साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नरसिंह वाडी मंदिर, शिलाहार राजांच्या काळातील प्राचीन असे खिद्रापूर मंदिर यासह अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
कोल्हापूरची ओळख छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्ती पंढरी, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, रंकाळा तलाव व खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटणारा तांबडा पांढरा रस्सा अशी आहे यामुळे पर्यटक दरवर्षी कोल्हापूरला भेट देतात.
कोल्हापूरची खाद्यसंस्कृती:-
कोल्हापूर हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणून मिसळ ला ओळखले जाते. कोल्हापूरची मिसळ ही अत्यंत चटकदार व रुचकर मानली जाते. तसेच कोल्हापूरची भेळही प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर हे नाव घेतले असता मांसाहारी पदार्थ डोळ्यासमोर येतात. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा व सुके मटण, यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर या शहराची ओळख धारोष्ण दुधासाठी केली जाते. कोल्हापूर मध्ये अनेक दूध कट्टे असून ग्राहका समोरच काढण्यात येणारे म्हशीचे धारोष्ण दूध पिण्यासाठी दूध कट्ट्यावर पहाटेपासून लोक गर्दी करतात.
कोल्हापूरचा पिवळा धमक गुळ व कोल्हापुरी मसाले हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. भारतातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये व्हेज कोल्हापुरी व कोल्हापुरी चिकन मिळत
पर्यटन स्थळे:-
पन्हाळा किल्ला
मोठ्या किल्ल्यांपैकी एक म्हणून पन्हाळा किल्ला ओळखला जातो. सह्याद्री पर्वत रांगा मध्ये असलेला किल्ला सात किलोमीटर लांबीच्या तटबंदी ने वेढलेला असून या किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. पन्हाळा किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकाच्या शेवटी भोजराजा यांनी केली असे मानले जाते. पन्हाळा किल्ल्यामध्ये अनेक प्राचीन वास्तु व रचना पाहायला मिळतात. या किल्ल्यावर अनेक शासकांनी राज्य केले. आजही या किल्ल्याची तटबंदी व आतील वास्तू सुस्थितीत आहेत.
महालक्ष्मी मंदिर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे प्राचीन असे हेमाडपंथी वास्तु रचनेचे काळ्याभोर दगडातील मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. हे मंदिर भाविकांसाठी सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत खुले असते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना व घंटा आहे. तसेच मंदिर परिसरातील अनेक दगडी चौथरे व त्यावरील कोरीवकाम प्रेक्षणीय आहे .
नवरात्रीच्या काळातील या मंदिराची रोषणाई अत्यंत अप्रतिम असते. किरणोत्सव हा या मंदिराचा प्रमुख उत्सव मानला जातो. करवीरनिवासिनी अंबाबाई चे मंदिर कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. रिक्षा व सिटी बसच्या द्वारे आपण मंदिरापर्यंत सहज जाऊ शकतो.
रंकाळा तलाव
महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेला रंकाळा तलाव आहे. सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी व करमणुकीसाठी हा तलाव लोकप्रिय आहे. रंकाळा तलाव छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला असून या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. रंकाळ्याच्या पश्चिम बाजूला शालिनी पॅलेस हे महाराष्ट्रातील तारांकित हॉटेल आहे. पूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर मधील रंकाळा तलाव परिसरांमध्ये होत असे.
दख्खनचा राजा
दख्खनचा राजा असा लौकिक असणारे कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्थान आहे. डोंगरावर असलेले हे स्थळ वाडी रत्नागिरी म्हणून हे स्थळ प्रसिद्ध असून येथे श्री ज्योतिबा देवाचे हेमाडपंथी काळ्या दगडातील मंदिर प्रसिद्ध आहे. या मन्दिराबरोबरच येथील केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग ही मंदिरेही प्रसिद्ध आहेत.ज्योतिबाच्या सासन काठ्या प्रसिद्ध आहेत. या मंदिरामध्ये पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. ज्योतिबा मंदिर कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.
नृसिंहवाडी मंदिर
जिल्ह्यातील नरसोबाची वाडी दत्ताची वाडी म्हणूनही ओळखली जाते. शिरोळ तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर असणारे श्री दत्ताचे पाचशे ते आठशे वर्षाचे पुरातन असे हे श्री नरसिंह सरस्वती यांचे या ठिकाणी तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते.
त्यांना श्री दत्ताचा अवतार मानले जात असे. या मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रात आहेत. नरसिंह वाडी हे कोल्हापूरपासून साठ किलोमीटर अंतरावर असून कोल्हापूर मधून राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बसेस नृसिंहवाडी मिळतात.
श्री क्षेत्र बाहुबली
जिल्ह्यातील बाहुबली हे तीर्थक्षेत्र अत्यंत प्रसिद्ध असून जैन धर्मातील पवित्र तीर्थस्थळ म्हणून याचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी भगवान श्री बाहुबली यांची 28 फुटी संगमरवरी भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते.
तसेच या मूर्ती सभोवताली जैन धर्मातील तीर्थंकरां ची लहान लहान चोवीस मंदिरे आहेत. दर बारा वर्षातून एकदा या ठिकाणी श्री बाहुबली यांचा महामस्तकाभिषेक होतो. बाहुबली या ठिकाणी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण दिले जाते. हा परिसर कमालीचा स्वच्छ व निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या मंदिराच्या जवळच दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे. बाहुबली जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून मैसूरचे वृंदावन गार्डन च्या धरतीवर संगीत कारंजे इथे पाहायला मिळतात.
दाजीपुर अभयारण्य
निसर्ग व पर्यावरण प्रेमींसाठी कोल्हापूरचे दाजीपुर अभयारण्य खूप खास आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या काळात शिकारी साठी प्रसिद्ध असणारे हे जंगल सन १९८५ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.
या अभयारण्यात वाघ, बिबट्या, रानगवा, चित्ता, अस्वल,हरीण असे अनेक जंगली प्राणी पाहता येतात. या अभयारण्यामध्ये जंगली गवा हा प्राणी मोठ्या संख्येने आढळतो म्हणून याला गवा अभयारण्य म्हणून ओळखले जाते.
गगन बावडा
पंचावन्न किलोमीटर अंतरावरील गगनबावडा हे पश्चिम घाट व कोकणाच्या दरम्यान असणारे एक महत्त्वाचे स्थळ आहे. ब्रिटिश काळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारा गगनबावडा निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांची साठी प्रसिद्ध आहे.
कोकणामध्ये उतरणारे कुरुळ घाट आणि भुईबावडा घाट हे प्रसिद्ध आहेत. तसेच या शहरांमध्ये अनेक मंदिरे असून पांडवकालीन गुहा आहेत.
रामतीर्थ धबधबा
आजरा तालुक्यामध्ये असणारा रामतीर्थ धबधबा अत्यंत प्रसिद्ध आहे. हिरण्यकेशी नदी वर असणारा हा धबधबा नैसर्गिक धबधबा असून शांत आणि सुंदर निसर्गा साठी प्रसिद्ध आहे.
कणेरी मठ
कोल्हापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक व ग्रामीण जीवनाची झलक पाहण्यासाठी पर्यटक कणेरी येथील सिद्धगिरी संग्रहालयाला भेट देतात. या संग्रहालयामध्ये प्राचीन ग्रामीण जीवनाची झलक पाहता येते. सात एकरामध्ये पसरलेल्या या संग्रहालयामध्ये अनेक ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे देखावे आहेत.
भवानी मंडप
कोल्हापूर शहरामध्ये असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असणारा भवानी मंडप छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या काळातील दरबार आणि महालाचा एक भाग होता. भवानी मंडप हा आता स्मारक म्हणून घोषित केला आहे. या मंडपामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती,त्यांचे लाकडी सिंहासन इत्यादी गोष्टी या ठिकाणी पाहता येतात.
न्यू पॅलेस
न्यू पॅलेस ही भवानी मंडप कसबा बावडा मार्गावरील इमारत पर्यटकांचे मन वेधून घेते आठ कोण असणाऱ्या असणारी ही इमारत असून या इमारती भोवती बुरुज आहेत या ठिकाणी प्राणीसंग्रहालय व भाग असून न्यू पॅलेस च्या आतील भागात छत्रपती शाहू महाराजांच्या वस्तू संग्रालय रूपात जपून ठेवलेले आहेत .
खिद्रापूरचे कोपेश्वर
शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशिचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून मंदिराला घोषित केला आहे.
विशाळगड, पारगड
कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चोहोबाजूने मोठे खंदक आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे. चिरेबंदी पायऱ्या, डोंगरदऱ्या, हिरवीगर्द झाडी, निरव शांतता या परिसराचे वैशिष्टय आहे.
टाऊन हॉल म्युझियम
कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय आहे. या ठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती आहेत . बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत.
शालिनी पॅलेस
कोल्हापुरातील रमणीय रंकाळा तलावाच्या काठावरील शालिनी पॅलेस म्हणजे कोल्हापुरातील भव्य खुण. छत्रपती शहाजी द्वितीय पूर महाराज आणि राणी प्रमिला राजे यांची कन्या राजकन्या श्रीमंत शालिनी राजे यांच्यानंतर या वारसा रचनेला नाव देण्यात आले आहे. हि भव्य इमारत बागांसह १२ एकरांत पसरलेलीआहे आणि १९३१ ते १९३४ दरम्यान या इमारतीचे बांधकाम केलेले आहे .
काळा दगड आणि इटालियन संगमरवरी इमारतीला काचेच्या कमानी, लाकडी दारे आणि खिडक्या, एक प्रचंड घड्याळ असलेला मनोरा, बेल्जियमची काच इत्यादींनी सुशोभित केलेले हे १९८७ मध्ये त्रितारांकित हॉटेलमध्ये रुपांतरित झालेले महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव हेरिटेज आलिशान हॉटेल बनले.
थंड हवेची ठिकाणे
शाहूवाडी तालुक्यातील आंबा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आंबा घाट, जंगल, जैव विविधता, औषधी वनस्पती, अधिक पावसाचा भाग, झरे, धबधबे, प्रसन्न वातावरण हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच ऋतुत भेट देण्यासारखे ठिकाण आहे. कोल्हापूरपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे.
आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर रामतीर्थ धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. त्यासह विविध ठिकाणी छोटी छोटी वास्तुकलेची मंदिरे आहेत. कोल्हापूरपासून ८५ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
काय खरेदी कराल
कोल्हापूरला आलेले पर्यटक कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी गुळा बरोबरच कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी लवंगी मिरची, चपलाहार, लक्ष्मीहार यांचीही खरेदी करतात. कोल्हापूरचे गांधी मार्केट कापड साठी प्रसिध्द आहे.
कालावधी :- जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना वर्षभरात कधीही कोल्हापूरची भटकंती करता येते.
कसे जाल:-
विमान:-
येथे विमानतळ असून कोल्हापूर साठी नियमित विमानसेवा उपलब्ध नाही.कोल्हापूर साठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गोवा राज्यातील दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून पुणे विमानतळ कोल्हापूर पासून दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर तर गोवा विमानतळ कोल्हापूर पासून 221 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे:-
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशनआहे. मुंबई नागपुर पुणे तिरुपती या शहरातून कोल्हापूर साठी दररोज रेल्वेसेवा उपलब्ध आहे.स्टेशन वरून परिसरातील सर्व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी टॅक्सी व खाजगी मोटारी सहज मिळतात.
रस्ता मार्ग:-
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून काही तासांमध्ये या शहराला भेट देता येते. तसेच गोवा, बंगळुरू, हैदराबाद, तिरुपती, नागपूर ,औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी ,सातारा, सांगली या शहरातून कोल्हापूर साठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नियमित मिळतात
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
Sunder 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🙏
हटवाsagli mahiti ektr khupch chhan
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 🙏🙏
हटवा