महाबलीपुरम किंवा मामल्लपुरम हे तामिळनाडू राज्यातील चेंगलपट्ट जिल्ह्यातील एक शहर आहे.महाबलीपुरम खूप रमणीय स्थळ आहे.
चेन्नई पासून महाबलीपुरम ५५ कि.मी. अंतरावर आहे.महाबलीपुरम हे शहर सातव्या शतकातील प्राचीन भव्य मंदिरे,शिल्पकाम आणि समुद्रकिनाऱ्या साठी प्रसिद्ध आहे.इतिहास आणि निसर्ग सौंदर्य यांचे देणे या शहराला लाभले आहे.
तामिळनाडू राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या महाबलीपुरम ला सन १९८४ मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे.देश-विदेशातील पर्यटक इथले शोर मंदिर,पंच रथ,गणेश मंदिर,मगरमच्छ बैंक,कृष्णा बटरबॉल इत्यादी प्रेक्षणीय स्थळे पाहायला येतात.
महाबलीपुरम या शब्दाचा अर्थ होतो,प्रचंड शक्तीचे गाव.महाबलीपुरम चा इतिहास पाहिला तर असे दिसते की,हे शहर प्राचीन काळी खूप मोठे व्यापारी बंदर होते.दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील काही भांडी,वस्तू व नाणी या ठिकाणी सापडली आहेत.
पल्लव साम्राज्याच्या काळात महाबलीपुरमचा खूप विकास झाला.आता जी मंदिरे,शिल्पकाम पाहायला मिळते आहे,ते सर्व पल्लव साम्राज्याच्या काळात झाले आहे.इथल्या प्रचंड मोठ्या खडकांना फोडून आकर्षक शिल्पकाम केलेली मंदिरे,मंडप,व वास्तूंची निर्मिती पल्लव साम्राज्याच्या काळात झाली.
शोअर टेम्पल
या मंदिराची निर्मिती ७ व्या शतकात पल्लव सम्राट नरसिंहवर्मन प्रथम यांनी केली.महाबलीपुरम समुद्रातटाजवळ असल्याने या मंदिराला शोअर टेम्पल असे म्हटले जाते.
हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते.महाबलीपुरम चे शोअर टेम्पल द्रविडी वास्तुकलेचा उत्तम नमुना मानले जाते.या ठिकाणी तीन मंदिरे असून मध्यभागी विष्णूचे तर दोन्ही बाजूला शिवमंदिरे आहेत.संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरावरील नक्षीकाम खूप सुंदर आहे.
पंच रथ मंदिर
७ व्या शतकात निर्माण केलेले पंच रथ मंदिर दक्षिण भागामध्ये आहे.इथल्या पाच रथांना पांडवांची नावे दिलेली आहेत.
पाच पंच रथ मंदिर रथांपैकी चार रथ एकाच खडकात कोरून तयार केले आहेत.या सर्व रथांपैकी धर्मराजाचा रथ सर्वात उंच व बहुमजली आहे.
प्रवेशद्वारा जवळील पहिला रथ द्रोपदीचा असून आकाराने छोटा आहे.द्रोपदीचा रथ दुर्गा मातेला समर्पित आहे.
द्रोपदीच्या रथानंतर येतो अर्जुनाचा रथ.अर्जुनाचा रथही आकाराने छोटा असून भगवान शंकराला समर्पित आहे.
भीमाच्या मंदिराच्या खांबावर वाघाच्या चित्रांची सजावट केली आहेत,तर नकुल व सहदेवाच्या रथावर हत्ती ची चित्रे काढली आहेत.हे सर्व रथ दगड कोरून बनवण्यात आले आहेत.महाबलीपुरम चे पंच रथ जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जातात.
महाबलीपुरम बीच
महाबलीपुरम च्या शोअर मंदिराला लागुनच महाबलीपुरम बीच आहे.
अत्यंत मोठा असणारा हा बीच सोनेरी वाळूचा आहे.बंगालच्या उपसागराचे निळसर पाणी व सोनेरी वाळू यामुळे हा बीच खूप सुंदर दिसतो.
या बीच वर समुद्रस्नान करणे सुरक्षित नाही,कारण इथे समुद्राची खोली जास्त आहे.पर्यटक बनाना बोट राईड,पेरासेलिंग,बोटिंग असे विविध खेळ खेळू शकतात.
अर्जुन तपस्या
महाबलीपुरम मधील सर्वात प्रमुख स्थळांपैकी एक असलेला मंडप दोन विशाल दगडांवर कोरीव काम करून तयार केला आहे.याची लांबी ३० मीटर तर रुंदी ९ मीटर आहे.
विविध प्राण्यांची देवदेवतांची चित्रे या ठिकाणी रेखाटली असून त्यापैकी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलेले दृश्य खूप आकर्षक आहे.
कृष्णा बटरबॉल
दगडाच्या उंचवट्यावर गोल आकाराचा विशाल असा दगड खूपच कमी भाग जमिनीला टेकलेल्या व उताराच्या दिशेला कधीही घरंगळेल अशा अवस्थेत शेकडो वर्षे एकाच जागेवर आहे.
या दगडास कृष्णाचा लोण्याचा गोळा अर्थात कृष्णा बटरबॉल म्हणून ओळखले जाते.
वराह मंदिर
एका अखंड पाषाणाला करून त्यामध्ये तयार करण्यात आलेले वराह मंदिर शिल्पकलेचा चमत्कार म्हणावा लागेल.हे मंदिर खूप प्रसिद्ध असून इतर मंदिरांप्रमाणेच ७ व्या शतकात तयार केले आहे.
हा संपूर्ण परिसर ग्रेनाईट दगडाचा असून सर्व शिल्पे या ठिकाणी कोरली आहेत.या मंदिराच्या भिंतीवर भगवान विष्णूचे वराह रूप चित्रित करण्यात आले आहे,वराह रूपातील विविध प्रसंग इथे पाहायला मिळतात.
गणेश मंदिर
७ व्या शतकात तयार केलेले हे मंदिर सुंदर नक्षीकामासाठी खूप प्रसिद्ध आहे.
हे मंदिर भगवान शंकराला समर्पित केले होते,या मंदिरामध्ये शंकराची पिंड देखील होती,कालांतराने ही पिंड हटवण्यात आली व गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली.या मंदिरामध्ये गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळते.
महिषासुरमर्दिनी गुहा मंदिर
महाबलीपुरम मधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले महिषासुरमर्दिनी मंदिर अखंड खडकाला करून तयार केलेले सुंदर मंदिर आहे.या मंदिराला यमपुरी मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
हिंदू पौराणिक कथांचे चित्रण या मंदिराच्या भिंतीवर केलेले पाहायला मिळते.एका दृश्यामध्ये भगवान विष्णू सात फण्यांच्या नागराजांवर विराजमान झालेले दिसत असून दुसऱ्या चित्रात माता दुर्गा सिंहावर बसून महिषासुर या दानवाचा वध करताना दिसत आहेत.उंच ठिकाणी असलेल्या या गुहा मंदिरा पासून परिसराचे विलोभनीय दृश्य दिसते.
त्रिमूर्ती मंदिर
नावाप्रमाणेच तीन देवतांना समर्पित असलेले हे मंदिर संपूर्ण दगडात घडवलेले मंदिर असून पौराणिक कथांची चित्रे चित्रित करण्यात आली आहे.
ब्रम्हा,विष्णू व महेश यांची चित्राकृती या मंदिरात आहेत.या मंदिराचे वैशिष्ठ्य असे आहे की,इतर मंदिरात दगडी खांब आहेत,पण या मंदिराला एकही खांब नाही.
महाबलीपुरम दीपगृह
महाबलीपुरम मधील शिल्पवैभव पाहिल्यानंतर आणखी काय पाहायचे? जवळच किनार्यालगत असलेले लाईटहाउस पर्यटकांच्या आवडीचे स्थळ आहे.
एका उंच खडकाळ भागावर असलेले लाईटहाउस २०११ पासून पर्यटकांना पाहता येते.इथले स्थानिक दगड वापरून तयार करण्यात आलेले लाईटहाउस खूप सुंदर आहे.पर्यटक या लाईटहाउस च्या वरील भागात जाऊन परिसराचे विलोभनीय दृश्य पाहू शकतात.
क्रोकोडाईल बँक
महाबलीपुरम पासून १४ कि.मी.अंतरावर असलेले मगर संगोपन केंद्र आवर्जून पाहण्यासारखे आहे.प्राणीरक्षक रोम्युलस व्हायटर यांनी १९७६ मध्ये हे केंद्र सुरु केले होते.सुरवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मगरी इथे होत्या, हळूहळू ही संख्या वाढून ५००० इतकी झाली आहे.
भारतीय व आफ्रिकन जातीच्या मगरी इथे मुक्त वातावरणात पाहणे हा एक रोमांचक अनुभव असतो.या केंद्रामध्ये सर्प सुद्धा आहेत,अनेक प्रजातीचे विषारी व बिनविषारी साप इथे पाहता येतात.
मंदिर उघडण्याची वेळ:-
महाबलीपुरम मंदिर समूह सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० या काळात खुला असतो.
मंदिर प्रवेश शुल्क :-
महाबलीपुरम मंदिर व परिसर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असल्याने याचे संपूर्ण व्यवस्थापन भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे.त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला शुल्क देऊन मंदिर परिसरात प्रवेश करावा लागत.भारतीय पर्यटकांसाठी १० रु.तर विदेशी पर्यटकांसाठी २५० रु.शुल्क द्यावे लागते.
कधी जाल:-
सर्वोत्तम कालावधी नोव्हेंबर ते मार्च हा आहे.या काळात वातावरण आल्हाददायी असते.
प्रसिद्धी खाद्य पदार्थ:-
इडली,मसाला डोसा,उपमा,अप्पम असे विविध प्रकारचे दक्षिण भारतीय पदार्थ इथे सहज मिळतात.
कसे जाल:-
विमान सेवा:-
महाबलीपुरम साठी सर्वात जवळचा विमानतळ चेन्नई येथे असून ५५ कि.मी.अंतरावर आहे. चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देश-विदेशातील सर्व प्रमुख शहरांशी हवाईमार्गे जोडला गेला आहे.मुंबई,पुणे,नागपूर येथून चेन्नई साठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
रेल्वे सेवा:-
महाबलीपुरम साठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन चेंगलपत्तू येथे असून २२ कि.मी.अंतरावर आहे.किंवा पर्यटक चेन्नई पर्यंत ट्रेन ने येऊन तिथून कॅब बुक करून महाबलीपुरम ला येऊ शकतात.चेन्नई ते महाबलीपुरम हे अंतर ५५ कि.मी. असून प्रवासाला एक ते दीड तास लागतो.
रस्ता सेवा:-
सर्वात स्वस्त व मस्त पर्याय म्हणजे तामिळनाडू राज्य परिवहन च्या बसने प्रवास करून महाबलीपुरम येथे येणे.
चेन्नई ते पुदुच्चेरी या मार्गावर ECR(East cost road)मोठ्या प्रमाणात बस वाहतूक चालू असते.पर्यटक महाबलीपुरम ला चेन्नई वरून किंवा पुदुच्चेरी वरून येऊ शकतात.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा