श्रवणबेळगोळाजवळील विंध्यगिरी पर्वतावर बाहुबली गोम्मटेश्वराची ५७ फूट उंचीची मूर्ती अखंड पाषाणातून कोरली आहे. बाहुबली गोम्मटेश्वर जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव, अर्थात आदिनाथ यांचा दुसरा पुत्र होता. गंग राजघराण्यातील चावुंडराया या मंत्र्याने इ.स. ९७८ ते इ.स. ९९३ या कालखंडात ही मूर्ती घडवून घेतली. ही मूर्ती अखंड पाषाणातून कोरलेल्या मूर्तींपैकी जगातील सर्वात उंच मूर्ती आहे असे मानले जाते.हे स्थळ युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या मूर्तीचे अंदाजे वजन ४०० ते ६०० टन आहे.
बाहुबली गोम्मटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठी, कन्नड भाषांतील शिलालेख आहेत. ज्ञात पुराव्यांनुसार येथील मराठी शिलालेख लिखित मराठीच्या इतिहासातील सर्वांत जुना मजकूर आहे.मूर्तीच्या चोहो बाजूंनी २४ जैन तीर्थंकरांची छोटी मंदिरे आहेत. मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विंध्यगिरी पर्वतावर ६५० पायऱ्या खोदल्या आहेत.
दर १२ वर्षांनी मूर्तीची महामस्तकाभिषेक पूजा करण्यात येते. लाखो जैन भाविक या उत्सवात सामील होण्यासाठी येतात. मूर्तीवर दूध, दही, तूप, हळद यांचा अभिषेक केला जातो.
या गावाच्या परिसरात इ. स. दहा-बाराव्या शतकांत अनेक मंदिरे बांधली गेली. त्यांपैकी कलात्मक व वैशिष्टय्पूर्ण मंदिरे चिक्कबेट्टा टेकडीवर आहेत. तेथेच भद्रबाहूची गुंफा असून तिच्यात त्याची चरणचिन्हे आहेत. माथ्यावर तटबंदी असून कू गे बह्मस्तंभ, मानस्तंभ, कत्तले बस्ती, चंद्रगुप्त बस्ती, शासन बस्ती, शांतिनाथ बस्ती इ. मंदिरे आहेत. शांतिनाथ बस्ती मंदिरातील शिल्पकाम लक्षणीय असून शांतिनाथाची काळ्या पाषाणातील मूर्ती १.३ मी. उंच आहे. पार्श्वनाथ, चामुंडराय, त्याची पत्नी अजितादेवी व मोनालिसा सदृश युवती यांची सुरेख उत्थित शिल्पे चामुंडराय बस्तीत आहेत.
प्रत्यक्ष गावात भंडारी बस्ती, अक्कन बस्ती, कलामंदिर, दानशाले बस्ती, मंगाई बस्ती, जैन मठ, नगर जिनालय वगैरे मंदिरे आहेत. त्यांपैकी भंडारी बस्ती हे सर्वांत मोठे मंदिर आहे. तीत काळ्या पाषाणात चोवीस तीर्थंकारांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे त्यास चतुर्विंशतितीर्थंकर बस्ती म्हणतात. या ठिकाणी अनेक शिलालेखही उपलब्ध झाले असून एपिग्राफिया कर्नाटिका च्या दुसऱ्या भागात ते सर्व प्रसिद्ध झाले आहेत.
पार्श्वनाथ बस्तीसमोरील मानस्तंभ हा सु. २० मी. उंचीचा असून सतराव्या शतकात कुणी पुत्तयाह नामक गृहस्थाने तो बांधला आहे तर गंग राजा मारसिंह याच्या स्मरणार्थ कू गे बह्मस्तंभ उभारला आहे. त्यावर त्याच्या प्रशस्तिदर्शक ११३ ओळींचा मजकूर आहे. या सर्व बस्ती-मंदिरांतून गंग, राष्ट्नकूट, कल्याणी-चालुक्य आणि होयसळ काळांतील वास्तुशिल्पशैलींचे, विशेषत: नागर-वेसर, दर्शन घडते.
श्रवणबेळगोळ येथे नित्यनैमित्तिक पूजाअर्चा चालते. दर बारा वर्षांनी विशेष सोहळा संपन्न होतो. १९८३ मध्ये गोमटेश्वराच्या मूर्तीला एक हजार वर्षे पूर्ण झाली म्हणून मोठा समारंभ झाला. यावेळी महाभिषेक आणि मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून सुवर्णफुले उधळण्यात आली. त्यानंतर ८ ते १९ फेबुवारी २००६ दरम्यान या सहस्त्रकातील महामस्तक अभिषेक सोहळा मोठया धुमधडाक्याने साजरा झाला. यावेळी लाखो जैन धर्मीय व थोर व्यक्ती जगभरातून या ठिकाणी जमल्या होत्या.
ख़ास टीप:
तिथे ज्यांना पायऱ्या चढण्याचा त्रास होऊ शकतो त्यांच्या साठी पालखी ची सोय हि केलेली आहे त्यामुळे कोणी हि डोंगराच्या माथ्याशी पोहोचू शकतो.
कधी जाल:-
वर्ष भरात कधी ही भेट देऊ शकता.
कसे जाल:-
सांगली,कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेळगांव, तसेच सर्व प्रमुख शहरातून येथे येण्यासाठी वाहतूक उपलब्ध आहे
रस्ता सेवा:-
श्रवणबेळगोळ हाळेबीडूपासून ७८ कि.मी., बेलुरापासून ८९ कि.मी., मैसूर शहरापासून ८३ कि.मी. आणि बंगळूर शहरापासून १५७ कि.मी. अंतरावर आहे.
रेल्वे सेवा:-
हसन जिल्ह्यातील हे ठिकाण अर्सिकेरे-म्हैसूर लोहमार्गावर हसनच्या पूर्वेला ५० किमी. व म्हैसूरच्या उत्तरेला ८९ किमी.
विमान सेवा:-
बंगलोर विमानतळ ,मंगलोर विमानतळ, म्हैसूर विमानतळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा