मुरुडेश्वर मंदिर हे कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ या तालुक्यात असलेले प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मुरुडेश्वरला शंकराची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती आहे.मुरुडेश्वर चे मंदिर प्रसिध्द असून हे स्थळ तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे.
मंदिरातील प्रमुख देवता श्री.मुरुडेश्वर असून भगवान शंकराची आत्मलिंग रूपातील पिंड या ठिकाणी आहे.शिवशंभो ची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती पाहण्यासाठी व २४९ फुट उंचीचे सर्वात जास्त उंचीचे गोपुरम पाहण्यासाठी पर्यटक मुरुडेश्वर ला भेट देतात.
इतिहास:
मुरुडेश्वर या स्थळाचा उल्लेख “शिवपुराणात” आढळतो.शिवपुराणानुसार ज्यावेळी लंकापती रावण भगवान शंकराची आराधना करून वर म्हणून प्राप्त केले शिवलिंग घेऊन कैलासावरून लंकेला निघाले होते,त्यावेळी गणेश देवांनी आपले चातुर्य वापरून रावणाला ते आत्मलिंग गोकर्ण महाबळेश्वर येथे ठेवायला भाग पाडले.वाळू मध्ये रुतलेले आत्मलिंग खूप प्रयत्नानेही बाहेर आले नाही.शेवटी हताश होऊन रावण लंकेच्या मार्गाने निघून गेला.हे आत्मलिंग ज्या वस्त्रामध्ये झाकले होते,ते वस्त्र वाऱ्याने उडून तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेल्या कन्दुका पर्वतावर पडले.त्याचठिकाणी मुरुडेश्वराचे मंदिर बांधण्यात आले.
कंदुका टेकडीवर असलेले हे मंदिर तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेले आहे.दगडी बांधकाम असलेले गर्भगृह पुरातन असून सभामंडपाचे नुतनीकरण करण्यात आले आहे.गर्भगृहामध्ये आत्मलिंग रुपात शिवलिंग असून ते जमिनीपासून दोन फुट खाली आहे.गर्भगृहामध्ये भाविकांना प्रवेश निषिद्ध असून बाहेरून दर्शन घेता येते.
मुरुडेश्वर मधील पाहण्यासारखी ठिकाणे:
राज गोपुरम मुरुडेश्वर :
मुरुडेश्वर मंदिराच्या समोरच राजगोपुरम असून त्याची उंची २४९ फुट आहे. वीस मजली बांधणी असलेल्या या गोपुरम वर सुंदर नक्षीकाम केलेले असून , अनेक ऐतिहासिक प्रसंग रेखाटलेले पाहायला मिळतात.मंदिर व्यवस्थापनाने या गोपुरम वर जाण्यासाठी लिफ्ट ची सोय केलेली आहे.वरून दिसणारे दृश्य अचंबित करणारे असून १२३ फुट उंचीच्या शिवाच्या मूर्तीचे मनोहारी दृश्य पाहता येते.सायंकाळच्या वेळी मुरुडेश्वरचा परिसर व अरबी समुद्र यांचे दृश्य काही वेगळेच दिसते.
शिव शंकर मूर्ती मुरुडेश्वर :
मुरुडेश्वर येथील प्रमुख आकर्षण म्हणून शंकरची मूर्ती ओळखली जाते.१२३ फुट उंचीची शंकराची मूर्ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे.जगातील पहिल्या क्रमांकाची मूर्ती नेपाळ मध्ये असून ती कैलाशनाथ महादेव या नावाने ओळखली जाते.
मुरुडेश्वर येथील शिवाची मूर्ती तयार करण्यास दोन वर्षांचा कालावधी लागला होता.मुरुडेश्वर मध्ये जन्मलेले उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व श्री.आर.एन.रेड्डी यांनी मुरुडेश्वर मंदिराचे नुतनीकरण व विकासाचे काम केले.शंकराची मूर्ती अशा प्रकारे बांधण्यात आली आहे की,सकाळी व सायंकाळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात व संपूर्ण मूर्तीला तेजोवलय प्राप्त होते.
मुरुडेश्वर स्टेच्यू पार्क :
मुरुडेश्वर मंदिराच्या परिसरात असलेले स्टेच्यू पार्क पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे.
महाभारत व शिवपुराणातील अनेक प्रसंग याठिकाणी पूर्णाकृती मूर्ती द्वारे साकारण्यात आले आहेत.
फोटोग्राफी प्रेमींसाठी स्टेच्यू पार्क म्हणजे पर्वणीच आहे.हिरव्यागार हिरवळ व त्यामध्ये असलेले हे पुतळे सेल्फीप्रेमीना आकर्षित करतात.या पार्कच्या पाठीमागेच काही पावले गेले असता अरबी समुद्राचे विशालरूप पाहायला मिळते.मुरुडेश्वर मधील प्रमुख प्रेक्षणीय पार्क ला दिवसभरात कधीही विनाशुल्क भेट देऊ शकतो.
मुरुडेश्वर किल्ला :
मुरुडेश्वर मंदिराच्या पाठीमागेच उजव्या बाजूला असलेला किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून न घेईल तर नवलच.विजयनगर साम्राज्याची ओळख सांगणारा हा किल्ला विजयनगर च्या सम्राटांनी १५ व्या शतकात बांधला होता.कालांतराने म्हैसूरच्या टिपू सुलतानाच्या ताब्यात आल्यानंतर या किल्ल्याची डागडुजी व पुनर्बांधणी केली गेली.
या किल्ल्याच्या बांधकामावरून याचे महत्त्व व संपन्नता लक्षात येते.नक्षीकाम केलेल्या कमानी,रंगीबेरंगी भिंती व मजबूत तटबंदी पाहण्यासारख्या आहेत.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असल्याने या किल्ल्याचे सामरिक महत्त्व लक्षात येते.
मुरुडेश्वर बीच:
मुरुडेश्वर मंदिराला लागुनच असलेला मुरुडेश्वर बीच कोस्टल कर्नाटक मधील सर्वात सुंदर बीचेस पैकी एक आहे,विस्तीर्ण पसरलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजून जातो.
अनेक प्रकारचे साहसी खेळ इथे खेळता येतात.उंचउंच नारळीपोफळीच्या बागा व रुपेरी रेतीचा किनारा मनाला भुरळ घालतो.सायंकाळच्या वेळी इथून पाहिलेला सूर्यास्त अविस्मरणीय ठरतो.
नेत्राणि बेट :
मुरुडेश्वर समुद्रकिनाऱ्या पासून अंदाजे २० कि.मी. समुद्रामध्ये असलेले नेत्राणि हे बेट पर्यटकांसाठी पर्वणी ठरते.
ज्यांना समुद्राखालील जीवन अनुभवायचे असेल त्यांनी या बेटाला जरूर भेट द्यावी इथल्या स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यात केलेले स्नोर्कलिंग व स्कुबा डायव्हींग अविस्मरणीय अनुभव देतात.मुरुडेश्वर मंदिराजवळून नेत्राणि बेटावर जाण्यासाठी लहान बोटी बुक करता येतात.
भटकळ बीच :
मुरुडेश्वर च्या दक्षिणेला लागुनच असलेले लहानसे गाव म्हणजे ‘भटकळ’ टिपिकल कोकणी शैली चे हे गाव पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
इथला समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून गर्दी नसलेला आहे.समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवण्यासाठी व इथल्या खास पद्धतीच्या मत्स्याहारासाठी पर्यटक भटकळ ला भेट देणे पसंत करतात.
भेट देण्याचा सर्वात चांगला कालावधी :
मुरुडेश्वर हे कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक प्रसिध्द धार्मिक व पर्यटन स्थळ आहे.त्यामुळे वर्षभर लोक या स्थळाला भेट देतात.
ऑक्टोबर ते मार्च कारण ऑक्टोबर ते मार्च या काळात मुरुडेश्वर येथील वातावरण आल्हाददायी असते.तापमान सुसह्य असते.
मार्च ते जून हा कालावधी कडक उन्हाचा असतो.
शक्यतो सुती कपडे वापरा व सकाळी लवकर व सायंकाळी भटकंती करा.दुपारच्या वेळी विश्रांती घ्या.
प्रसिध्द खाद्यपदार्थ:
मुरुडेश्वर हे कर्नाटक मधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने इथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ जसे की,पंजाबी डिशेस,चायनीज,साउथ इंडियन सहज मिळतात.तसेच मुरुडेश्वर हे आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण खाद्यसंस्कृती साठी प्रसिध्द आहे.इथली बहुतांश हॉटेल्स स्थानिक खाद्यपदार्थ तयार करतात.त्यामुळे खास कर्नाटक पद्धतीचे स्थानिक पदार्थ खाण्यासाठी मुरुडेश्वर हे उत्तम स्थळ आहे.भात हा इथला मुख्य अन्नपदार्थ आहे.त्याच बरोबर इडली,वडा,सांभार,डोसा,उपमा,केसरी बाथ,वांगे बाथ,रागी मुडे तसेच गोड पदार्थामध्ये ओबत्तु,म्हैसूर पाक,चिरोटे हे पदार्थ प्रसिध्द आहेत.
कसे जाल:
विमान सेवा:
मुरुडेश्वर पासून जवळचा विमानतळ मंगलोर हा असून १५९ कि,मी.अंतरावर आहे.मंगलोर वरून बस/कॅबने चार ते पाच तासात मुरुडेश्वर ला येता येते.तसेच गोवा येथील दाबोलीम विमानतळ मुरुडेश्वर पासून २०० कि.मी.अंतरावर आहे व गोवा ते मुरुडेश्वर हे अंतर पाच तासाचे आहे.
रेल्वे सेवा:
रेल्वेने मुरुडेश्वर ला जाणे हा सर्वात स्वस्त व आरामदायी पर्याय आहे.
मुंबई ते मंगलोर कोकण रेल्वे मार्गावर मुरुडेश्वर हे पर्यटन स्थळ आहे.मुंबई ते मुरुडेश्वर या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे पुढील प्रमाणे
नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५)
लो.तिलक त्रिवेंद्रम एक्स्प्रेस (०६३४५)
मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२६१९)
तसेच अहमदनगर,पुणे,मिरज इथून मुरुडेश्वर ला जाण्यासाठी गोवा एक्स्प्रेस (०२७८०)ने मडगाव पर्यंत जाणे व मडगाव येथून बस/कॅब ने मुरुडेश्वर ला जाणे हा पर्याय वापरता येतो.
रस्ता सेवा:
गोवा राज्यातून कारवार मार्गे मुरुडेश्वर ला जाणारा महामार्ग हा भारतातील सर्वात सुंदर महामार्गापैकी एक आहे.याला कोस्टल कर्नाटक महामार्ग असेही म्हटले जाते.
एका बाजूला अथांग अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला हिरवीगार वनराई व नारळी-पोफळीच्या,आंब्याच्या बागांच्या सोबतीने केलेला प्रवास कधीही न संपावा असे वाटते.
स्वतःचे वाहन :
मुंबई गोवा महामार्गाने कारवार – गोकर्ण महाबळेश्वर वरून मुरुडेश्वर ला जाता येते.
पश्चिम महाराष्ट्रातून जायचे झाल्यास कोल्हापूर-बेळगाव-हल्याळ मार्गे मुरुडेश्वर असा प्रवास करता येतो.
मुंबई,पुणे येथून कारवार साठी कर्नाटक राज्य परिवहन बसेस सुटतात तसेच कोल्हापूर,बेळगाव वरून ही कारवार साठी बसेस मिळतात.कारवार ते मुरुडेश्वर हे अंतर ५७ कि.मी असून या मार्गावर बसेस,कॅब यांची सतत वाहतूक सुरु असते.
कुठे राहाल:
मुरुडेश्वर हे प्रसिध्द धार्मिक व पर्यटन स्थळ असल्याने इथे मुक्कामासाठी मोठ्यासंख्येने हॉटेल्स,रिसोर्ट,व गेस्ट हाउस उपलब्ध आहेत.कमी बजेट पासून जास्त बजेट पर्यंत सर्व प्रकारची हॉटेल्स उपलब्ध असून किमतीनुसार सेवासुविधा यांच्यामध्ये फरक असतो.
काही नावे पुढील प्रमाणे:
आर एन एस गेस्ट हाउस (RNS Guest house)
सेन्ट्रल लॉज (Central Lodge)
हॉटेल अंबिका इंटरनेशनल (Hotel Ambika International)
धेनु आतिथ्य (Dhenu Atithya)
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा