ऐतिहासिक काळात मगध प्रांतामध्ये पाटलीपुत्रपासून जवळ स्थित असल्यामुळे गया हे एक मोठे शैक्षणिक केंद्र होते.
बोधगया हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात गया शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोधगया येथील महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. बोधगया, कुशीनगर, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.
जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (संबोधी/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध’ बनले, व ‘बुद्ध’ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले.
बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे.
पाली भाषेत या ठिकाणाला ‘बोधीमांद’ असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला ‘बोधीमांद–विहार’ असे म्हणतात. इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे.
ह्यूएनत्संग (इ. स. ६२९-६४८) ह्याच्या प्रवासवर्णनात मात्र येथील महाबोधी मंदिराची पूर्ण माहिती मिळते. त्याच्या येथील भेटीपूर्वी गुप्तकाळाच्या अवनतीनंतर येथील महाबोधी मंदिराची बांधणी इ. स. ५५० ते ६०० दरम्यान केव्हातरी झाली असावी. इ. स. ६०० मध्ये गौडाधिपती शशांकाने येथील वृक्ष तोडला पण पूर्णवर्मा या मगधाधिपतीने त्याची मुळे शोधून तो पुन्हा वाढविला इ. वर्णन ह्यूएनत्संगाच्या लेखनात मिळते. त्यानंतरही हा वृक्ष अनेक वेळा पडला आणि पुन्हा लावण्यात आला तथापी या बोधिवृक्षास २,६०० वर्षांची प्राचीन परंपरा आहे. तसेच मध्य युगात ब्रह्मदेश, श्रीलंका येथील राजांनी या देवळाचा जीर्णोद्धार केला व काही नवीन वास्तू याच्या परिसरात उभ्या केल्या आणि चैत्य बांधले.
महाबोधी मंदिर हे बोधिवृक्षाच्या पश्चिमेस प्राकारात बांधलेले भव्य मंदिर असून त्याची उंची सु. ५२ मीटर आहे. हे मंदिर दुमजली आहे. त्याचे विधान चतुरस्त्र असून शिखर वर निमुळते होत गेले आहे. त्यावर आमलक असून अगदी वरच्या बाजूस एक लहानसा स्तूप व छत्रावली आहे. शिखराच्या सर्व बाजूंना कोनाडे असून त्यांत मूर्ती बसविल्या आहेत. मंदिराच्या चारी कोपऱ्यांत या मुख्य मंदिराच्या प्रतिकृती बांधलेल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर पंचायतन वास्तूशैलीचा एक उत्कृष्ट नमुना समजले जाते.
बुद्धाच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेली अनिमेष, चंक्रमण, रत्नघर, अजपाल वृक्ष, मुचलिंद ऱ्हद, राजायतन, वज्रासन आदी काही स्थळे बोधिवृक्षाच्या आसमंतात आढळतात. मंदिराच्या परिसरात अनेक भग्नावशेष इतस्ततः पडलेले असून त्यांतील लहान मंदिरे, स्तूप व स्मृतिभंग यांचे अवशेष उल्लेखनीय आहेत.
भारहूत व येथील शिल्पांत नागराज व हत्ती हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत, अशी शिल्पे कठड्यावर खोदलेली आहेत. कठड्यावर काही ठिकाणी शिलालेख असून त्यांतून येथील वास्तूची बांधणी, डागडुजी इत्यादींची माहिती मिळते. स्तूपांतील कोनाड्यात बुद्धमूर्ती असून कठड्याच्या स्तंभांवर जातकातील व बुद्धजीवनातील प्रसंग चितारलेले आहेत. यांशिवाय विविध पशुपक्षी, फुले इत्यादींचे नक्षीकाम आढळते.
एकूण शिल्पांकनात कमळाचे ज्ञापक सर्वत्र आढळते. लहान स्तूपांवरही बुद्धमूर्ती खोदलेल्या असून स्तूपांची प्रतीकेही दिसतात. येथील शिल्पशैलीवर शुंग, कुशाण अशा विविध शैलींची छाप असून त्यांचे मिश्रण झालेले आढळते. त्यामुळे इथे कोणतीच विशिष्ट शिल्पशैली आढळत नाही.
विद्यमान महाबोधी मंदिराचा काही भाग इ.स. पू. १००-५० या काळातील असावा. त्याच्या भोवती नेहमीसारखी वर्तुळाकार वेदिका नसून ती चौकोनी आहे. ख्रिस्तपूर्व काळात उभारल्या गेलेल्या या मंदिराची डागडुजी व जीर्णोद्धार वेळोवेळी होत गेल्यामुळे विविध कालखंडातील बौद्धकलेची त्यातून ओळख होते. या मंदिरापासून बौध्दांच्या पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणा मिळत गेल्यामुळे ब्रह्मदेश, थायलंड इ. देशांतही त्याच्या प्रतिकृती उभारल्या गेल्याचे आढळते.
येथील शिल्पाकृती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भारहूतची परंपरा इथे अधिक खोलवर रुजल्याचे दिसते. शिल्पे अधिक नाट्यपूर्ण आहेत आणि कथाप्रसंगाचे शिल्पांकन कमी पाल्हाळिक आहे.
बुद्धाच्या जीवनावर आधारित प्रसंग तसेच ऐहिक जीवनातील प्रसंग- उदा., नवपरिणित वधू, वादक, नर्तक – इत्यादींचे शिल्पांकन येथे आढळते. येथील शिल्पे भारहूतसारखी चैतन्यपूर्ण नसली, तरी ती शिल्पांकनाचे प्रगत तंत्र दर्शविणारी आहेत.
महाबोधिमंदिराशिवाय बोधगयेत एक जगन्नाथ मंदिर आहे आणि जपान, चीन, थायलंड, ब्रह्मदेश, तिबेट इ. देशांचे स्वतंत्रपणे बांधलेले स्तूप आहेत. यांपैकी जपानी व थाई स्तूप भव्य असून त्यांच्या वास्तू कलात्मक आहेत व तेथील भित्तिचित्रेही प्रेक्षणीय आहेत. गावात एक पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय व जयप्रकाश उद्यान आहे. बौद्ध यात्रेकरुंसाठी बोधगयेत अनेक धर्मशाळा असून पश्चिमेस तीन किमी. वर मगध विद्यापीठ व संस्कृत महाविद्यालय आहे.
पुरातत्त्व खात्याच्या दक्षतेमुळे महाबोधिमंदिराची देखभाल सुव्यवस्थित असून उरलेल्या स्तूपांची व्यवस्था ते ते देश पाहतात. बौद्ध धर्मीयांचे आज हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र झाले आहे.
बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
कधी जाल:- बौध्द धर्म स्थळ असल्याने संपूर्ण जगभरातील लोकांची तोबा गर्दी असते. त्यामुळे वर्ष भर कधी ही भेट देऊ शकता.
कसे जाल:-
रस्ता सेवा:- जागतिक वारसा स्थान असल्याने बस सेवा, टॅक्सी, सुविधा उपलब्ध आहेत. गया,पाटणा, राजगीर, इथून बसेस उपलब्ध आहेत.
विमान सेवा:-
गया विमानतळ बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ आहे. येथून यांगून, भूतान, बॅंकॉक इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
रेल्वे सेवा:-
गया रेल्वे स्थानक हावडा-मुंबई व दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्गावर स्थित असून येथे दररोज राजधानी एक्सप्रेससह सुमारे १०० गाड्या थांबतात.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा