google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : गोकर्ण महाबळेश्वर | Gokarna Mahabaleshwar

माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, १० जून, २०२२

गोकर्ण महाबळेश्वर | Gokarna Mahabaleshwar

 

कर्नाटक राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले गोकर्ण महाबळेश्वर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे.

गोकर्ण महाबळेश्वर हे कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात असून कारवार पासून जवळच आहे.देश विदेशातून भाविक आणि पर्यटक गोकर्ण महाबळेश्वर ला येत असतात.


गोवा आणि महाराष्ट्र राज्याचा सीमेजवळ व कर्नाटक राज्यातील प्रसिध्द स्थळ असलेल्या गोकर्णला ऐतिहासिक मंदिरांमुळे आणि नितांतसुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे लाखो लोक दरवर्षी भेट देतात.गोवा या जगप्रसिध्द पर्यटन स्थळा पासून जवळच शांत वातावरण असलेल्या गोकर्ण ला विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात भेट देतात.

धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतः साठी काढायचा असेल,शांत आणि निसर्गरम्य वातावरणात काही काळ घालवायचा असेल तर गोकर्ण महाबळेश्वर हे स्थळ खास आहे.


गोकर्ण महाबळेश्वर चा इतिहास:

गंगावली आणि अनघाशिनी या दोन नद्यांच्या कानाच्या आकाराच्या तीरावर वसलेल्या गोकर्ण महाबळेश्वर चा इतिहास पुराण काळाचे दाखले देतो.गोकर्ण मधील महाबळेश्वर मंदिर फार प्राचीन असून १५०० वर्षे जुने असून कर्नाटकातील सात मुक्तिस्थळा पैकी एक आहे.भगवान शंकराचे आत्मलिंग रूपातील दर्शन इथे घेता येते.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये गोकर्ण महाबळेश्वरच्या मंदिराचे खूप महत्त्व स्पष्ट केलेले आहे.या स्थळाला ‘दक्षिण काशी’ असेही म्हणतात.या स्थळाला अनुसरून अनेक दंतकथा सांगितल्या जातात.एका कथेनुसार पाताळात तपश्चर्या करत असलेले भगवान शंकर गायरूपी पृथ्वीच्या कानातून बाहेर पडले ते याच ठिकाणी.


राक्षसराज रावण यांनी कैलासपती भगवान शंकराकडून वर म्हणून आत्मलिंग प्राप्त करून घेतले व लंकेला निघाले वाटेत गोकर्ण जवळून जात असताना संध्यापूजन करण्यासाठी एका गुराखी मुलाच्या हातात हे लिंग दिले व पूजेसाठी निघून गेले.या मुलाला या आत्मलिंगाचे वजन सहन न झाल्याने त्याने ते खाली ठेवले.भगवान शंकराने रावणाला बजावले होते की,ज्या ठिकाणी हे लिंग ठेवशील ते तिथेच राहील.रावणाच्या सामर्थ्याची इतर देवांना कल्पना आली व त्यांनी गणेशाला हे लिंग रावणाकडून खाली ठेवण्यासाठी काहीतरी युक्ती करण्याची विनंती केली.त्यांच्या या विनंतीला मान देऊन गणेशांनी छोट्या गुराखी मुलाचे रूप धारण करून हे कार्य पार पडले.ज्या ठिकाणी हे लिंग खाली ठेवण्यात आले त्याच ठिकाणी सध्या आत्मलिंगाचे मंदिर आहे.

गोकर्ण मध्ये इतरही काही महत्त्वपूर्ण मंदिरे आहेत ज्यामध्ये उमामहेश मंदिर,भद्रकाली मंदिर,वरदराज मंदिर,षण्मुख मंदिर तसेच ताम्रगौरी मंदिर ही मंदिरेही पाहण्यासारखी आहेत.


गोकर्ण मधील पाहण्यासारखी ठिकाणे : 

गोकर्ण हे कर्नाटक राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असून कारवार च्या दक्षिणेला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले शांत आणि नयनरम्य असे स्थळ आहे.शहरी कोलाहलापासून दूर काही निवांत काळ घालवण्यासाठी गोकर्ण हे एक आदर्श स्थळ आहे.इथे धार्मिक महत्त्व असलेली मंदिरे आहेत,ऐतिहासिक स्थळे आहेत व नितळ पाण्याचे व सोनेरी वाळूचे स्वच्छ असे समुद्र किनारेही आहेत.कोकणासारख्या नारळी-पोफळीच्या व आंब्यांच्या बागा आहेत.


गोकर्ण मधील प्रसिध्द समुद्रकिनारे:

ओम बीच गोकर्ण :

नावाप्रमाणेच ओम या आकाराचा हा बीच अत्यंत सुंदर बीच आहे. गोकर्ण महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिध्द बीच म्हणून ओम बीच ओळखला जातो.

किनाऱ्यावरील सोनेरी वाळू व पाण्यातून बाहेर आलेल्या काळ्या दगडांमुळे हा बीच तरुणाई मध्ये खास प्रसिध्द आहे.


या बीच वर स्पीड बोट,बनाना राईड,पराग्लैडिंग अशा रोमांचक खेळांचा आनंद घेता येतो.


पॅऱाडाईज बीच :

गोकर्ण मधील अनेक बीच प्रसिध्द आहेत,त्यापैकी पॅऱाडाईज बीच हा प्रसिध्द बीच आहे.किनाऱ्यावर असलेले अक्राळविक्राळ कभिन्न काळे खडक व फेसाळत्या लाटा यांच्यामुळे हा बीच अनोखा ठरतो.


गोकर्ण ला आलेले पर्यटक या बीच वरील शांत आणि सुखद वातावरणात वेळ घालवणे पसंद करतात,इथून सायंकाळच्या वेळी सूर्यास्ताचे दिसणारे दृश्य अविस्मरणीय असते.


हाफ मून बीच :

नावाप्रमाणेच अर्धचंद्राकार असलेला हा बीच छोटा पण सुंदर आहे.ओम बीच पासून एका टेकडीमुळे वेगळा झालेला हा बीच अरबी समुद्राचा विहंगम नजारा पाहण्यासाठी प्रसिध्द आहे.

या बीच वर अनेक झोपड्या तयार करण्यात आल्या असून पर्यटक त्यामध्ये आराम करू शकतात.दुपारच्यावेळी समुद्रस्नान तर सायंकाळच्या वेळी झोपाळ्यावर बसून समुद्राचे दृश्य डोळ्यात साठवू शकतात.या बीच वर केलेले कॅम्प फायर सदैव लक्षात राहते.


गोकर्ण बीच :

गोकर्ण महाबळेश्वर च्या नावाने प्रसिध्द असलेला हा बीच गोकर्ण मधील प्रसिध्द बीच आहे.गोकर्ण मंदिराला लागुनच असलेला हा बीच मोठा आणि प्रशस्त आहे.


या बीच वर पर्यटकांबरोबरच स्थानिक लोकही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.सायंकाळच्या वेळी या बीच वरील गर्दी एखाद्या यात्रेप्रमाणे असते.अनेक प्रकारच्या जलक्रीडा करण्याचा अनुभव या बीच वर घेता येतो.


कुडले बीच :

गोकर्ण महाबळेश्वर चा कुडले बीच कर्नाटक मधील सर्वात सुंदर बीच पैकी एक मानला जातो.जास्त गर्दी नसणारा हा बीच आपल्या कुटुंबीयांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचे आदर्श ठिकाण आहे.


शांत वातावरणात समुद्रकिनारी घालवलेला वेळ मनाला शांती मिळवून देतो.सकाळी व सायंकाळी या बीच वर योगाभ्यास करता येतो.


गोकर्ण मधील धार्मिक स्थळे :

गोकर्ण महाबळेश्वर हे ज्या प्रमाणे प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे,त्याच प्रमाणे ते एक प्रसिध्द धार्मिक स्थळ म्हणूनही प्रसिध्द आहे.पुरातन काळातील घटनांचे दाखले या स्थळाबद्दल दिले जातात.

‘दक्षिण काशी’म्हणूनही ओळखले जाते.कर्नाटक मधील सात मुक्तीधामात गोकर्णचा समावेश होतो.मुक्तिधाम हे असे स्थळ असते की,जिथे लोक आपल्या दिवंगत आप्तजनांचे श्राद्धकर्म/पिंडदान इत्यादी कार्य करतात.


महाबळेश्वर मंदिर गोकर्ण: 

गोकर्ण मधील ‘महाबळेश्वर मंदिर हे सर्वात प्राचीन मंदिर असून त्याची निर्मिती ४ थ्या शतकात करण्यात आली होती.द्रविडी शैली मध्ये बांधकाम करण्यात आलेल्या या मंदिराच्या बांधणी मध्ये सफेद ग्रानाईट दगड वापरण्यात आला आहे.


अरबी समुद्राच्या दिशेला प्रवेशद्वार असलेले हे मंदिर काशीच्या विश्वनाथ मंदिराइतके पवित्र मानले जाते.म्हणून या मंदिराला ‘दक्षिण काशी’असेही म्हटले जाते.भगवान शंकराचे आत्मलिंग रुपात दर्शन या मंदिरात घेता येते,असे मानले जाते कि,या मंदिराच्या दर्शनाने भगवान शिवा चे आशिर्वाद प्राप्त होतात.

रामायण आणि महाभारतामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो.सहा फुट उंचीचे शिवलिंग असलेल्या या मंदिरात दर्शनाला येण्यापूर्वी भक्तांना गोकर्ण बीच वर डुबकी मारून यावे लागते.दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्री ला येथे खूप मोठा उत्सव भरतो.


महा गणपती मंदिर गोकर्ण:

भगवान शिवाचे सुपुत्र भगवान गणेश यांचे हे मंदिर गोकर्ण मधील आणखी एक पाहण्यासारखे मंदिर आहे.काळ्या पाषाणात घडवलेली अत्यंत सुबक अशी गणेशाची मूर्ती या मंदिरात आहे.


या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की,याच ठिकाणी भगवान गणेशाने युक्तीचातुर्याने रावणाकडील आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवले,जे रावणाला पुन्हा सोबत घेऊन जाता आले नाही.

महाबळेश्वर मंदिराला लागुनच असलेल्या या महागणपती मंदिरामध्ये नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.


कोटी तीर्थ गोकर्ण:

गोकर्ण मधील महाबळेश्वर मंदिरापासून जवळच असलेले ‘कोटीतीर्थ’ हे एक मानवनिर्मित तळे आहे.चारी बाजूंनी विविध देवतांची मंदिरे असलेले हे तळे भाविकांच्या मनात आस्थेचे केंद्र आहे.


गोकर्ण ला भेट देणारे भाविक या तळ्यात आवर्जून स्नान करतात.या तळ्याबद्दल असे मानले जाते की,या तळ्यात स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात.


भद्रकाली मंदिर गोकर्ण:

गोकर्ण च्या प्रवेशद्वारा जवळ असलेले हे मंदिर देवी उमा ला समर्पित आहे. भद्रकाली च्या रुद्रावतारातील मूर्तीची पूजा खूप मनोभावे केली जाते.कारण या देवीला गोकर्ण ची रक्षक मानले जाते.



गोकर्ण जवळील अन्य आकर्षण स्थळे:

शिव गुहा गोकर्ण:

गोकर्ण महाबळेश्वर च्या कुडले बीच जवळील ही गुहा पर्यटकांना फारशी माहित नसल्याने इथे कमी लोक पाहायला मिळतात.टेकडीवरील खडकात तयार झालेल्या या गुहेत भगवान शंकराची पिंड आहे.

या गुहेला भेट देणे हा एक रोमांचक अनुभव इथे आलेल्या पर्यटकांना मिळतो..


याना गुहा :

गोकर्ण महाबळेश्वर पासून जवळच असलेल्या याना गुहा पर्यटकांमध्ये खूप प्रसिध्द आहेत.पश्चिम घाटाची हिरवळ आणि प्राकृतिक लाईम स्टोन चे असाधारण आकार यासाठी प्रसिध्द असलेले ‘याना गुहा’ दरवर्षी हजारो पर्यटकांनी भेट दिले जाणारे स्थळ आहे.

याना गुहा वर असणारी श्री भैरवेश्वर आणि मोहिनी ही दोन शिखरे ही अनुक्रमे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या नावाने ओळखली जातात. शांत व निसर्गसंपन्न वातावरणात असलेल्या याना गुहा पक्षी निरीक्षणासाठी आदर्श ठिकाण मानले जाते.


या गुहा पासून जवळच विभूती धबधबा पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे.तीन टप्प्यामध्ये कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी जून ते सप्टेबर हा कालावधी उत्तम आहे.

या गुहा जवळ असलेले याना गाव हे कर्नाटक राज्यातील सर्वात स्वच्छ गाव तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव मानले जाते.या गावाला भेट देणे हाही एक वेगळा अनुभव पर्यटकांना मिळतो.


महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे

मिर्जन किल्ला :

गोकर्ण पासून २१ कि.मी.अंतरावर असणारा मिर्जन किल्ला आपल्या अभेद्य तटबंदी व स्थापत्यशैली मुळे प्रसिध्द आहे.अजूनही चांगल्या अवस्थेत असणारा हा किल्ला १० एकर क्षेत्रात पसरलेला आहे.तांबड्या दगडात या किल्ल्याच्या भिंती ब तटबंदी/बुरुज यांचे बांधकाम केल्याचे पाहायला मिळते.


राणी चीन्नाभैरवी यांनी हा किल्ला बांधला व जवळजवळ ५४ वर्षे सांभाळला होता.सोळाव्या शतकात महत्त्वाचे केंद्र मानला जाणारा हा किल्ला मिर्जन बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.या बंदरातून काळेमिरे,नत्र,सुपारी इत्यादि बाबी निर्यात केल्या जात.

गोकर्ण परिसरात पर्यटनाला आलेले पर्यटक आवर्जून या किल्ल्याला भेट देतात.


गोकर्ण मधील हॉटेल्स : 

गोकर्ण हे प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने व गोवा या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळापासून जवळच असल्याने भरपूर देशी-विदेशी पर्यटक गोकर्णला भेट देतात.त्यामुळे गोकर्ण मध्ये पर्यटनपूरक सेवा सुविधा सहज मिळतात.कमी बजेट पासून जास्त बजेट पर्यंत सर्व प्रकारची हॉटेल्स गोकर्ण इथे उपलब्ध होतात.एकट्या प्रवाश्यांसाठी तसेच कुटुंबासाठी योग्य ठरणाऱ्या काही हॉटेल्स ची नावे पुढीलप्रमाणे:


सोलो (एकट्या )प्रवाश्यांसाठी.

ट्रीपर गोकर्ण- बीच होस्टेल

होस्टेललाइफ गोकर्ण

होस्टेलइट गोकर्ण

कुटुंबासाठी

गोकर्ण रूम्स

रिव्हर स्टोन कॉटेज

कोकोनट ट्री रिसोर्ट

निसर्ग होम स्टे


कसे जाल :

गोकर्ण हे कर्नाटकातील प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे,तसेच महाराष्ट्राला लागुनच हा भाग असल्याने महाराष्ट्रातून हजारो पर्यटक गोकर्ण पर्यटनाला जात असतात वाहतुकीच्या सर्व सोयी गोकर्णला जाण्यासाठी उपलब्ध असून आवडीनुसार विमान,रेल्वे किंवा मोटार/बस यापैकी पर्याय वापरून गोकर्ण पर्यटनाला जाता येते.


विमान सेवा:

गोकर्ण महाबळेश्वर ला विमानतळ नाही,परंतु जवळचे प्रसिध्द पर्यटन स्थळ गोवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देश-विदेशातील शहरांशी थेट विमानसेवेने जोडला आहे.गोवा विमानतळ(Goa Airport)गोकर्ण पासून १०६ कि.मी.अंतरावर असून तीन तासात बस/कॅब ने गोकर्ण ला सहज जाता येते.विमानतळा बाहेर गोकर्ण ला जाण्यासाठी मोटार/कॅब भाड्याने घेता येते.


रेल्वे सेवा:

गोकर्ण महाबळेश्वर हे कोकण रेल्वेच्या मार्गावर असलेले ठिकाण असल्याने देशातील प्रमुख शहरातून रेल्वेने सहजपणे गोकर्ण ला येता येते.

गोकर्ण रोड हे लहानसे रेल्वेस्टेशन १० कि.मी.अंतरावर आहे.हे रेल्वेस्टेशन लहान असल्याने सर्व एक्स्प्रेस रेल्वे या ठिकाणी थांबत नाहीत.

सर्वात जवळचे मोठे रेल्वेस्टेशन अंकोला या ठिकाणी असून २०.कि.मी.अंतरावर आहे.अंकोला रेल्वेस्टेशन वरून रिक्षा मोटार किंवा बसने गोकर्णला जाता येते.मुंबई वरून मंगलोर,तिरुवनंतपुरम,एर्नाकुलम च्या दिशेने जाणाऱ्या पुढीलप्रमाणे रेल्वे आहेत

Klcv GARIB RATH (12201)

LTT GARIB RATH (12202)

MATSYAGANDHA EXPRESS (12619)

VERAVAL EXPRESS (16333)

KARWAR EXPRESS (16523)


रस्ता सेवा:

गोकर्ण हे रस्ता मार्गाने कर्नाटक,गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.कर्नाटक राज्यातील बेळगाव,हुबळी वरून,गोवा राज्यातील पणजी,मडगाव वरून व महाराष्ट्र राज्यातील मुंबई,पुणे,कोल्हापूर वरून गोकर्ण महाबळेश्वर ला जाण्यासाठी बसेस मिळतात.


स्वतः च्या मोटारीने :

गोवा राज्यातून किंवा कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून कारवार मार्गे गोकर्ण ला जाणारा रस्ता खूप निसर्गरम्य आहे.


हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...