google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : ओडिसा | Odissa

माझी ब्लॉग सूची

गुरुवार, १७ मार्च, २०२२

ओडिसा | Odissa

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेलं ओडिशा हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते.


रमणीय किनारे, शिल्पसमृद्ध मंदिरे आणि इतिहासाचा वारसा जपणारी धौली, उदयगिरी, खंडगिरीसारखी ठिकाणे, गर्द जंगलात वसलेले कोरापुट, तर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध अशी नंदनकानन, सिमलीपालसारखी अभयारण्ये अशा सर्वच गोष्टींनी संपन्न असलेले हे ओडिशा राज्य. राईस बाउल ऑफ इंडिया अशी प्रौढी मिरवणारा हा प्रदेश. नजर जाईल तिकडे भाताची शेती डोळ्याचे पारणे फेडते.

भारतातल्या मंदिरांचं वैभव अनुभवायचं असेल तर ओडिशाला जायलाच हवं!

* परशुरामेश्वराचं मंदिर हे भुवनेश्वरमधलं सर्वांत जुनं मंदिर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इसवी सन 650 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचा कळस मधाच्या पोळ्याच्या आकाराचा आहे.

* लिंगराज मंदिर हे ओडिशातलं सर्वांत प्रसिद्ध मंदिर. हे हरिहराचं मंदिर आहे. हे मंदिर भुवनेश्वरमधलं सर्वांत मोठं मंदिर आहे. किंबहुना हा मंदिरांचा समूह आहे.

* केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माशी संबंधित ठिकाणंही इथे आहेत. इथल्या उदियगरी आणि खंदिगरी गुंफा प्रसिद्ध आहेत. जैन स्थापत्यशैलीच्या या गुंफा अगदी प्राचीन उदाहरणं आहे.

पर्यटनाच्या नकाशावर अजूनही फारसं ठळक झालं नसल्यानं इथे नेमकं पहायचं काय असा प्रश्नही पडू शकतो. पण भारताच्या पूर्व किना-यावर वसलेलं हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत, नृत्यशैलीसाठी आणि सी फूडसाठीही. 


भुवनेश्वर

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते.असं म्हणतात की सातव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान या शहरामध्ये तब्बल 7000 मंदिरं होती. आज मात्र इथे अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच मंदिरं आहेत.

परशुरामेश्वराचं मंदिर हे भुवनेश्वरमधलं सर्वांत जुनं मंदिर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इसवी सन 650 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचा कळस मधाच्या पोळ्याच्या आकाराचा आहे. मंदिरासमोर विशाल प्रांगण आहे. प्रवेशद्वारावर आठ ग्रह कोरलेले आहेत. नंतरच्या काळात या मालिकेत नववा ग्रहही आला.


सगळी मंदिरे एकमेकांच्या जवळजवळ अशीच आहेत. ओल्ड टाऊन नावाचा जो भाग आहे तिथेच ही प्राचीन मंदिरे पाहता येतील. भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ओडिशा स्थापत्य शैलीतील संक्रमणाची स्थिती दाखवणारी आणि त्या कलेमध्ये बांधलेली मजबूत आणि अत्यंत दिमाखदार मंदिरे या ठिकाणी पाहता येतात.


लिंगराज मंदिर

ओडिशातलं सर्वांत प्रसिद्ध मंदिर. हे हरिहराचं मंदिर आहे. हे मंदिर भुवनेश्वरमधलं सर्वांत मोठं मंदिर आहे. किंबहुना हा मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिराच्या कळसाची उंची तब्बल 55 मीटर एवढी आहे. यावरूनच इथल्या मंदिरांच्या भव्यतेची कल्पना यावी. सध्या आपण जे मंदिर पाहतो, ते अकराव्या शतकातलं आहे. पण मूळ मंदिराच्या उभारणीची सुरूवात ही सहाव्या शतकात झाली. काही संस्कृत ग्रंथातील उल्लेखानुसार ती सातव्या शतकात झाली. कलिंग शैलीतलं हे मंदिर एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे.


 लिंगराज मंदिर म्हणजे या सगळ्याचा मेरुमणी आहे. भव्यदिव्य असे हे मंदिर आपल्याला लांबूनसुद्धा दिसते. त्याला लागूनच असलेले भले मोठ्ठे तळे या परिसराची शोभा अजूनच वाढवते. अत्यंत सुंदर मूर्तिकला आणि ओडिशा स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून हे मंदिर जरूर पाहावे. या अभ्यासकांसाठी तर हे मंदिर म्हणजे पर्वणीच आहे परंतु सामान्यजनांनीसुद्धा मुद्दाम इथे थांबून या मंदिरावर शिल्पांकित केलेली अनेक शिल्पे मनसोक्त पाहून घ्यावीत.

 या मंदिराच्या परिसरात अगदी चालत फिरता येतील अशी बरीच मंदिरे एकामागे एक अशी उभी आहेत. ज्यात अनंत वासुदेव मंदिर, केदारेश्वर मंदिर, वेताळ मंदिर अशी काही नावे घेता येतील. परशुरामेश्वर मंदिर आणि त्याला लागूनच असलेले मुक्तेश्वर मंदिर हे अत्यंत देखणे आणि अत्यंत सुंदर असे म्हणावे लागेल. 


मुक्तेश्वर मंदिरासमोर एक दगडी कमान आहे ज्यातून या परिसरात प्रवेश होतो. मंदिर छोटेखानी आहे पण त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. प्रदक्षिणा मारताना मंदिरावर काही ठिकाणी एक खिडकी आणि त्यातून डोकावणारी एक स्त्री दाखवली आहे. तिच्या खिडकीवर कावळ्यासारखा पक्षी दाखवला आहे. हे मंदिर मात्र अगदी सुंदर आहे. प्रत्येक प्रदेशाला एक समृद्ध भाषा असते आणि त्या भाषेची काही वैशिष्टय़े असतात. 

ओडिशामध्ये कळसाला देऊळ असा शब्द आहे आणि सभामंडपाला जगमोहन. मुख्य गर्भगृहावर असलेल्या कळसाला रेखा देऊळ म्हणतात, तर जगमोहनावर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात. खूप वेगळी आणि आकर्षक अशी ही नावे वाटतात.


बिंदुसागर तलाव


या तलावाशी अनेक दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. तहानलेल्या पार्वतीला पाणी प्यायला मिळावं म्हणून शंकराने जमिनीत त्रिशूळ मारला आणि तिथे एक झरा उत्पन्न झाला. या झ-यातूनच बिंदुसागर तलावाची निर्मिती झाली. 


अनंत वासुदेव मंदिर 

भगवान विष्णुचं हे मंदिर 13 व्या शतकात गंग राजघराण्यातल्या राणी चंद्रिकाने बांधलं. या मंदिराचा जीर्णोद्धार मराठ्यांनी केला. मंदिर विष्णुचं असलं तरी त्याचं स्थापत्य हे बरंचसं लिंगराज मंदिरासारखंच आहे.


अनंत वासुदेव मंदिरामध्ये बनणा-या प्रसादाचंही खास वैशिष्ट्य आहे. मातीच्या भांड्यांमध्ये बनवल्या जाणा-या या प्रसादामध्ये बटाटा किंवा इतर कोणतीही परदेशी भाजी वापरली जात नाही. इतकंच नाही तर त्या त्या मौसमात न पिकणा-या भाज्याही इथल्या प्रसादात वापरत नाहीत. म्हणजे इथला प्रसाद बनवणं किती अवघड काम आहे, याचा विचार करा. केवळ अनंत वासुदेवच नाही, तर ओडिशातल्या अनेक मंदिरात ही पद्धत आहे.केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माशी संबंधित ठिकाणंही इथे आहेत. 

 

उदियगरी आणि खंडगिरी  गुंफा 

जैन स्थापत्यशैलीच्या या गुंफा अगदी प्राचीन उदाहरणं आहे.ही फक्त भुवनेश्वरमधली मंदिरं आहेत.


उदयगिरी व खंड गिरी या गुहा २ हजार वर्षांहूनही अधिक काळापूर्वी (इ. पू. ३००) कलिंग प्रदेशाच्या खारवेल नावाच्या राजाने बांधल्या होत्या. पूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या गुहा जैन धर्माच्या साधूंच्या ध्यानसाधनेसाठी वापरल्या जात.


भुवनेश्वरच्या उत्तरपश्चिम दिशेला सुमारे ८-१० कि. मी. अंतरावर या गुहा स्थित आहेत. यांची उंची जवळ जवळ १३० फूट असून उदयगिरीत ४४ गुहा तर खंड गिरीत १९ गुहा आहेत. राणी गुहा, गणेश गुहा अशी काही प्रमुख गुहांची नावे आहेत.  


कोणार्क सूर्यमंदिर

ओडिशातले सर्वात प्रसिध्द पर्यटनस्थान म्हणायचे झाले तर ते आहे कोणार्क चे सूर्यमंदिर. १३ व्या शताब्दीत राजा लांगुला नरसिंग देव याने बांधलेले हे अप्रतिम मंदिर भारतातल्या अत्यंत प्रेक्षणीय स्थानातील एक ठरेल यात वाद नाही. इथे कुठल्याच देव अथवा देवीची मूर्ती अशी नाहीये. 


संपूर्ण मंदिर सूर्यदेवाच्या भव्य रथाच्या रूपात शिल्पकलेच्या अगम्य आविष्काराने घडवले गेले आहे. याच्या बांधकामाला तब्बल १२ वर्षे तेंव्हा लागली होती. २२८ फूट उंचीचा हा सूर्यरथ सात अश्व व २४ चाकांनी सुसज्ज कोरला गेलेला आहे परंतु काळाच्या ओघात मुख्यत्वेकरून समोरील अश्व व तसेच काही भाग भग्न पावले आहेत. 


चीलिका तलाव 

 हे स्थान पाहण्यात आले. हा भारतातला सर्वात मोठा तलाव असल्याचे नुकतेच कळले. ११०० व. कि. मी. (सिंगापूरच्या दीडपट मोठा) चे आकारमान असलेला हा तलाव म्हणावा का एक भली मोठी नदीच असा प्रश्न मस्तकात डोकवून गेला.


 भुवनेश्वरहून १०५ कि. मी. व पुरीहून १६५ कि. मी. अंतरावर चीलिका तलाव स्थित आहे आणि तो बंगालच्या महासागरास जोडलेला असून यात बरीच लहान लहान बेटे आहेत. मासे फासण्यास कोळी लोकांचे हे आवडते स्थान असून, दूरच्या देशविदेशाहून लांबचे पल्ले पार करून आलेले विविध पक्षीही इथे पाहायला मिळतात व या निसर्गरम्य स्थानास अधिकच रमणीयता प्रदान करून जातात. 


खाऱ्या पाण्याचा हा अथांग जलाशय सरोवर वाटतच नाही. तो एक शांत समुद्रच वाटतो. या जलाशयामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर डॉल्फिन मासे पाहता येतात. बाळूगाव नावाच्या गावी गेल्यावर इथून आपल्याला सरोवरात फेरफटका मारण्यासाठी यांत्रिक बोटी मिळतात. या सरोवरात ६ कि.मी.वर एक छोटेसे बेट असून त्यावर कालीजाई देवीचे मंदिर आहे. किनाऱ्यापासून इथे जायला एक तास लागतो. वाटेत बरेच डॉल्फिन दर्शन देतात. 


बोटीचे भाडे माणशी ५० रुपये किंवा सगळ्या बोटीचे ८०० रुपये असे आहे. अथांग सरोवरात केलेला हा प्रवास खूप रमणीय असतो. बेटावरील देवीचे मंदिर छोटेसे पण आकर्षक आहे. 

खाण्या-पिण्याची आणि विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने तिथे मांडलेली आहेत. साधारण तीन तास या सगळ्या प्रवासासाठी पुरतात. भुवनेश्वर-विजयवाडा या राष्ट्रीय महामार्गावरून होणारा आपला प्रवास फार सुंदर होतो. अर्ध्या दिवसात हा कार्यक्रम उरकता येतो. तिथे ४ तासांची पण बोट राईड आहे.


धौल गिरी 

भुवनेश्वरहून केवळ ८ कि मी अंतरावर असलेले आणखी एक पाहण्याजोगे स्थळ आहे. 


दया नदीच्या तटावर हे ठिकाण स्थित असून येथे १९०० सालच्या सुमारास जपानी उत्खननकारांद्वारे इथे शांतीस्तूपे स्थापित करण्यात आली. याच ठिकाणी कलिंग युद्धात विजयानंतर राजा अशोक याने हजारो शवांना पाहिल्यानंतर स्वतःचे संपूर्ण परिवर्तन घडवून बुद्धधर्माच्या प्रसारास सुरुवात केली असे मानण्यात येते. 


पुरी


 या पावन स्थानास एक खूप लांब असा देखणा समुद्र तट लाभलेला आहे. बंगालच्या महासागराच्या या भागास महादधी असे म्हणतात. या तटावर समुद्र अधिक आक्रमक नसून जास्त करून सौम्य सागर असा मानला जातो. 


महादधीच्या घाटाचे नाव स्वर्गद्वार असे आहे व येथे मृत शवाचा अंतिम संस्कार घडल्यास त्यास मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते. या तटावर पर्यटकांसाठी अनेक हॉटेल स व रिसॉर्टस आहेत. काहींना त्यांचे खाजगी किनारे (private beaches) लाभलेले आहेत. 


मंगलाजोडी पक्षी आश्रयस्थान

चीलिका तलावाच्या उत्तरपूर्व भागात स्थित असेलेले मंगलाजोडी पक्षी आश्रयस्थान (bird sanctuary) हे आणखी एक भेट देण्याजोगे स्थान आहे. 


भुवनेश्वर पासून ७० कि. मी. अंतरावर हे आहे. जवळ जवळ १५० प्रजातींचे पक्षी येथे स्थलांतरात भेट देतात. काही काळापूर्वी इथे पक्षांना गावकऱ्यांकडून पैशासाठी जीवानिशी मारले जायचे परंतु आता हळू हळू हे कमी होत आहे असे समजले. फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी हे ठिकाण नक्कीच आकर्षण ठरेल यात शंका नाही. 


राजा-राणी मंदिर

 हे भुवनेश्वर शहरातच स्थित असून सुमारे १००० वर्षां पूर्वी बांधले गेलेले आहे. पूर्वी हे इंद्रेश्वराचे मंदिर असेही म्हणले जायचे.


 येथील शिल्पकला ही मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिराप्रमाणेच स्त्री-पुरूषां च्या कामक्रीडांसंबंधित छबींची छटा दर्शवून जाते. या मंदिरातही कुठल्या देव वा देवीची मूर्ती अशी नाहीये. भुवनेश्वरातील मोठे संगीत व कलांचे कार्यक्रम सहसा ह्या मंदिराच्या परिसरात आयोजिले जातात. 

 


 रघुराजपूर

कलाकाराचं गाव रघुराजपूर. जगन्नाथपुरी या सुप्रसिद्ध ठिकाणापासून अवघ्या १० कि.मी.वर असलेले हे अत्यंत सुंदर ठिकाण. ओडिशा सरकारने या गावाला ऐतिहासिक वारसा गाव असा दर्जा दिलेला आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचे हे जन्मगाव. या गावात १२० घरं आहेत आणि सगळी मंडळी कलाकार. गावाच्या मधोमध मंदिरांची एक रांग आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या रांगा. 


शिल्पकार, चित्रकार, लाकडावर काम करणारे, रंगकाम करणारे आणि पट्टचित्र हे खास ओडिशाचे वैशिष्टय़ असलेली कला जोपासणारे असे सगळे लोक आहेत. इथे सगळ्या घरांवर बाहेरून सुंदर सुंदर चित्रकला केलेली. घराबाहेर मूर्ती करून ठेवलेल्या असे हे अगदी मनमोहक असे गाव आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे हे गाव. इथे बरेच परदेशी कलाकार शिकायला येतात त्यांची सोय गावाच्या एका टोकाला बांधलेल्या टुमदार बंगलीमध्ये केलेली असते. 


जगन्नाथ मंदिराच्या इतिहासाशी निगडित आणि तेवढीच पुरातन अशी ही कला आहे. उंदराच्या केसांचा ब्रश इथे अगदी बारीक चित्रे काढण्यासाठी मुद्दाम वापरला जातो. काही चित्रे मात्र अगदी हुबेहूब आपल्या वारली चित्रांसारखी दिसतात. साबुदाणा भिजवून त्याचा िडक कापडाला लावून त्यावर कृष्णलीला, रामायण, महाभारत आणि जगन्नाथाची चित्रं अशी अनेक चित्रं इथे काढली जातात. चित्रांमधले रंग सगळे नसíगक असतात. िहगूळ जातीचा दगड आणून त्याची पावडर करतात. त्याचा लाल रंग होतो तो या चित्रांमध्ये वापरला जातो. खरंतर या गावात राहायलाच यायला हवे. धावती भेट देऊन काही समाधान होत नाही. खास करून कलाकार मंडळींनी तर तिथे गेलेच पाहिजे. आपल्याकडे दशावतार असतात तसाच इथे गोट्टीपो नावाचा प्रकार आहे. गुरू मागुणीदास यांनी हा प्रकार इथे रूढ केला. 


ओडिशाचे शनि शिंगणापूर 

भुवनेश्वरपासून १३० किमी अंतरावर केंद्रपाडा या जिल्ह्यातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ५ कि.मी. वर सीरिलिया या गावात एक आश्चर्य दडलेले आहे. या गावात जवळ जवळ ८० घरे असून त्या कोणत्याही घराला दरवाजा नाही. 


गावची देवता खोखराई ठकुरानी हिच्यावर गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा. ही देवीच घराच्या उंबरठय़ावर बसली आहे, त्यामुळे घराला दार कसे लावणार आणि त्यामुळे कुठल्याही घराला दरवाजा नाही. या गावात चोरी होत नाही. पूर्वी कोणी चोरी केली होती तर तो त्या घरातच अडकून पडला. 

 गावच्या एका बाजूला देवीचे मंदिर आहे. मंदिर म्हणजे मूर्ती उघडय़ावरच आहे. परंतु चारही बाजूंनी भिंत बांधली आहे. इथे देवीला नवस बोलताना लाकडाचा किंवा मातीचा घोडा वाहायची पद्धत आहे. मंदिराच्या परिसरात या घोडय़ांच्या असंख्य मूर्ती पाहायला मिळतात. घराला दरवाजे नसण्याची ही पद्धत देशाच्या एका कोपऱ्यातसुद्धा तेवढीच श्रद्धेने पाळली जाते हे खरेच नवल म्हणायला लागेल.  कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो.अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. 

  

नंदनकानन प्राणीसंग्रहालय

नंदनकानन प्राणीसंग्रहालय भुवनेश्वरपासून फक्त १८ कि.मी वर आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे उघडे असते. इथे आत फिरण्यासाठी सफारी आहेत. माणशी ५० रुपये असा सफारीचा दर असून अंदाज १ तासाची फेरी मारून आणतात. 


पांढरा वाघ, सिंह, पट्टेरी वाघ, अस्वले, हरीण, चितळ, सांबर, जिराफ, झेब्रा असे अनेक प्राणी आपल्याला खूप जवळून पाहता येतात.मोकळेपणाने वावरणारे प्राणी पाहता येतात. अस्वले तर पुढचे दोन पाय गाडीला टेकवून आत डोकावून पाहतात. फारच भारी वाटते हे पाहायला. शक्यतो दुपारी ३ वाजता जर इथे गेले तर खूप प्राणी पाहता येतात. कारण ही प्राण्यांना खाणे देण्याची वेळ असते. त्यामुळे इथे प्राण्यांचा वावर खूप मोठय़ा प्रमाणावर असतो. तसेच विविध देशांतून येणारे स्थलांतरित पक्षी इथे दिसतात. खूप मोठय़ा संख्येने मोर इथे आहेत. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे एक छोटेसे दालन इथे केलेले असल्यामुळे त्यांचे दर्शनसुद्धा जवळून आणि नीट होते.

येथील प्राण्यांची संख्या, देखरेख व त्यांच्यातला जिवंतपणा विशेष वाटला. उदाहरणार्थ पांढरे वाघच जवळ जवळ २० ते २५ च्या संख्येत आढळले तर पिवळे वाघही इतर प्राणी संग्रहालयांपेक्षा बरेच अधिक पाहण्यास मिळाले. मुख्य म्हणजे पर्यटक पाहण्यास येतात तेंव्हा ही जनावरे अर्धमेल्या अवस्थेत लोळत पडलेली नसून चांगल्या ताज्यातवान्या अवस्थेत पाहायला मिळतात हे एक विशेष.


प्रसिद्ध पदार्थ:-

ओडिशाला खाण्या-पिण्याचा काही त्रास नाही. सर्व प्रकारचे पदार्थ इथे आता मिळतात. पण भुवनेश्वरमध्ये काही ठिकाणी खास ओडिशा थाळी मिळते ती मुद्दाम चाखून पाहण्याजोगी आहे. सगळीकडे तवा रोटी म्हणजे आपल्या फुलक्यांसारख्या पोळ्या उपलब्ध आहेत. अगदी कोणार्कलासुद्धा असलेल्या हॉटेल्समध्ये आता राजस्थानी, गुजराथी पद्धतीचे जेवण मिळते. इथे अगदी रस्तोरस्ती मिळणारे दहीवडे २० रुपयांत ६ उडदाचे वडे त्यावर दही, चिंचगुळाचे पाणी, पिवळ्या वाटाण्याची उसळ, चाट मसाला आणि बटाटय़ाचा रस्सा असे घालून डिश तयार होते. अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ मुद्दाम खाऊन पाहावा. रस्त्यावर अगदी महामार्गावरसुद्धा सायकलला दोन मोठी तपेली लावलेली दिसतात.  


काय खरेदी कराल:-

कोणार्क-पुरीच्या बाहेरसुद्धा खूप समृद्ध असलेला हा ओडिशा प्रदेश खासकरून पाहण्याजोगा आहे. इथल्या प्रत्येक भागाला स्वत:ची एक ओळख आहे.

कटकमध्ये चांदीच्या तारेपासून केलेले फिलीग्रीचे दागिने विकणारी शेकडो दुकाने आहेत. 

संबळपुरी सिल्क तर जगप्रसिद्ध आहे. महानदीवर बांधलेले हिराकूड धरण. बालासोरचे क्षेपणास्त्र परीक्षण केंद्र आणि कोरापुट, जेपोर, राजगड इथली विपुल वनसंपदा. ओडिशा अगदी सर्वागसुंदर आहे. प्रेमाने, अगत्याने बोलणारी, आपल्या गावचे कौतुक सांगणारी, आपली कला, आपला वारसा याबद्दल अभिमानाने बोलणारी, साधीसुधी प्रेमळ माणसे. अत्यंत निरागस आणि अत्यंत पारदर्शक.


कधी जाल:-

फेब्रुवारी ते ऑक्टोबर हा भेट देण्याचा उत्तम काळ मानला जातो. 


कसे जाल:-

विमान सेवा:-

भुवनेश्वर ही नवी दिल्ली, कोलकाता, विशाखापट्टणम, चेन्नई आणि मुंबई यासारख्या प्रमुख भारतीय शहरांच्या विमानाने चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. भुवनेश्वरला इंडिगो, गो एअर, एअर इंडिया सारख्या सर्व प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांकडून दररोज उड्डाणे आहेत. 

रेल्वे सेवा:-

पुरी हा दक्षिण पूर्व रेल्वेचा शेवटचा बिंदू आहे. पुरी आणि भुवनेश्वर ते कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई आणि देशातील इतर प्रमुख शहरे आणि शहरांमध्ये जलद आणि सुपरफास्ट गाड्या आहेत ज्याद्वारे तुम्ही येथे आल्यानंतर टॅक्सी किंवा बसने कोणार्कला पोहोचू शकता.

रस्ता सेवा:- 

सार्वजनिक वाहतुकीव्यतिरिक्त, खाजगी पर्यटक बस सेवा आणि टॅक्सी देखील पुरी आणि भुवनेश्वर येथून उपलब्ध आहेत.


हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...