ऐहोळे हे गावाचे नाव ‘अय्या वोळे’शी संबंधित असल्याचे मानले जाते. कोणे एके काळी या भूमीत ज्ञानी-विद्वानांची वस्ती होती. त्यामुळे या गावाला आर्यकुळाचा लौकिक प्राप्त झाला होता. पुराणकथेनुसार परशुरामाने रक्ताने माखलेला आपला परशू मलप्रभा नदीत धुतला, तेव्हा नदीचे पाणी लाल भडक झाले. ते पाहून नदीवर आलेल्या स्त्रियांनी ‘ऐ... होळे... ऐ... होळे...’ असे आश्चर्योद्गार काढले. तेव्हापासून गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
ऐहोळे येथे प्रामुख्याने लाडखान मंदिर, हुचप्पायगुडी मंदिर, दुर्गा मंदिर, मेगुति जैन मंदिर, रावणपडी गुंफा मंदिर, गौडा मंदिर, सूर्यनारायण मंदिर व संग्रहालय आणि कलादालन बघण्यासारखे आहे. ऐहोळे ही चालुक्यांची पहिली राजधानी होती. मलप्रभा नदीच्या पश्चिमेस ऐहोळे, तर पूर्वेकडे पट्टाडक्कल आहे.
ऐहोळेमध्ये चालुक्यकालीन सुमारे १२५ मंदिरे आहेत. सहाव्या शतकात पहिले मंदिर बांधले गेले. ‘बदामी चालुक्य’ हे राजघराणे कला व संस्कृतीचे चाहते होते. त्यांनी एकापेक्षा एक सुंदर मंदिरे उभारली. त्यामुळे ऐहोळे वेगळेपणामुळे ठळकपणाने लक्षात राहते. चालुक्य राज्यकर्त्यांनी ऐहोळे हे वास्तुकलेचे सर्वोत्तम केंद्र बनवले. आज भारताच्या गौरवमयी इतिहासातील हे सोनेरी पान आहे.
रावणपडी गुंफा मंदिर
नैर्ऋत्य बाजूला तोंड असलेली गुंफा एका विशाल चबुतऱ्यावर असून, अनेक पायऱ्या चढून जावे लागते. महादेवाचे मंदिर असल्याने नंदी हवाच.
येथे नटराज गणेश, कुबेर, वराह यांची शिल्पे पाहायला मिळतात. हॉलमधील छतावर सुंदर नक्षीकाम केले आहे. ही गुंफा वेरूळसदृश आहे.
दुर्गा मंदिर
दुर्गा मंदिरात दुर्गेचे शिल्प असले, तरी हे मंदिर विष्णू किंवा शिव यांना समर्पित आहे. किल्ल्याच्या तटबंदीसारखे असलेले दुर्गमंदिर (दुर्गा मंदिर) हे ऐहोळे येथील एक मुख्य आकर्षण आहे. हे मंदिर सातव्या व आठव्या शतकादरम्यान चालुक्य राजवंशाने बांधले होते. मंदिराची वास्तुकला मुख्यतः द्रविडी असून, नागारा शैलीदेखील काही ठिकाणी वापरलेली दिसून येते. मराठा शैलीतील तटबंदी या मंदिराभोवती केलेली दिसून येते. देवळातील भिंती, तसेच खांब सुंदर शिल्पांनी नटलेले आहेत.
योगिनारायण ग्रुप
गौरी मंदिराच्या जवळील या मंदिरसमूहात चार जैन मंदिरे आहेत. ही मंदिरे साधारणतः ११व्या शतकातील कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत बांधली गेली. पाच फण्यांच्या नागाचे छत्र असलेली पार्श्वनाथाची मूर्ती, तसेच महावीरांची मूर्तीही येथे पाहायला मिळते.
कुंतीगुडी मंदिर समूह
या मंदिरसमूहात चार मंदिरे आहेत. ते ऐहोळे येथील मार्केट मार्गाच्या मध्यभागी वसलेले आहे. हे सहाव्या शतकातील मंदिर आहे. मिशेल यांच्या मते ते आठव्या शतकातील असावे. मुख्य मंदिर वैष्णव, शैव आणि शक्तिवादी परंपरेला धरून आहे. शिव-पार्वती-विष्णू- लक्ष्मी यांची शिल्पे येथे आहेत. विष्णूचा अवतार नरसिंह, अर्धनारीश्वर, नटराज, गजलक्ष्मी, गणेश, शिव, मोती यज्ञोपवीत, शिव, वैदिक देव अग्नी, इंद्र, कुबेर, इशाना, वायू आणि इतर शिल्पेही येथे आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरसमूह
या समूहात पाच हिंदू मंदिरे आहेत. या गटाचे मुख्य मंदिर दक्षिण दिशेला एका मोठ्या चबुतऱ्यावर आहे. पूर्व आणि पश्चिमेला देसीयार मंदिर आणि रचिगुडी मंदिर ही दोन मंदिरे आहेत.
गळगनाथ मंदिरसमूह
या समूहात मलप्रभा नदीच्या काठावरील सुमारे तीस मध्ययुगीन मंदिरे आहेत. गळगनाथ मंदिरे सातव्या आणि बाराव्या शतकातील आहेत. दुर्गा, हरिहर, महेश्वरी, सप्तमात्रिक, पौराणिक मकार, पाने आणि फुले, पक्षी आणि इतर अनेक प्रकारच्या शैलींचा समावेश आहे.
वेनियार मंदिरसमूह
या समूहात त्यात दहा मंदिरे आहेत. ही मंदिरे गावाच्या दक्षिणेस रामलिंगा मंदिराजवळील नदीच्या जवळ आहेत. ही मंदिरे ११व्या शतकातील असून, भग्नावस्थेत आहेत.
रामलिंग मंदिरसमूह
याला रामलिंगेश्वर मंदिर असेदेखील म्हटले जाते. हे पाच मंदिरांचे संकुल मलप्रभा नदीच्या काठावर आहे. दुर्गा मंदिर परिसराच्या दक्षिणेला सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर हा समूह आहे. हे प्रामुख्याने शिवसमर्पित मंदिर आहे. येथे रथोत्सव साजरा केला जातो.
मल्लिकार्जुन मंदिरसमूह
मल्लिकार्जुन मंदिर परिसरात पाच मंदिरे आहेत. साधारण सातव्या शतकात याची निर्मिती झाली.
ज्योतिर्लिंग मंदिर समूह
हा १६ मंदिरांचा समूह आहे. यात शिवाबरोबरच गणेश, कार्तिकेय, पार्वती यांच्या प्रतिमाही आहेत.
अंबिरगुंडी मंदिरसमूह
यात तीन मंदिरांचा समावेश आहे. अंबिरगुंडी मंदिरसमूह पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजला जातो. यातील दोन मंदिरे सहाव्या व सातव्या शतकातील असावीत, तर तिसरे कल्याणी चालुक्यांच्या काळातील अकराव्या शतकांतील असावे.
बुद्ध मंदिर
मेगुटी टेकडीवर ऐहोळेमधील एकमेव बौद्ध स्मारक आहे. येथे एक बुद्ध प्रतिमा असून, हे दोन मजली मंदिर आहे, साधारण सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात याचे काम झाले असावे.
राहायची सोय:-
ऐहोळे राहण्याची सुविधा अत्यंत कमी उपलब्ध असून बदामी हाच पर्याय आहे.बदामीमध्ये हॉटेल्सचे मर्यादित पर्यायच मिळू शकतात. होम स्टेचे काही पर्याय आहेत.
केव्हा जावे:
मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते.पाऊस इकडे फार पडत नाही .
रेल्वे मार्ग:
एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी जाते.होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हंपी आहे .
काही उपयुक्त रेल्वे :
(१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस .
(२) मिरज हुबळी एक्सप्रेस रोज
(३)हुबळी ते मुंबईसाठी
चालुक्य ए ११००६ /११०२२ ,
शरावती एक्स ११०३६ ,
शिवाय १७३१७ /०६५११ आहेत .
रस्त्याने: सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बेळगाव, येथून बस सेवा उपलब्ध आहेत.
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा