भारताच्या उत्तर-पूर्वेला हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम पर्यटकांना पर्यटनाचा पुरेपूर आनंद देते.सिक्कीम ची राजधानी असलेले गंगटोक हे शहर या राज्यातील सर्वात मोठे शहर असून जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर कांचनगंगा चे दर्शन या शहरातून घडते.
गंगटोक
ही सिक्कीम ची राजधानी असून सिक्कीम मधील सर्वात मोठे शहर आहे.समुद्रसपाटीपासून १४३७ मीटर उंचीवर असलेले हे शहर पर्वत उतारावर वसलेले असल्याने खूपच सुंदर दिसते.
या शहरातून कांचनगंगा पर्वत शिखराचे दर्शन होते.पारंपारिक लोकजीवन व आधुनिकता यांचा संगम या शहरात पाहायला मिळतो.
गंगटोक ला गेल्यानंतर एम.जी.रोड ला आवर्जून गेले पाहिजे.दिवसभर पर्यटकांच्या वर्दळीने हा परिसर गजबजून गेलेला असतो.विविध खाद्यपदार्थ,भेटवस्तू,लोकरी कपडे यांची खरेदी इथे केली जाते.या रोड वर साफसफाईचे विशेष ध्यान ठेवले जाते.पर्यटकांना आराम करण्यासाठी ठिकठिकाणी बैठकीची सोय असून मंद संगीताचा आनंद घेत पर्यटक इथे वेळ घालवतात.तसेच हनुमान टोक व गणेश टोक इथून आपण सूर्योदयाचा आनंद घेऊ शकतो.
कांचनगंगा पर्वत शिखरावर सूर्याची कोवळी किरणे पडल्यानंतर सुवर्णकिरणांनी पर्वतशिखर उजळून जाते.हे दृश्य पाहण्यासाठी गंगटोक मध्ये आलेले पर्यटक पहाटेपासून हनुमानटोक व गणेशटोक इथे गर्दी करतात.गंगटोक मध्ये पुष्पप्रदर्शन,सेंद्रिय भाजीपाला मार्केट,हिमालयन झुलोजीकल पार्क या ठिकाणांना पर्यटक आवर्जून भेट देतात
नथुला पास
सिक्कीम पर्यटनाला गेलेला पर्यटक नथुला खिंडीला भेट देतोच देतो.कारण भारत-चीन सीमेवर असलेली ही खिंड सामरिक,धार्मिक व व्यापारी दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे.भारत आणि तिबेट च्या स्वशासी प्रांताला जोडणाऱ्या या खिंडी जवळ भारत व चीन सैन्याचा बंदोबस्त असतो.
मानससरोवर यात्रेचा मार्ग म्हणून या खिंडीचे धार्मिक महत्त्व वाढलेले आहे.समुद्रसपाटीपासून १४२०० फुट उंचीवर असलेला हा भाग वर्षभर बर्फाच्छादित असतो.या ठिकाणी बर्फाळ पर्वत शिखरे,निसर्ग सौंदर्य,भारत व चीनी सैनिकांच्या छावण्या इत्यादी जवळून पाहता येते.
नथुला खिंडीला भेट देण्यासाठी गंगटोक शहरातून परवाना काढावा लागतो.नथुला साठी निवडलेल्या मोटारीचे चालक आपल्यावतीने हा परवाना काढतात.त्यामुळ वेळ व श्रम वाचतात.
बाबा हरभजन मंदिर
नथुला खिंडीच्या वाटेवर असलेले बाबा हरभजन मंदिर धार्मिकते बरोबरच ऐतिहासिक व देशप्रेमाची भावना जागृत करणारे स्थळ आहे.गंगटोक पासून ६४ कि.मी.अंतरावर असलेले व नथुला आणि जेलेपला या दोन खिंडीना जोडणाऱ्या रस्त्यावर असलेले हे मंदिर बाबा हरभजन यांची समाधीस्थळ म्हणून ओळखले जाते.
१९६८ मध्ये नथुला इथे चीन बरोबर झालेल्या चकमकीत बाबा हरभजन शहीद झाले.त्यानंतर वेळोवेळी वातावरणातील बदल व इतर धोक्यांची सूचना सैनिकांच्या स्वप्नात येऊन बाबांनी दिल्याची सैनिकांची भावना आहे.
भारतीय सैन्याचा कोणताही अधिकारी अथवा जवान या मार्गावरून जाताना बाबांना अभिवादन केल्याशिवाय पुढे जात नाही.त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले असून संपूर्ण देखभाल भारतीय सैन्याद्वारा केली.जाते.
नथुला लेक
गंगटोक पासून ४० कि.मी.अंतरावर नथुला च्या रस्त्यावर असलेले हे लेक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.नथुला खिंडीला जाताना व येताना पर्यटक या ठिकाणी आवर्जून थांबतात.
चोहोबाजूंनी उंचच उंच शिखरांनी वेढलेले हे सरोवर हिवाळ्यात गोठलेले असते.उन्हाळ्यात बर्फ वितळते व या सरोवरात पाण्याच्या रुपात जमा होते.इथे रंगीबेरंगी भूरूपे पाहायला मिळतात.
या तलावाच्या कडेने याक वर बसून रपेट मारणे व गरमागरम नुडल्स,मोमो,मक्याच्या कणसावर ताव मारणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
रूमटेक मठ
गंगटोक शहरापासून २३ कि.मी.अंतरावर असलेला रूमटेक मठ ३०० वर्षे जुना असून सिक्कीम मधील सर्वात जुना मठ म्हणून ओळखला जातो.
१९६६ मध्ये या मठाची पुनर्बांधणी करण्यात आली असून या मठामध्ये एक विद्यालय व ध्यान साधना केंद्र आहे.
या मठामध्ये मौल्यवान अशी बौध्द पेंटिंग असून बौध्द धर्माच्या कांग्युपा संप्रदायाशी संबंधित अनेक वस्तू व साहित्याचे जतन करून ठेवण्यात आले आहे.
युक्सोम
युक्सोम ला सिक्कीमची पहिली राजधानी मानले जाते.१६४१ मध्ये सिक्कीम चे राजा चोग्याल यांनी या ठिकाणी बौध्द मठाची स्थापना केली.
सिक्कीम मधील भुतिया समुदायासाठी युक्सोम हे धार्मिक स्थळ आहे.कांचनगंगा राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार या ठिकाणी असून माउंट कांचनगंगा च्या ट्रेकिंग साठी युक्सोम हा बेस कॅम्प आहे.
जगभरातील ट्रेकर्स या ठिकाणी ट्रेकिंग साठी येतात.इथल्या स्थानिक लोकांनी इको-टुरिझम या संकल्पनेचा अंगीकार केला असून युक्सोम हे सिक्कीम मधील इको-टुरिझम चे रोल मॉडेल मानले जाते.युक्सोम-झोन्गरी ट्रेक हा अत्यंत प्रसिध्द असून या घनदाट जंगल-स्वच्छ पाण्याचे तलाव व बर्फाच्छादित मार्ग यातून जाणारा हा ट्रेक कांचनगंगा शिखराच्या पायथ्याला समाप्त होतो.
पेलिंग
पश्चिम सिक्कीम जिल्ह्यात असणारे पेलिंग हे दिवसेंदिवस पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत असणारे पर्यटन स्थळ आहे.गंगटोक पासून ११५ कि.मी.व सिलीगुडी पासून १३५ कि.मी.अंतरावर असणाऱ्या पेलिंग ला ट्रेकर्स व साहसी पर्यटक आवर्जून भेट देतात.कांचनगंगा शिखराचे अगदी जवळून दर्शन इथून घेता येते.अनेक ट्रेकिंग रूट इथून निघतात.बर्फाच्छादित पर्वतशिखरांनी वेढलेले,असंख्य धबधबे असणारे व हिरव्यागार वनराईने नटलेले पेलिंग शहरीकरणापासून कोसो दूर आहे.या ठिकाणी राहण्यासाठी बजेट नुसार होम-स्टे किंवा रिसोर्ट उपलब्ध असतात.
पेलिंग जवळ राब्देन्त्से महालाचे अवशेष,पेम्यान्स्ते मठ,रिम्भी धबधबा,कांचनगंगा धबधबा,सांगा चोलिंग मठ इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.
जवळच स्काय- वॉक तयार करण्यात आला असून भारतातील पहिला स्काय- वॉक म्हणून प्रसिध्द आहे.पारदर्शक काचेच्या स्काय- वॉक वरून चालत खालील परिसर न्याहाळणे हा विलक्षण अनुभव इथे घेता येतो
गुरुडोंगमार
सिक्कीम मधील प्रमुख पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून गुरुडोंगमार लेक प्रसिध्द आहे. हे सरोवर उत्तर सिक्कीम मधील लाचेन जवळ असून समुद्रसपाटीपासून ५४३० मीटर उंचीवर आहे.
असे मानले जाते की,ज्यावेळी गुरुनानक तिबेट ला चालले होते त्यावेळी पाणी पिण्यासाठी गोठलेल्या या बर्फावर काठीने छिद्र पाडून आपली तहान भागवली.तेंव्हा या ठिकाणी सरोवराची निर्मिती झाली व आजही भीषण थंडीतही या सरोवराचा काही भाग गोठत नाही.
दूरपर्यंत पसरलेले निळसर पाणी व सभोवती बर्फाच्छादित पर्वतशिखरे यामुळे हे सरोवर स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देतात.शीख,हिंदू,बौध्द धर्मियांसाठी हे एक पवित्र स्थळ आहे.
चीन सीमेजवळ असल्याने या ठिकाणाला फक्त भारतीय पर्यटक भेट देऊ शकतात.यासाठी ६८ कि.मी.अंतरा वरील लाचेन या गावी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर या सरोवराला भेट देऊन माघारी परतावे लागते.कारण अतिउंची मुळे इथले वातावरण दुपारनंतर खराब व्हायला सुरवात होते.लाचेन येथे गुरू दोंगमार हे सरोवर आहे. कडक थंडीतही सरोवराचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी ऱ्होडोडेंड्राॅन व पांढरे मॅग्नोलिया (कवठी चाफा) यामुळे लातुंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे जाता येते.
युमथांग
गंगटोक च्या उत्तरेला असलेले युमथांग खोरे फुलांचे खोरे म्हणून प्रसिध्द आहे.इथे तुम्हाला गवताच्या हिरव्यागार कुरणात चारताना याक दिसतील,थंडगार पाण्याच्या नद्या व गरम पाण्याचे झरेही इथे पाहायला मिळतील.
हे खोरे “Valley of Flowers” या नावाने प्रसिध्द आहे.विविध रंगाच्या फुलांचे ताटवे फुललेले पाहून मन आनंदित होते. डिसेंबर ते मार्च या काळात बर्फवृष्टी मुळे पर्यटकांसाठी प्रवेश बंद असतो.
सेव्हन सिस्टर्स
सिक्कीम पर्यटनासाठी आलेले पर्यटक सेव्हन सिस्टर्स धबधबा पाहिल्या शिवाय माघारी परतत नाहीत.
गंगटोक-लाचुंग मार्गावर असणारा हा धबधबा प्रसिध्द पिकनिक स्पॉट आहे.गंगटोक पासून ३२ कि.मी.अंतरावर हा धबधबा असून एक तासात आपण या ठिकाणी पोहोचू शकतो.
या धबधब्याचे शीतल जल आपले शरीर व मन रोमांचित करतात.
लाचुंग गाव
सिक्कीम मधील सर्व गावांना निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे.पण लाचुंग गावाची गोष्ट काही वेगळीच आहे.
तिबेट ला लागून असलेले हे उत्तर सिक्कीम मधील लहानसे गाव लाचेन-लाचुंग या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.९००० फुट उंचीवर असलेल्या लाचुंग परिसरात ज्यावेळी बर्फवृष्टी होते,त्यावेळचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे कठीण आहे.असंख्य पर्यटक या काळात लाचुंग ला भेट देतात.इथले हातमाग केंद्र व हस्तकला वस्तू प्रदर्शन प्रसिध्द आहे.
कांचनगंगा
ज्याला आपण कांचनगंगा म्हणून ओळखतो ते जगप्रसिद्ध कांग चेन जुंगा हे हिमशिखर सिक्कीमच्या पश्चिम भागात आहे.
८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तिथले रहिवासी कांचनगंगाला सोने, चांदी, विविध रत्ने, शिवाय धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना असल्यासारखे पवित्र मानतात. येथे गिर्यारोहणाची क्वचितच परवानगी दिली जाते. गंगटोक येथून कांचनगंगाचे छानपैकी दर्शन होते, पण ती अवाढव्य बर्फाची भिंतच वाटते.
पश्चिमेस पेलिंग गावापासून कांचनगंगा अवघ्या ५० किमी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर होते. जवळ जाऊन पाहिल्यास शिखरापर्यंत नजर ठरूच शकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनगंगा हे नाव सार्थ ठरवतात. दिवसभर आपल्याला कांचनगंगाचे सौंदर्य वेगवेगळ्या अंगाने अनुभवता येते. सूर्योदयावेळी कोवळ्या किरणांमुळे वेगळीच सोनेरी छटा संपूर्ण डोंगरच सोन्याचा करते, तर दुपारी धारदार तलवारीप्रमाणे संपूर्ण डोंगर चमकत असतो आणि रात्री लखलखत्या ताऱ्यांच्या मंद प्रकाशात पांढऱ्याशुभ्र क्षीरसागरासारखा दिसतो. असे हे वेगवेगळे रूप दिवसभर पाहत राहिलो तरी मनाचे समाधान होत नाही. थोड्या उंच जागेवरून कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम अशी काही शिखरेही नजरेस पडतात.
मार्तम
पेलिंगपासून गंगटोकला जाताना वाटेत मार्तम हे छोटेसे गाव लागते. युनेस्कोने हे गाव दत्तक घेतले आहे. डोंगराळ भागामुळे उंच-सखल जमिनीवर टेरेस फार्मिंगची प्रथा आहे.
संध्याकाळच्या वेळेस गावात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जातात. येथे काही ठरावीक घरांमध्ये हेरिटेज म्हणून अजूनही पूर्वीचीच मांडणी असल्याचे दिसून येते. बटाटा, विविध प्रकारचे बांबू आणि आल्याच्या शेतीतून फिरताना बऱ्ऱ्याच औषधी वनस्पतींचीही लागवड केलेली दिसते. वेलदोड्याच्या लागवडीसाठी सिक्कीम फार प्रसिद्ध आहे.
पुढे उत्तरेकडे चुंगथान येथे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक लाचेन येथे तर दुसरा लाचुंगला जातो. लाचेन येथूनच तिस्ता नदीचा उगम होतो.
केचेओपेराल्ड्री तलाव
केचेओपेरल्ड्री हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. निसर्ग प्रेमींसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. हा तलाव इच्छा पूर्ण करणारा तलाव म्हणून देखील ओळखला जातो.
उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. हा तलाव खूप सुंदर दिसतो. मान्सूनचे आकर्षण म्हणून केचेओपेराल्ड्री तलावाला जगभरातील पर्यटक आणि प्रवासी भेट देतात.
बुद्ध पार्क
दक्षिण सिक्कीममधील बुद्ध पार्क उन्हाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे.
या उद्यानाचे मुख्य आकर्षण भगवान बुद्धांची 130 फूट उंचीची मूर्ती आहे, जी भगवान गौतम बुद्धांच्या 2550व्या जयंतीनिमित्त येथे बांधण्यात आली होती. हे उद्यान स्थानिक लोकांमध्ये 'तथागत त्सल' म्हणूनही ओळखले जाते.
पेमायांगत्से मठ
पेमायांगत्से मठ हा एक प्रसिद्ध बौद्ध मठ आहे, जो पेलिंगपासून 2 किमी अंतरावर आहे. हे सिक्कीममधील सर्वात जुन्या मठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.
ही तीन मजली इमारत एक स्वर्गीय ठिकाण आहे, ज्याभोवती बर्फाच्छादित पर्वतांच्या भव्य हिमालय पर्वतरांगा आहेत. बौद्ध शिल्प, शिल्प, शास्त्र, कोरीवकाम आणि चित्रांच्या सुंदर संग्रहाव्यतिरिक्त, भिक्षुंनी त्याच्या परिसरात एक अतिशय सुंदर नैसर्गिक उद्यान देखील बांधले आहे. पेमायांगत्से मठ हे ऑगस्टमध्ये सिक्कीमला भेट देण्यासाठीच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
प्रवेश परवाना : ILP
सिक्कीम च्या सीमा नेपाळ,चीन व भूतान या देशांना लागून असल्याने संपूर्ण सिक्कीम प्रतिबंधित क्षेत्राच्या अधीन आहे.विदेशी नागरिकांना सिक्कीम पर्यटनासाठी येण्यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्र परवाना काढावा लागतो.तर भारतीय पर्यटक गंगटोक चे पर्यटन विना परवाना करू शकतात.पण जर नथुला,बाबा मंदिर ला भेट देण्यासाठी गंगटोक मधून परवाना(ILP)काढावा लागतो,तर उत्तर सिक्कीम मधील लाचेन लाचुंग गुरुडोंगमार लेक यांचा परवाना प्रशासकीय शहर मंगन इथे मिळतो.यासाठी फोटो व ओळखपत्र व विहित शुल्क आवश्यक असते.यासाठी हॉटेल चालक किंवा पर्यटनासाठी निवडलेल्या मोटारीचे चालक मदत करतात.
योग्य काळ:-
योग्य काळ मार्च ते जून हा आहे.तसे पाहिले तर संपूर्ण वर्षभर सिक्कीम मधील वातावरण उल्हासित करणारे असते.
पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे दरडी कोसळणे यामुळे वाहतूक काही काळ खंडित होते.
हिवाळ्यात इथल्या बर्फवृष्टी चा आनंद घेण्यासाठी पर्यटक सिक्कीम ला पसंती देतात. मार्च ते जून हा काळ सर्व पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी उत्तम असतो.या काळात हवामान स्वच्छ असल्याने बर्फाच्छादित पर्वतशिखरे व निसर्ग सौंदर्य अधिक खुलून दिसते.
कसे जावे:-
विमान सेवा
गंगटोक शहराजवळ नव्यानेच निर्माण करण्यात आलेला पेक्योंग विमानतळ हवाई वाहतुकी साठी खुला करण्यात आला असून सध्या दिल्ली व कोलकत्ता या शहरांशी हवाईमार्गाने जोडले गेले सध्या स्पाईस जेट ही कंपनी हवाई सेवा पुरवते.
नजीकचा दुसरा विमानतळ पश्चिम बंगाल मधील बागडोगरा हा असून गंगटोक पासून १२५ कि.मी.(४ ते ५ तास ड्राईव) अंतरावर आहे.
मुंबई,पुणे नागपूर इथून बागडोगरा साठी थेट किंवा कनेक्टिंग विमानसेवा उपलब्ध आहे.
रेल्वे सेवा:-
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गंगटोक पासून ११७ कि.मी.अंतरावर न्यू जलपाईगुडी(NJP) हे असून देशाच्या सर्व मुख्य शहरांशी जोडले गेले आहे.
गुवाहाटी व दिब्रुगड च्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे या स्थानकावर थांबतात. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन वरून गंगटोक ला जाण्यासाठी बस किंवा मोटारी मिळतात.
रस्ता सेवा:-
देशाच्या अन्य भागाशी जोडणारा NH 31A हा अत्यंत नयनरम्य असून या मार्गावरून प्रवास करणे हा अविस्मरणीय अनुभव असतो.या मार्गावर अत्यंत सुंदर असा कोरोनेशन ब्रिज (Coronation Bridge) आहे.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा