लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश भारताच्या पश्चिम किनार्यापासून ३०० कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात असून पर्यटनासाठी अत्यंत सुंदर प्रदेश म्हणून ओळखला जातो.
लक्षद्वीप या नावाचा अर्थ “ लाखो ” असा होतो.भारतातील सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश अशी लक्षद्वीप ची ओळख आहे.स्फटिकासारखे निळेशार पाणी व हिरवीगार ताडा- माडांची झाडी यामुळे लक्षद्वीप जणू पाचू चे बेट वाटते.भारतासह विदेशातील पर्यटक लक्षद्वीप बेटांवर सुट्टी चा आनंद घेणे पसंद करतात.
लक्षद्वीप बेट समूहात एकूण ३६ बेटे असून त्यापैकी १० बेटांवर मानवी वस्ती आहे.लोकजीवन असलेल्या १० बेटांपैकी ६ बेटांना भारतीय पर्यटक भेट देऊ शकतात तर विदेशी पर्यटक फक्त दोन बेटांना भेट देऊ शकतात.
लक्षद्वीप बेटे इतिहास:-
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार लक्षद्वीप बेटांवरील पहिली मानवी वसाहत केरळचा शेवटचा चेरा राजा चेरमन पेरूमल याच्या काळात झाली.अमिनी,कल्पेनी,अगत्ती,कवरत्ती अनद्रोत या बेटांवर मानवी वसाहती सर्वप्रथम वसवण्यात आल्या.पाचव्या व सहाव्या शतकात इथे बौद्ध धर्माचे प्राबल्य होते.
सातव्या शतकात मुस्लिम व्यापार्यांनी इस्लाम धर्माची मुळे या बेटावर रुजवली.सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या बेटांवर नियंत्रण मिळवले तर सतराव्या शतकात टिपू सुलतान ने पोर्तुगीजांच्या ताब्यातून ही बेटे सोडवली.
सन १९५६ मध्ये राज्यांच्या पुनर्निर्मिती वेळी लक्षद्वीप बेट समूह मद्रास प्रांतापासून वेगळा करून केंद्रशासित प्रदेश म्हणून तयार करण्यात आला.
लक्षद्वीप मधील पाहण्यासारखी ठिकाणे:
कवरत्ती बेट
कवरत्ती बेट लक्षद्वीप ची राजधानी म्हणून ओळखले जाते.लक्षद्वीप मधील सर्वात सुंदर बेटांपैकी एक बेट म्हणून कवरत्ती ची ओळख आहे.४.२२ चौ.कि.मी.क्षेत्रफळ असलेले कवरत्ती बेट केरळ पासून ३९८ कि.मी. अंतरावर आहे.
सोनेरी वाळू,निळसर पाणी व शांत वातावरण हे कवरत्ती चे वैशिष्ठ्य आहे.स्नोर्कलिंग,स्कुबा-डायव्हिंग असे साहसी खेळ खेळण्यासाठी कवरत्ती बेट आदर्श स्थान आहे.
इथे असलेल्या समुद्र संग्रहालयात समुद्रातील जीवनाबाबतचे अथांग ज्ञान मिळवता येते.काचेचा तळ असलेल्या बोटीतून पाण्याखालचे जीवन न्याहाळता येते तसेच इथे कयाकिंग करण्याचाही आनंद घेता येतो.
अगत्ती बेट
लक्षदीप मधील सर्वात सुंदर बेटा मध्ये अगत्ती बेटाचा समावेश होतो. अगत्ती बेट हे पर्यटनासाठी अत्यंत रमणीय असे स्थान आहे.
लक्षद्वीप मधील इतर बेटापेक्षा अगत्ती बेटाचा आकार लहान असला तरी इथलं सफेद पाणी, सोनेरी वाळू, व शांत वातावरण पर्यटकांना आकर्षून घेते.
अगत्ती बेट हे आठ चौरस किलोमीटर क्षेत्रांमध्ये पसरले असून या बेटावर आठ हजार पेक्षा अधिक लोक वास्तव्य करतात. समुद्री संपत्तीने नटलेल्या या बेटावर सुंदर दृष्य पाहायला मिळतात.
कल्पेनी बेट
लक्षद्विप पर्यटनासाठी आलेले पर्यटक कल्पेनी द्वीप ला भेट दिल्याशिवाय माघारी जात नाहीत. कल्पेनी द्वीप कोईफेनी द्वीप या नावानेही ओळखले जाते हा एक द्वीपसमूह असून चेरियन, पी. टी. आणि तिरक्क्म या बेटानी मिळून कल्पेनी बेट समूह बनला आहे.
कल्पेनी बेट हे स्कुबा डायविंग कयाकिंग रीफ वाकिंग, कयाकिंग व पाण्यातील विविध खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.
कदमत बेट
कदमत बेट लक्षद्वीप पासून नऊ किलोमीटर अंतरावर असून हे बेट पर्यटकांना आकर्षित करून घेते या बेटावर सोनेरी वाळू, निळसर पाणी व समृद्ध सागरी जीवनाची झलक पाहता येते. या बेटावर पर्यटकांसाठी अनेक साहसी खेळ उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पॅराग्लायडिंग, पेरासेलिंग, स्कुबा डायविंग यांचा समावेश होतो.
बांगरम बेट
अरबी समुद्रातील निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले बांगरम बेट हे लक्षद्वीप मधील प्रमुख पर्यटन केंद्र आहे.
हे बेट अत्यंत सुंदर समुद्र किनारा यांसाठी प्रसिद्ध आहे. या बेटावर सूर्योदय आणि सूर्यास्ता चा अविस्मरणीय अनुभव घेता येतो. तसेच पाण्यातील विविध जलजीवांचे निरीक्षण व डॉल्फिन सफारी साठी हे बेट प्रसिद्ध आहे.
मिनिकॉय बेट
लक्षद्वीप मधील 36 लहान-मोठ्या बेटांपैकी एक असलेले मिनिकॉय हे बेट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक भाषेत या बेटाला मलकु या नावाने ओळखले जाते.
मिनीकॉय बेट कोचीन समुद्रकिनार्यापासून जवळजवळ चारशे किलोमीटर आठ समुद्रात आहे. या बेटावर सफेद वाळू आणि निळसर पाण्याची झलक पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून हजेरी लावतात तसेच सुट्टी घालवण्यासाठी या बेटावर अनेक समुद्र समुद्र रिसॉर्ट उपलब्ध आहेत
लक्षद्वीप बेटावरील प्रमुख आकर्षणे.
स्कुबा डायविंग
लक्षद्वीप हे बेट भारतातील प्रमुख स्कुबा डायविंग क्षेत्रांपैकी एक आहे. या बेटावर स्कुबा डायविंग चा अविस्मरणीय आनंद घेता येतो. ज्या पर्यटकांना स्कुबा डायविंग करण्याची इच्छा असते ते आपली पहिली पसंती लक्षद्वीप या बेटाला देतात.
लक्षद्वीप येथील समुद्र किनारे उथळ पाण्याची व सोनेरी रेतीचे असल्याने इथे स्कुबा डायविंग चा आनंद द्विगुणित होतो पाण्याखालील जीवन अनुभवण्यासाठी लक्षद्वीप आदर्श स्थान आहे.
लक्षदीप मधील अगत्ती कदमत आणि बांगरम ही तीन बेटे स्कुबा ड्रायव्हिंग साठी खास प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी एक वेळच्या स्कुबा डायविंग साठी दोन हजार रुपये इतके शुल्क आकारले जाते.
लक्षद्वीप मधील विविध जलक्रीडा:
लक्षद्वीप बेट समूह आपल्या नयनरम्य सौंदर्यासाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो विविध प्रकारच्या जलक्रीडा करण्यासाठीही प्रसिद्ध आहे.
अंदमान निकोबार बेटाप्रमाणेच लक्षद्वीप बेटावर पर्यटक विविध साहसी जलक्रीडा करू शकतात.ज्यामध्ये पेडल बोटिंग,स्नोर्कलिंग,स्कुबा-डायव्हिंग, कयाकिंग,सर्फिंग,कनोइंग,बनाना जेट राईड,क्वाड बाईक इत्यादी बाबींचा समावेश होतो.या सर्व जलक्रीडांचे शुल्क ५०० रुपयापासून सुरु होते.
मरीन संग्रहालय
मासे तसेच विविध जलचरांच्या प्रजाती पाहायच्या असतील तर कवरत्ती बेटावरील मरीन संग्रहालयाला नक्कीच भेट दिली पाहिजे.या संग्रहालयामध्ये अरबी समुद्रात आढळणार्या विविध जलचरांना पाहता येते.
दीपगृह
लक्षद्वीप मधील दीपगृह किंवा लाईट हाउस मिनीकॉय या बेटावर आहे.
सन १९८५ मध्ये तयार करण्यात आलेल्या या लाईट हाउस चे कार्य समुद्रातील जहाजांना योग्य मार्ग दाखवणे हा असून पर्यटक या दीपगृहाला आवर्जून भेट देतात.३०० फुट उंच असलेल्या या दीपगृहा वरून परिसराचे अत्यंत विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
**अत्यंत महत्त्वाचे:-
मिनीकॉय बेटाला फक्त भारतीय पर्यटकाच भेट देऊ शकतात.विदेशी पर्यटकांना मिनीकॉय बेटावर येण्यास सक्त मनाई आहे.
यॉट क्रुज
लक्षद्वीप ला भेट देणारे पर्यटक यॉट क्रुज चा आनंद घेणे पसंद करतात.सोनेरी वाळू व कमरेइतक्या उंचीचे नितळ निळे पाणी कापत चालणारी यॉट व सभोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहत कसा वेळ जातो हे कळतही नाही.अनेक यॉट पर्यटकांसाठी मासेमारी ची सुविधाही उपलब्ध करून देतात.
पॅरासेलिंग
लक्षद्वीप पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना सर्वात आवडणारा साहसी खेळ म्हणून पॅरासेलिंग ला ओळखले जाते. वेगवान जेट नौकेला बांधलेल्या दोराच्या साहायाने उंच आकाशात केलेला विहार व अवकाशातून लक्षद्वीप बेटांचे दिसणारे नयनरम्य दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. अत्यंत अनुभवी व प्रशिक्षित गाईड पर्यटकांच्या दिमतीला हजर असतो.
पर्यटकांसाठी कयाकिंग,स्नोर्कलिंग,बनाना राईड असे अनेक जलक्रीडा करण्याचे पर्याय लक्षद्वीप इथे उपलब्ध आहेत.
लक्षद्वीप मधील स्थानिक खाद्यपदार्थ :-
लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश पर्यटनासाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो आपल्या खास खाद्य संस्कृती साठी प्रसिद्ध आहे. इथले अनेक पदार्थ खाल्यानंतर पर्यटक बोटे चाखतच राहतात.
लक्षद्वीप हा बेट समूह असल्याने सी-फूड अर्थात मत्स्याहार हा इथला प्रमुख आहार आहे.मत्स्याहार प्रेमी लोकांसाठी लक्षद्वीप पर्वणीच ठरते कारण इथे विविध प्रकारचे मासे इथल्या खास शैलीत बनवून पर्यटकांना खायला घातले जातात.इथले शाकाहारी पदार्थही अत्यंत चवदार असतात.
भारताच्या मुख्य भूमीपासून दूर असले तरी लक्षद्वीप येथे दक्षिण भारतीय पदार्थ,पंजाबी,चायनीज पदार्थ सहज उपलब्ध होतात.
काय खरेदी कराल:-
लक्षद्वीप पर्यटनाला आलेले पर्यटक इथल्या विविध वस्तू भेट म्हणून देण्यासाठी व आठवण म्हणून खरेदी करतात.समुद्रातील शंख-शिंपल्या पासून तयार केलेल्या विविध कलाकृती,विणकाम केलेल्या वस्तू नारळाच्या झाडाच्या विविध भागाचा वापर करून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू असे अनेक पर्याय पर्यटकांना खरेदीसाठी उपलब्ध असतात.
लक्षद्वीप पर्यटनासाठी योग्य कालावधी:-
लक्षद्वीप पर्यटनासाठी सर्वात चांगला कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल हा आहे.या काळात लक्षद्वीप द्वीपसमूहाचे हवामान पर्यटनाला अनुकूल असते.
मे ते सप्टेबर या काळात मान्सून पावसामुळे लक्षद्वीप पर्यटनाला प्रतिकूल असते.या काळात कोचीन वरून लक्षद्वीप ला जाणारी जलवाहतूक ही काही काळ स्थगित होते.
कुठे राहाल:-
लक्षद्वीप हे पर्यटना साठी प्रसिद्ध असल्याने या द्वीपसमूहावर पर्यटकांच्या राहण्यासाठी सर्व प्रकारची हॉटेल्स उपलब्ध आहेत.पर्यटक आपल्या आवडीनुसार कमी बजेट पासून अधिक बजेट पर्यंत हॉटेल्स व रिसोर्ट्स उपलब्ध होतात.
बांगरम,कलपेनी,आगत्ती,कदमत इत्यादी बेटांवर आरामदायी रिसोर्ट्स पर्यटकांसाठी उपलब्ध होतात.
कसे जाल:-
देशभरातून असंख्य पर्यटक दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान लक्षद्वीप बेटांवर येतात.भारताच्या मुख्य भूमीपासून ४०० कि.मी.दूर अरबी समुद्रात असलेल्या लक्षद्वीप बेट समूहावर येण्यासाठी जलवाहतूक व हवाई मार्ग यापैकी कोणत्याही पर्यायाची निवड करू शकतात.
विमान सेवा:-
लक्षद्वीप हा ३६ बेटांचा समूह असला तरी या बेटांपैकी फक्त अगत्ती याच बेटावर विमानतळ असून केरळ मधील कोचीन विमानतळावरून अगत्ती साठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे.मुंबई,पुणे,नागपूर,दिल्ली,बंगुलुरू,चेन्नई इत्यादी शहरातून कोचीन साठी थेट विमानसेवा उपलब्ध असते.
जहाज सेवा:-
कोचीन बंदरावरून लक्षद्वीप ला जाण्यासाठी जहाज सेवा उपलब्ध असते.एमवी कवरत्ती,एमवी टिपू सुलतान,एमवी भारत सीमा,एमवी अविंदा ही जहाजे कोचीन येथून लक्षद्वीप ला पर्यटक व स्थानिक लोकांची वाहतूक करतात.कोच्ची किंवा कोचीन येथून लक्षद्वीप ला जहाजाने येण्यासाठी १५ ते २० तास लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा