व्यापार दृष्टया महत्त्वाचे असलेल्या कोची या शहराच्या मलयालम नावाचा अर्थ “कोचू अजहि’ असा होतो.याचा अर्थ ‘छोटी खाडी किंवा बंदर’ असा होतो.
प्राचीन काळापासून बंदरामुळे कोची व्यापाराचे केंद्र आहे.त्यामुळे कोची केरळची व्यापारी,आर्थिक व सामाजिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
कोची हे शहर कोचीन या नावानेही ओळखले जाते.सन १९९० मध्ये कोची हे नाव अधिकृत करण्यात आले असले तरी कोचीन नाव वापरात आहे.
कोची शहराची नोंद प्राचीन साहित्यामध्ये ही आढळते.भारतातील मसाल्याच्या व्यापाराचे केंद्र म्हणून कोची ओळखले जात होते.कोची ने आखाती व युरोपीय देशांशी मसाल्याचा व्यापार विकसित केला होता.
कोची इतिहास:-
१) पोर्तुगीज राजवट
कोची मध्ये सर्वप्रथम परकीय वसाहत सुरु झाली ती पोर्तुगीज यांची (सन १५०३ ते १६६३).कोचीन च्या राजा कडून त्यांनी कोची किल्ला बांधण्याची परवानगी घेतली व हळूहळू स्व:संरक्षणार्थ सैन्याची वाढ केली.कालांतराने कोचीन च्या राजा चे पद नाममात्र केले व सर्व कारभार आपल्या हातात घेतला.
२) डच राजवट
डच लोकांनी व्यापारासाठी केरळ मध्ये( सन १६६३ ते १७७३) प्रवेश केला व कोल्लम येथे वसाहती वसवल्या.कोचीन च्या राजा ला मदत म्हणून पोर्तुगीजांशी युध्द करून त्यांना हरवले व कोची चा किल्ला ताब्यात घेतला.त्यांनी १६६४ मध्ये भारतीय उपखंडातील पहिली नगरपालिका फोर्ट कोची येथे स्थापन केली.
३) म्हैसूर राजाची राजवट
सन १७७३ मध्ये म्हैसूर राजा हैदर अली (टिपू सुलतान चा वडील)याने केरळ मध्ये मुसंडी मारली व कोची ताब्यात घेऊन कोची च्या राजाला मांडलिक बनवले.
ब्रिटीश राजवट:ब्रिटीशांनी कोची ताब्यात घेतले.(सन १८१४ ते १९४७)कोची बंदरचा विकास केला व कोची हे भारतातील प्रमुख व्यापारी बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले.
कोची मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.काही प्रमुख स्थळांची माहिती या लेखामध्ये घेऊया.
कोची किल्ला
फोर्ट कोची हा कोची मधील पश्चिमेकडील भाग असून पाण्याने वेढलेला हा भाग सर्वात जास्त भेट दिला जाणारा भाग आहे.या परिसरात पोर्तुगीज,डच,ब्रिटीश संस्कृती बरोबरच वास्तुकला पाहायला मिळते.
फोर्ट कोची बीच
मोठमोठ्या आकाराच्या चायनीज फिशिंग नेट असलेल्या फोर्ट कोची बीच वर पर्यटक व स्थानिकांची सुद्धा गर्दी असते.
सूर्यास्ताच्या वेळी स्वच्छ पाण्यामध्ये मासेमारी कशी केली जाते हे याठिकाणी पाहता येते.या बीच च्या आसपास अनेक हॉटेल्स व कॅफे आहेत.बीच वर निवांतपणे वेळ घालवणारे अनेक पर्यटक पाहायला मिळतात.
कोची हिल पॅलेस
हिल पॅलेस हे केरळ राज्यातील सर्वात मोठे पुरातत्वीय संग्रहालय आहे.ही इमारत कोची च्या महाराजांचे अधिकृत निवासस्थान होते.याची निर्मिती सन १८६२ मध्ये करण्यात आली होती.
युरोपीय पद्धतीचे बांधकाम असलेल्या या संग्रहालयाच्या परिसरात लहान मुलांसाठी पार्क ची निर्मिती करण्यात आली आहे.या संग्रहालयात दुर्मिळ शिल्पकाम,पेंटिंग तसेच शाही घराण्याच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
ज्यू टाऊन
कोची मधील ज्यू टाऊन हा परिसर खूप जुना मानला जातो.शॉपिंग करण्यासाठी हे एक आदर्श स्थळ आहे.
अनेक दुर्मिळ वस्तूंबरोबरच केरळी हस्तकलेच्या वस्तू,मसाले, आयुर्वेदिक तेले,भेट वस्तू तसेच अनेक वस्तू व कपडे रास्त दरात मिळतात.
किमतीत घासाघीस केली तर अनेक मौल्यवान वस्तू स्वस्तात घेता येतात.
मरीन ड्राईव्ह
कोची मधील मरीन ड्राईव्ह हा परिसर अत्यंत रमणीय मानला जातो.बॅकवॉटर च्या कडेला असलेल्या या ठिकाणी लोक निवांतपणे सूर्योदय व सूर्यास्त अनुभवू शकतात.
तीन प्रसिध्द असे आधुनिक पद्धतीचे पूल इथे बांधण्यात आले आहेत.चायनीज फिशिंग नेट ब्रीज,रेनबो ब्रीज आणि हाउस बोट ब्रीज हे ते ब्रीज असून हा संपूर्ण परिसर फोटोग्राफी साठी प्रसिध्द आहे.
मत्तनचेरी पॅलेस
मत्तनचेरी पॅलेस हा राजवाडा पोर्तुगीजांनी कोची च्या राजांना सन १५४५ मध्ये भेट म्हणून दिला होता.
शंकू आकाराची ही इमारत जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ठ आहे.या पॅलेस मध्ये अनेक दुर्मिळ पेंटिंग पाहायला मिळतात.
सांता क्रुज बेसिलिका चर्च
कोचीमधील पर्यटकांनी सर्वात जास्त भेट दिले जाणारे हे चर्च केरळ मधील नऊ बेसिलिका चर्च पैकी एक आहे.या चर्च ची रचना अत्यंत कलात्मक आहे.
चर्चच्या वास्तूरचनेवर इंडो-युरोपियन व गोथिक शैलीचा प्रभाव दिसून येतो.या चर्च च्या अंतर्गत भागात येशुंच्या जीवनातील अनेक प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत.
विरणपुझा बॅकवॉटर
वेंबनाड सरोवराचा भाग असलेला हा तलाव नौकानयनासाठी उत्तम ठिकाण आहे.या लेकमधील हाउस बोटीत राहण्याची सोय आहे.दोन्ही बाजूला हिरव्यागार भातशेती मुळे हा परिसर जणू पाचू चे बेट असल्यासारखे वाटते.
कथकली केंद्र कोची
फोर्ट कोची मधील कथकली केंद्र पाहण्यासारखे ठिकाण आहे.
या केंद्राची वास्तूरचना मालाबार शैली मधील आहे. देश-विदेशातील पर्यटक केरळ पर्यटना वेळी कोची मधील कथकली केंद्राला जरूर भेट देतात.
कथकली नृत्य प्रकारा बरोबरच भरतनाट्यम,कुचीपुडी,मोहिनीअटम या नृत्य प्रकारचे सादरीकरण केले जाते तसेच कलारीपायत्तू या पारंपारिक युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. कथकली केंद्रा मध्ये पारंपारिक केरळी वाद्ये पाहता येतात.
एम.जी.रोड
कोची मधील प्रसिध्द महात्मा गांधी रोड एम.जी.रोड म्हणूनही ओळखला जातो.कोची मधील प्रमुख व्यापारी पेठ या रोड वर आहे.पर्यटकांच्या गरजेच्या सर्व वस्तू मिळतात.सायंकाळच्या वेळी खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी इथे होते.
सेंट फ्रान्सिस चर्च
पोर्तुगीज वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले सेंट फ्रान्सिस चर्च कोची मधील सुंदर चर्च आहे.
वास्को-द-गामा यांचे पार्थिव शरीर याच ठिकाणी दफन करण्यात आले होते.वास्को-द-गामा यांच्या भारत शोधाची माहिती व त्यांनी वापरलेल्या वस्तू या चर्च मध्ये जतन करून ठेवल्या आहेत.
प्रिन्स स्ट्रीट
कोची मधील प्रिन्स स्ट्रीट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.जुन्या शैलीच्या इमारती या रस्त्याच्या बाजूने दिमाखात उभ्या आहेत.
पार्टी करण्यासाठी हे ठिकाण आदर्श आहे, या रोड वर अनेक कॅफे,बार व पब आहेत.डिनर साठी व पार्टी करण्यासाठी पर्यटक या रोड वर येतात.
सनसेट क्रुज कोची
सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या बोटी मध्ये अगर लहान बोटी मध्ये बसून सनसेट क्रुज करणे हे पर्यटकाद्वारा आवर्जून केले जाते.
बीच च्या सोबतीने बोटीमध्ये बसून मरीन ड्राईव्ह चा फेरफटका मारत,चायना फिशिंग नेट वापरून केली जाणारी मासेमारी पाहता येते.अविस्मरणीय असा सूर्यास्त अनुभव कोची मधील सनसेट क्रुज वेळी घेता येतो.
अरीकल धबधबा कोची
कोची शहरा पासून ३५ कि.मी.अंतरावर असलेला अरीकल धबधबा पर्यटक आवर्जून पाहतात.रबर झाडाच्या लागवडी मुळे हा परिसर हिरवागार दिसतो व धबधब्याच्या जलकणांमुळे वातावरण शीतल होते. मान्सून काळात या धबधब्याला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.
लुलू मॉल कोची
कोची मधील लुलू मॉल हा आशिया खंडातील सर्वात मोठा मॉल मानला जातो.१७ एकर जागेमध्ये हा मॉल पसरलेला असून कोची मधील पर्यटकांद्वारा सर्वाधिक भेट दिले जाणारे ठिकाण आहे.चार मजली मॉल मध्ये शॉपिंग,फूड कोर्ट,मल्टीप्लेक्स,गेमिंग झोन अशा अनेक सुविधा आहेत.
**आवर्जून करा**
दक्षिण भारतीय पदार्थ अतिशय उत्तम व वाजवी दरात उपलब्ध असतात.कप्पा,इल्याम काप्पायाम,कप्पा बोटी,काल्युमकाय,अप्पम,केरला बिर्याणी,केरला चिकन करी,केरला फिश करी,फिश मोली,केरला थाली,पुत्तू कादाला हे काही असे पदार्थ आहेत जे आवर्जून खाल्ले पाहिजेत.
कधी जाल:-
भारतातील प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची वर्षभर कोची ला पसंती असते. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कोची पर्यटनासाठी योग्य कालावधी आहे.
कसे जाल:-
विमान सेवा:-
कोची येथे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देश-विदेशातील प्रमुख शहरातून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.महाराष्ट्रातून मुंबई,पुणे,नागपूर येथून कोची साठी थेट विमानसेवा सुरु असते.
रेल्वे सेवा:-
एर्नाकुलम येथे एर्नाकुलम स्टेशन व एर्नाकुलम जंक्शन ही दोन रेल्वेस्टेशन आहेत.मुंबई,पुणे येथून एर्नाकुलम साठी नियमित रेल्वे सेवा चालू असते.
रस्ता सेवा:-
सेलम-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्र.४७ हा कोची मधून जातो.
राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ हा मुंबई,गोवा,मंगलोर,कोझिकोडे यांना कोची शी जोडतो.
कोची शहरामध्ये सार्वजनिक बस सेवा,मेट्रो सेवा व बोट सेवा उत्तम आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा