नागालँड राज्य पूर्वेला म्यानमार, पश्चिमेला व उत्तरेला आसाम, ईशान्येला अरुणाचल आणि दक्षिणेकडून मणिपूरने वेढलेलं आहे. हा बहुतांश डोंगराळ भाग आहे.
नागालँडची राजधानी कोहिमा येथील किस्मा गावात 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'चं आयोजन केलं जातं. भारतातून व परदेशातून बरीच रसिक मंडळी या महोत्सवाला हजेरी लावतात.
हॉर्नबिल फेस्टिव्हल
हॉर्नबिल पक्षी आता नागालँडमधून नष्ट व्हायला लागले आहेत. महाराष्ट्रात 'धनेश' या नावानं संबोधला जाणारा हा पक्षी कोकणात व महाराष्ट्रातल्या काही भागात आढळतो. हॉर्नबिलची शिंगासारखी चोच आणि काळी-पांढरी लांबलचक पिसं यांना नागा संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हॉर्नबिलची चोच आणि पिसं वापरून केलेली टोपी म्हणजे समृद्धीचं व खानदानीपणाचं प्रतीक समजलं जातं. ही टोपी लग्नात वराला आवर्जून भेट दिली जात असे.
पूर्वीच्या काळी 'हेड हंटिंग'च्या लढाईतल्या शूरवीरांचं पारितोषिक ही टोपीच असायची. या कारणामुळे या पक्ष्यांची बेसुमार शिकार व्हायला लागली, त्यामुळे हॉर्नबिलची संख्या घटू लागली. आता या पक्ष्याच्या शिकारीवर बंदी आहे, त्याचं प्रतीक म्हणून या महोत्सवाला 'हॉर्नबिल फेस्टिव्हल' हे नाव देण्यात आलंय.
दहा दिवस इथलं वातावरण भारून टाकणारं असतं. नागा तरुण-तरुणींची जोशपूर्ण नृत्य आणि गीतं, त्यांचे पारंपरिक रंगीबेरंगी पोशाख, त्यांनी अंगावर परिधान केलेल्या विविधरंगी मण्यांच्या माळा, कर्णफुलं व इतर अलंकार त्यांच्या सुदृढ शरीरावर शोभून दिसतात.
नागा तरुणांच्या हातातील तीक्ष्ण भाला आकर्षकरीत्या सजवलेला असतो. त्यांच्या नृत्याची लय, ठेका आपल्यालाही ताल धरायला लावतो. अतिशय सुंदर अशा नागा तरुणी व दणकट शरीरयष्टीचे तरुण आपलं लक्ष वेधून घेतात. या तरुणांची सामूहिक नृत्यं कॅमेरात कैद करण्याची जणू चढाओढच प्रेक्षकांमधे लागलेली दिसते.
नागालँडमधे सपाट भूभाग फार कमी प्रमाणात आढळतो. खास या महोत्सवासाठी तिथे स्टेडियम उभारलं आहे; तसंच राज्य सरकारने डोंगरउताराचा कल्पकतेनं वापर करून नागालँडमधील पारंपरिक चालीरीती व प्रथा यांचं सांगोपांग दर्शन घडवणारं कायमस्वरूपी 'आदर्श खेडं (हेरिटेज व्हिलेज)' उभारलं आहे. या संकुलात प्रवेश करतानाच बांबूंच्या साह्याने उभारलेली अनेक दुकानं नजरेस पडतात. त्यामध्ये स्थानिक कलाकृती व पारंपरिक खाद्यपदार्थ मिळतात.
नागा जमातीची निरनिराळ्या पारंपरिक बांधणीची घरं येथे दिसतात. प्रत्येक जमातीच्या घरावर त्या-त्या जनजातीचं मानचिन्ह; तसंच दैनंदिन वापरातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही ठेवलेल्या असतात. या घरांच्या बांधकामात बांबू, वेत, गवत, लाकूड, माती आणि दगड अशा स्थानिक नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. मनुष्य, वाघ, हत्ती, हॉर्नबिल पक्षी, अजगर, मिथुन इत्यादी प्राण्यांची डोकी कोरून; तसंच निरनिराळ्या आकृत्या काढून घरांचे दरवाजे, तुळया व खांब शृंगारलेले असतात.
आजूबाजूच्या उंचसखल भागात १६ नागा जमातींच्या झोपड्या उभारलेल्या असतात. प्रत्येक झोपडीचं वेगळं वैशिष्ट्य असतं, त्यातून प्रत्येक जमातीचं वेगळेपण नजरेत भरतं. त्यात त्यांची खाद्यसंकृती, वापरातील भांडी, धान्य साठवण्याची व मांस सुकवण्याची पद्धत या साऱ्या गोष्टी त्यांच्या घरांमधे मांडलेल्या आढळतात. त्याचबरोबर त्यांच्या पारंपरिक पदार्थांची चवही आपल्याला चाखता येते.
तांदळापासून बनवलेली 'राइस बिअर' हे इथलं स्थानिक पेय अतिशय लोकप्रिय आहे. महोत्सवादरम्यान दररोज वेगवेगळ्या जमातीचे लोक आपली कला सादर करतात आणि मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून गाणी गात पाहुण्यांचं हसतमुखानं स्वागत करतात.
हॉर्नबिल महोत्सवात नागालँडमधल्या सगळ्या १६ नागा जमातींमधील उच्चशिक्षित तरुण-तरुणींपासून अगदी वयस्क नागाही उत्साहाने भाग घेतात. त्यांचा उत्साह व ऊर्जा त्यांच्या नृत्यातून व गीतातून दिसून येते. त्यांचे वेगवेगळे पेहराव, दागिने, हातातील भाले व इतर शस्त्र यामुळे नागा पुरुष अत्यंत रुबाबदार दिसतात. हॉर्नबिल पक्षाच्या पिसांची टोपी स्त्रिया व पुरुषांच्या डोक्यावर खुलून दिसते.
नागांचं हास्य व मोकळेपणा त्यांच्या वागण्यातून जागोजागी दिसून येतो. नागा परंपरेनं कलाप्रेमी आहेत. स्वतःच्या घराच्या बांधकामापासून ते कलाकुसरीपर्यंत सर्व कामं ते स्वतः करतात. आपले कपडे, जाकिटे व शाली स्त्रिया स्वतःच विणतात. प्रत्येक नागा जमातीत वेगवेगळ्या नक्षीचे व रंगांचे कपडे वापरले जातात. पुरातन काळापासून चालत आलेली कला व हस्तकौशल्य या नागांनी आजही जतन केलं आहे.
नागांच्या खेड्यांची प्रवेशद्वारं व घरांचे खांब यांवरील कलाकुसरीवरून त्यांची कलात्मक दृष्टी व कलासक्ततेची पूर्णपणे प्रचिती येते. असं म्हणतात, 'नागांचं जीवन बांबूच्या पाळण्यात सुरू होतं आणि बांबूच्याच शवपेटीत त्यांच्या आयुष्याचा शेवट होतो.' वेत आणि बांबूचा उपयोग करून विविध वस्तू ते तयार करतात. अलीकडे वेताचं फर्निचर बनवून ते देशभरात पाठवलं जातं
नागा खेडी पर्वताच्या टेकड्यांवर वसलेली आहेत. गावाच्या मध्यभागी 'सहनिवास (मोरांग)' बांधलेला असतो. या मोरांगमधे पुरुष राहतात, काही ठिकाणी मुलींसाठीही मोरांग बांधलेले आहेत. या मोरांगमधे मुला-मुलींना पारंपरिक लोकसंगीत व नृत्याचं प्रशिक्षण दिलं जातं; तसंच लोककथाही ऐकवल्या जातात.
पुरुष शस्त्रं चालवायला शिकतात. जमातीतील एकमेकांतील झगड्यांचा निर्णय इथेच केला जातो. खेड्यात होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना बोलावण्यासाठी झाडांची मोठाली खोडं कोरून बनवलेले नगारे मोरांगच्या बाहेर ठेवलेले असतात. ते वाजवून लोकांना एकत्र बोलावलं जातं. हे स्वतंत्र घर गावाजवळच एका उंचवट्यावर बांधलेलं असतं. कारण येथून लांबवरचं दिसावं आणि शत्रू आला तर समजावं.
पूर्वीच्या काळी दोन जमातींमधे युद्ध होत असत. काही नागा जमाती या 'हेड हंटिंग'साठी प्रसिद्ध होत्या. आजही जुनी नागा मंडळी त्या थरारक आठवणी सांगतात. नागालँडमधे शेतीसाठी जमीन कमी असल्यामुळे, ती मिळवण्यासाठी ही युद्धे होत असत.
कधी जाल:-
इथल्या टेकड्या वर्षभर हिरव्यागार असतात. त्यात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. इथली गावं उंचच उंच पर्वतांच्या कुशीत धुक्याच्या दुलईत लपेटलेली आहेत. त्यामुळे बहुतांश भागात हवा वर्षभर थंड व आल्हाददायक असते.
ऑक्टोबर ते जून हा पर्यटनासाठी सर्वोत्तम हंगाम आहे. या सुरेख वातावरणामुळे ब्रिटिश या भागाला 'पूर्वेकडील स्वित्झर्लंड' म्हणू लागले. इथे सायंकाळी पाच वाजता सूर्यास्त होतो व सर्व व्यवहार हळूहळू ठप्प होतात, तर सकाळी साडेचार-पाचच्या दरम्यान सूर्योदय होऊन दैनंदिन जीवन सुरू होतं.
हॉर्नबिल फेस्टिव्हलला कसे जायचे
रस्ता सेवा:-
हॉर्नबिल फेस्टिव्हलसाठी नागा हेरिटेज व्हिलेजची सहल हा एक संस्मरणीय अनुभव असू शकतो. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू येथून येणाऱ्या पर्यटकांना गावात पोहोचण्यासाठी अनुक्रमे 2,200, 3,100, 1,300 आणि 3,200 किमीचा प्रवास करावा लागतो.
रेल्वे सेवा:-
हेरिटेज व्हिलेजला जाण्यासाठी दिमापूर रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. स्टेशनपासून, उत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी बस किंवा टॅक्सीने आणखी 80 किमी प्रवास करावा लागतो.
कोलकाता आणि गुवाहाटी येथून दिमापूर रेल्वे स्थानकासाठी नियमित आणि वारंवार गाड्या आहेत.
विमान सेवा:-
दिमापूर हे राज्यातील एकमेव विमानतळ आहे जे हेरिटेज गावापासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे. विमानतळाच्या बाहेर येताना, पर्यटक उर्वरित अंतर कापण्यासाठी टॅक्सी किंवा बसने जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी, गुवाहाटी येथे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा