसाठी हा भाग स्वर्गासमान आहे.५०० हून अधिक पक्षांच्या प्रजाती अरुणाचल प्रदेश मध्ये आढळतात,त्यापैकी बऱ्याच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अरुणाचल प्रदेश ची केलेली यात्रा चिरंतर स्मरणात राहते

अरुणाचल प्रदेश चा इतिहास : History of Arunachal Pradesh 

अरुणाचल प्रदेश मधील लोकांचा इतिहास अकराशे वर्षे जुना आहे.इथल्या स्थानिक जनजातीच्या लोकांचा भूतान,चीन,तिबेट व म्यानमार च्या लोकांची असलेला घनिष्ट संबंध दिसून येतो.जवळजवळ १५ लाख इतकी लोकसंख्या असलेल्या तानी जनजातीचे निशी,आदी,गालो,अपातानी,तागीण असे उपप्रकार पडतात.हे लोक प्राचीन काळी तलवार व इतर धातूची शस्त्रे यांची विक्री तिबेट च्या लोकांना करत व त्या बदल्यात मांस आणि लोकर घेत असत.अरुणाचल च्या उत्तरेला १९१३-१४ मध्ये आखण्यात आलेली मॅकमोहन रेषा भारत व चीन दरम्यानची सीमारेषा म्हणून ओळखली जाते.अरुणाचल च्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा पर्यटन उद्योगावर अवलंबून असून दरवर्षी लाखो लोक अरुणाचल ला पर्यटनासाठी येतात.


अरुणाचल प्रदेश मधील प्रमुख पर्यटन स्थळे : Tourist Places in Arunachal Pradesh 


1)इटानगर : Itanagar 

अरुणाचल प्रदेश ची राजधानी असलेले इटानगर हे एक लहानसे पण खूपच सुंदर शहर आहे.हिमालयाच्या तराई क्षेत्रात वसलेले हे शहर समुद्रसपाटीपासून ३५० मी उंचीवर आहे.


जवळच असलेल्या इटा या किल्ल्यावरून इटानगर हे नाव पडले.इटानगर मध्ये लाकडी खेळणी,वस्तू,वाद्ये तसेच हस्तकलेच्या वस्तू मोठ्याप्रमाणात तयार होतात.


2)तवांग: Tawang


तवांग हे अरुणाचल प्रदेश मधील प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे.आपल्या अमाप निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक स्मारकांमुळे तवांगला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.तवांग ची समुद्रसपाटीपासून ची उंची ३०४८ मीटर इतकी आहे.हिमालय पर्वताच्या उतारावर वसलेले हे शहर खूपच विलोभनीय आहे.


तवांग चा मठ खूप मोठा असून दलाई लामा यांचे जन्मस्थान या ठिकाणी आहे.तवांग मधील बौध्द मठ (Monastery)वॉर मेमोरियल,जायंट बुद्धा,टीपी ऑर्कीड अभयारण्य या स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात.तर तवांग पासून जवळच असलेल्या माधुरी लेक,जुंग धबधबा व भारत-चीन सीमेवरील बूम-ला पास ला भेट देणे आवश्यक ठरते.


कसे जाल:-

तवांग ला जाण्यासाठी गुवाहाटी व तेजपूर वरून पब्लिक सुमो पहाटे सूटतात व सायंकाळी तवांग ला पोहोचतात.तसेच या दोन्ही ठिकाणहून भाड्याने मोटार घेऊनही तुम्ही तवांग ला जाऊ शकता.

तवांगला जाण्याचा मार्ग हा भारतातील प्रमुख रोमांचकारी मार्गांपैकी एक असून हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय असा ठरतो.तवांग साठी जवळचे रेल्वेस्टेशन व विमानतळ गुवाहाटी या ठिकाणी आहे.


3)सेला पास : Sela pass 

 सेला पास ही खिंड उंच अशा पर्वतावर असून तवांगला बाकी भारताशी जोडते. सेला पास ची समुद्र सपाटीपासून ची उंची १३७०० फुट इतकी आहे.ही खिंड वर्षभर बर्फाच्छादित असते.सेला नामक तलावावरून या खिंडीचे नाव ठेवण्यात आले.


बौध्द धर्मात या तलावाला महत्त्वाचे स्थान असून हिवाळ्यात हा तलाव गोठलेल्या अवस्थेत असतो.सेला पास चा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून पर्यटक न चुकता या ठिकाणाला भेट देतात.सभोवताली बर्फाच्छादित पर्वत शिखरे,निळेशार आकाश व जवळून वाहणारे ढग या मुळे सेला पास ला भेट देणे पर्यटक पसंद करतात.


कसे जाल:-

 सेला पास ही खिंड तवांग च्या मार्गावर आहे.तवांगला जाताना  या ठिकाणी काही वेळ घालवू शकता.


4)झिरो :ziro 

अरुणाचल प्रदेश ची राजधानी इटानगर पासून ११५ कि.मी. अंतरावर झिरो हे गाव आहे.अपातानी जन समुदायाचे निवास असलेले झिरो हे गाव जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.


अरुणाचल प्रदेश मधील इतर जमातींपेक्षा वेगळेपणा असलेल्या या जमातीच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी पर्यटक झिरो ला भेट देतात.विपुल वन संपदेबरोबरच भात शेती असलेला हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.


दरवर्षी नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात साजरा होणारा झिरो संगीत उत्सव (Ziro Festival of Music) पर्यटकांमध्ये लोकप्रिय असून या काळात अनेक पर्यटक देश-विदेशातून या उत्सवासाठी झिरो ला हजेरी लावतात.


कसे जाल:-

झिरो साठी जवळचे रेल्वेस्टेशन नहरलगून व नॉर्थ लखीमपुर ही आहेत.जवळचा विमानतळ जोरहाट हा आहे.झिरो साठी गुवाहाटी हून रात्रीची बस सुटते.


5)पासीघाट : Pasighat 

अरुणाचल च्या पूर्व सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले पासीघाट हे नितांत सुंदर ठिकाण आहे.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पासीघाट ची उंची समुद्रसपाटी पासून १५५ मीटर आहे.



अरुणाचल प्रदेश मधील प्रमुख जनजाती असलेल्या आदि समुदायाचे लोक पासीघाट इथे मोठ्या प्रमाणात राहतात.त्यांचे राहणीमान,वेशभूषा,अन्न पदार्थ,व्यवसाय इत्यादींची माहिती घेण्यासाठी पासीघाट ला पर्यटक भेट देतात.तसेच इथले प्रसिध्द देईंग इरिंग वनउद्यान,बौध्द मंदिर,सियांग आणि सियोम नद्यांचा संगम,कोमसिंग ही काही प्रसिध्द पर्यटन स्थळे आहेत.

कसे जाल:-

 पासीघाट साठी जवळचे रेल्वेस्टेशन मुरकोंग सेलेक हे असून ३५ कि.मी. अंतरावर आहे.तर इटानगर,तिनसुकिया,दिब्रुगड या ठिकाणहून बसेस सुटतात.


6)अनिनी : Anini 

अरुणाचल प्रदेश च्या दिब्रुगड या शहरापासून १४५ कि.मी.अंतरावर असलेले अनिनी हे लहानसे गाव प्राकृतिक सौंदर्य,शांतता व बाजारीकरणा पासून दूर असलेले पर्यटन स्थळ आहे.



ट्रेकर्स लोकांसाठी अनिनी हे नंदनवन आहे,कारण इथे अनेक पर्वत शिखरे असून ट्रेकिंग चे मार्ग विकसित करण्यात आले आहेत.


कसे जाल:-

अनिनी साठी जवळचा रेल्वेस्टेशन दिब्रुगड असून दिब्रुगड,तिनसुकिया,रोइंग या ठिकाणहून पब्लिक सुमो मिळतात.


7)भालुकपोंग : Bhalukpong 

भालुकपोंग ला अरुणाचल प्रदेश चे प्रवेशद्वार म्हटले जाते.तेजपूर या शहरापासून ५६ कि.मी.अंतरावर असलेले भालुकपोंग पश्चिम कामेंग जिल्ह्यात येते. भालुकपोंग चा संबंध महाभारत काळाशी जोडला जातो.


घनदाट जंगल व कामेंग नदी चे खळाळते पाणी यामुळे भालुकपोंग अरुणाचल मधील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.या ठिकाणी,ट्रेकिंग,राफ्टींग,रिव्हर क्रॉसिंग सायकलिंग असे साहसी क्रीडाप्रकार अनुभवण्यासाठी पर्यटक भेट देतात. 


भालुकपोंग पासून जवळच प्रसिध्द असे पाखुई वन उद्यान आहे.जर तुम्ही मार्च महिन्यात भालुकपोंग ला भेट देऊ शकत असाल तर इथला स्थानिक नैठेडोव उत्सव अनुभवू शकता.


कसे जाल:-

 भालुकपोंग साठी जवळचा विमानतळ गुवाहाटी तर जवळचे रेल्वेस्टेशन तेजपूर हे असून गुवाहाटी व तेजपूर वरून बसेस कॅब सहज मिळतात.


8) तेझू : Tezu 

अरुणाचल प्रदेश मधील तेझू हे पर्यटन स्थळ आपल्या अद्वितीय निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना आकर्षित करून घेते.अरुणाचल प्रदेश मधील तिनसुकिया या शहराशी रस्ता मार्गाने जोडले गेले आहे.


नयनरम्य भूप्रदेश असलेल्या या भागात हिरव्यागार गवताच्या टेकड्या,निळ्याशार पाण्याचे प्रवाह व कमी-अधिक उंचीची झाडेझुडुपे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.इथे असलेली मिश्मी जमात आपल्या चालीरीती व परंपरा साठी प्रसिध्द आहे.शहरीकरणाचे वारे न लागलेले हे लोक पर्यटकांचे आपुलकीने स्वागत करतात.इथे  अनेक धाडसी खेळ प्रकार करू शकतो.


कसे जाल:-

तिनसुकिया वरून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस तसेच खासगी जीप सहज मिळतात.जवळचा विमानतळ व रेल्वेस्टेशन दिब्रुगड या ठिकाणी आहे


9)तुतिंग : Tuting 

अरुणाचल मधील तुतिंग हे एक आदर्श ठिकाण आहे.इथे ट्रेकिंग चे अनेक मार्ग पाहायला मिळतील.सोपे,मध्यम तसेच आव्हानात्मक श्रेणीतील ट्रेक  इथे करू शकता.


सियांग नदीमधील रिव्हर राफ्टींग एक वेगळाच अनुभव देते.अरुणाचल मधील ,ग्रामीण जनजीवन अभ्यासण्यासाठी तसेच पक्षी निरीक्षणासाठी तुतिंग ला पर्यटक भेट देतात.


कसे जाल:-

तुतिंग साठी पासीघाट इथून बस तसेच कॅब मिळतात.जवळचे रेल्वेस्टेशन मुरकोंगसेलेक हे असून जवळचा विमानतळ दिब्रुगड या ठिकाणी आहे.


10) मेचुका : Mechuka 

अरुणाचल प्रदेश मधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेले मेचुका लहानसे शहर भारत-चीन सीमेजवळ आहे.समुद्र सपाटी पासून मेचुका १८२९ मीटर उंचीवर वसलेले आहे.जवळूनच वाहणारी निळसर पाण्याची सियोम नदी मेचुकाचे सौंदर्य अधिकच खुलवते.सभोवताली बर्फाच्छादित पर्वत शिखरे व हिरवीगार गवताळ कुरणे यामुळे मेचुका पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.


बौध्द मठामध्ये उच्चारले जाणारे मंत्र दूरवर ऐकू येतात.मेम्बा जनजातीचे प्रमुख निवासस्थान असल्यामुळे मेचुका हे ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे.शहराजवळच्या टेकडीवर असलेला सम्तेन योन्ग्चा मठ ४०० वर्षे जुना असून या मठामध्ये जतन करून ठेवलेल्या ममी पाहता येतात.


 फेब्रुवारी महिन्यात अरुणाचल ची भटकंती करणार असाल तर,या काळात मेचुका इथे साजरा होणारा लोसार उत्सव अजिबात चुकवू नका.तसेच एप्रिल महिन्यात साजरा केला जाणारा मोपीन उत्सव पर्यटकांसाठी पर्वणी असते.विविध सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर केले जातात,ज्यामध्ये अरुणाचल प्रदेशातील प्राचीन संस्कृती व विविध जनजाती यांच्या परंपरा पाहता येतात.हायकिंग,ट्रेकिंग,कॅम्पिंग असे अनेक प्रकार इथे अनुभवता येतात.


कसे जाल:-

 जवळचे रेल्वेस्टेशन लीलाबारी असून जवळचा विमानतळ दिब्रुगड या ठिकाणी आहे.


अरुणाचल प्रदेश मधील सण-उत्सव : Festivals of Arunachal Pradesh.

  • जिरो या ठिकाणी दरवर्षी सप्टेबर महिन्यात साजरा होणारा जिरो म्यूझिक फेस्टिवल स्थानिक संगीता ला प्रोत्साहन देण्यामध्ये महत्त्व पूर्ण भूमिका बजावतो.
  • तवांग इथे साजरा होणारा लोसार फेस्टिवल दोन आठवडे चालणारा उत्सव असून नव वर्षाच्या स्वागतावेळी साजरा केला जातो.
  • सांगकेन हा एक बौध्द धर्माच्या तत्वांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला जातो.
  • सोलुंग हा उत्सव अरुणाचल प्रदेश मधील शेती चा उत्सव असून स्थानिक प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात.याच बरोबर अनेक लहान-मोठे उत्सव स्थानिक जनजाती मध्ये साजरे केले जातात.


 कसे जाल:-

अरुणाचल प्रदेश हे जरी अति पूर्वेकडील राज्य असले तरी वाहतुकीच्या सर्व साधनांनी देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडले गेले आहे.


विमान सेवा:-

अरुणाचल प्रदेश साठी आसाम मधील तेजपूर विमानतळ सर्वात जवळचा असून राजधानी इटानगर पासून २५० कि.मी.अंतरावर आहे.तसेच गुवाहाटी विमानतळ ही अरुणाचल साठी सोयीचा असून पुणे व मुंबई सह देशाच्या सर्व प्रमुख शहरातून गुवाहाटी साठी थेट विमानसेवा उपलब्ध असते.अरुणाचल च्या पूर्वेकडील भागाला भेट देण्यासाठी आसाम मधील दिब्रुगड विमानतळ उपयुक्त आहे.


रेल्वे सेवा:-

अरुणाचल प्रदेश मध्ये रेल्वे मार्गांचा विकास सुरु आहे.सध्या या राज्यात भालुकपोंग,लेखापानी व तेलाम ही तीन रेल्वेस्टेशन असून भविष्यात अरुणाचल मधील अनेक ठिकाणे रेल्वेने जोडलीनहरलगून रेल्वे स्टेशन हे इटानगर साठी सर्वात जवळचे असून फक्त १५ कि.मी.अंतरावर आहे.गुवाहाटी वरून नहरलगून साठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.


रस्ता सेवा:-

अरुणाचल हे देशाच्या सर्व राज्यांशी रस्ता मार्गाने जोडले गेले असून या राज्यामध्ये रस्ता मार्गाने केलेला प्रवास संस्मरणीय असा असतो.गुवाहाटी(आसाम),शिलॉंग(मेघालय)दिब्रुगड (आसाम) इम्फाळ(नागालंड) या शहरातून अरुणाचल प्रदेशातील प्रमुख ठिकाणांसाठी इंटरस्टेट बसेस नियमित सेवा देत असतात.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...