उडुपी हे कर्नाटक राज्यातील अरबी समुद्राच्या कडेला असलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे.मंदिरांसाठी प्रसिध्द असलेले उडुपी हे शहर “उडुपी खाद्यसंस्कृती” साठी जगभरात प्रसिध्द आहे.आपण देशभरात अनेक ठिकाणी उडुपी हॉटेल्स पाहतो.
उडुपीचे समुद्रकिनारे कर्नाटक राज्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारे म्हणून ओळखले जातात.त्याच बरोबर उडुपी हे तीर्थक्षेत्र म्हणून ही प्रसिद्ध आहे.उडुपी मध्ये अनेक सुंदर स्थळे व समुद्र किनारे आहेत.
उडुपी मधील पर्यटन स्थळे:-
सेंट मेरी बेट
उडुपीच्या किनार्यापासून समुद्रामध्ये १५ कि.मी. अंतरावर असलेले सेंट मेरी हे बेट उडुपी मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.नारळाच्या झाडांची भरगच्च सावली असलेले हे बेट निळ्याशार सागरात जणू पाचू चे बेट असल्यासारखे दिसते.
वास्को-द-गामा पहिल्यांदा भारताच्या शोधासाठी आला,व कालिकत जवळील कप्पड या ठिकाणी उतरला त्यावेळी त्याने माघारी जाताना मान्सून च्या कालावधीत तीन महिने या बेटावर आश्रय घेतला होता.
या बेटावर दोन अत्यंत सुंदर बीचेस आहेत.बेसाल्ट खडकाचे विविध आकार येथे आढळतात.काळेकभिन्न बेसाल्ट खडक,निळेशार पाणी,सोनेरी रेती व हिरवीगार नारळाची झाडे यामुळे हे बेट खूपच सुंदर दिसते.
उडुपी जवळच्या मालपे बीच वरून सेंट मेरी बेटावर येण्यासाठी बोटींची सोय उपलब्ध असते.तीस मिनिटावर या बेटावर पोहोचू शकतो,या बेटावर मुक्काम करता येत नाही कारण हे निर्मनुष्य बेट आहे.
श्रीकृष्ण मंदिर
उडुपी मधील श्रीकृष्ण मंदिर खूप प्रसिद्ध आहे.उडुपी रेल्वेस्थानका पासून ३ कि.मी.अंतरावर असलेले श्रीकृष्ण मंदिर १३ व्या शतकात वैष्णव संत माधवाचार्य यांनी स्थापन केले.या मंदिरामध्ये सोनेरी रथामधील भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे.या मंदिराचे वैशिष्ठ्य असे आहे की,भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीची पूजा खिडकीमधून केली जाते.या खिडकीला ९ झरोके असून त्यांचा संबंध नवग्रहांशी जोडला जातो.
या ठिकाणी दर वर्षी जानेवारी महिन्यात भगवान श्री कृष्णाचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाचे संपूर्ण आयोजन मठा मार्फत केले जाते.या मंदिराच्या परिसरात चंद्रमौलेश्वर मंदिर व अनंतेश्वर मंदिर असून ही दोन्ही मंदिरे खूप जुनी आहेत.
माल्पे
उडुपी पासून जवळच माल्पे नावाचे गाव असून इथला समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध आहे.स्वर्ण नंदी नदी व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेला समुद्र किनारा सोनेरी रेती असलेला किनारा असून माल्पे बंदर कर्नाटक राज्यातील महत्त्वाचे बंदर मानले जाते.
ताड-माडांची झाडे, निळेशार पाणी असणारा मालपे बीच सुट्टी घालवण्यासाठी आदर्श स्थळ आहे.नौकानयन आणि विविध जलक्रीडा करण्यासाठी माल्पे बीच सुरक्षित मानला जातो.मालपे बीच उडुपी रेल्वे स्टेशन पासून १० कि.मी. अंतरावर आहे.
कोप बीच
उडुपी रेल्वे स्टेशन पासून १६ कि.मी.अंतरावर असणारा कोप बीच पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असणारा बीच आहे.उडुपी ते मंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ पासून जवळच असलेला हा कोप बीच अद्भुत निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.या बीच जवळ उंच खडकावर असलेले १०० फुट उंचीचे लाईटहाउस इथले मुख्य आकर्षण आहे.इंग्रजांच्या काळात उभारण्यात आलेले हे लाईट हाउस आजही कार्यरत असलेला हा लाईट हाउस फोटोग्राफी साठी उत्तम ठिकाण आहे.
कोप मधील मरियम मंदिर आणि प्राचीन किल्ला ही पर्यटन स्थळेही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत.उडुपी पासून जवळच असलेला हा समुद्र किनारा शांत व निसर्गरम्य असून उडूपीला भेट देताना आवर्जून पाहिला पाहिजे.
येल्लूर
कर्नाटक राज्याच्या उडुपी जिल्ह्यातील येल्लूर हे लहानसे गाव भगवान शंकराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून कर्नाटक राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.१००० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे हे मंदिर खूप सुंदर आहे.
या मंदिराची रचना खूप आकर्षक असून द्राविडी शैलीतील बांधकाम असलेल्या या मंदिराच्या दर्शनासाठी व शिल्पकाम अभ्यास करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येल्लूर च्या मंदिराला आवर्जून भेट देतात.
या मंदिराच्या आवारातच एक तलाव असून गंगा नदीचे पाणी या तलावात येते असे मानले जाते.
भगवान गोमटेश्वर
उडुपी पासून ३७ कि.मी.अंतरावर कारकाला येथील भगवान गोमटेश्वर यांचा पुतळा बाहुबली पुतळा म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे.जैन साम्राज्याच्या काळात कारकाला परिसर पांड्या नगरी म्हणून प्रसिद्ध होती.हे स्थळ जैन धर्माचे प्रमुख केंद्र असून भगवान गोमटेश्वर(बाहुबली)यांची ४१.५ फुट उंचीची मूर्ती या ठिकाणी आहे.
१२ वर्षातून एकदा इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो,ज्याला महामस्तकाभिषेक सोहळा असे म्हटले जाते.यावेळी हजारो जैन अनुयायी बाहुबली यांच्या मूर्तीला दुध,केशर,चंदन,हळद,मध इत्यादी सुगंधी द्रव्यांनी स्नान घालतात.
हजारो पर्यटक,भाविक कारकाला या ठिकाणी येऊन बाहुबली यांचे दर्शन घेतात.
कडलू तीर्थ धबधबा
उडुपी पासून ४७ कि.मी. व हेबरी पासून १७ कि.मी.अंतरावर असलेला कडलू तीर्थ धबधबा घनदाट जंगलात असलेला निसर्गरम्य असून सीता धबधबा म्हणूनही ओळखला जातो.
१५० फुट उंची वरून कोसळणारा हा धबधबा अत्यंत मनोहारी असून या धबधब्याखाली सुंदर तलाव तयार झाला असून स्फटिकासारखे स्वच्छ पाणी या ठिकाणी पाहायला मिळते.
या धबधब्याला भेट देण्यासाठी ४ कि.मी.अंतराचे मध्यम स्वरूपाचे ट्रेकिंग करावे लागते.
दर्या बहादूरगड
मालपे बीच पासून दोन कि.मी. समुद्रात असलेला दर्या बहादूरगड हा मालपे बीच जवळील चार मुख्य बेटांपैकी एका बेटावर असलेला एक किल्ला आहे.
बिदनूर च्या बसवप्पा नाईक यांनी बांधलेला हा किल्ला सध्या मोडकळीस आलेला असला तरी इतिहास प्रेमी लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.या किल्यावरुन दिसणारे दृश्य खूप विलोभनीय दिसते.या किल्ल्यावर येण्यासाठी माल्पे बीच वरून बोटी मिळतात.
दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ:-
उडुपी हे दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे.दक्षिण भारतातील इतर ठिकाणा पेक्षा उडुपी येथील खाद्यपदार्थ वे खूप रुचकर व पौष्टिक मानले जातात.
उडुपी खाद्यपदार्थ बनवण्याचा शोध तुळू अष्ट मठ यांनी लावला असे मानले जाते.या खाद्यपदार्था मध्ये उकडीचा भात,सारू किंवा रस्सम,कोसिम्बरी,गोली बजी,हुल्ली,पायस,मेनासकी,परमाना इत्यादी खाद्यपदार्थ प्रमुख
भेट देण्याचा सर्वोत्तम काळ:-
उडुपी हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील स्थळ असल्याने इथले हवामान दमट असते.उडुपी पर्यटनासाठी सर्वोत्तम कालखंड हा नोव्हेंबर ते मार्च हा आहे.उन्हाळ्यात या ठिकाणचे तापमान जास्त असते,तर पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने पर्यटनाला अडचणी निर्माण होतात.
कसे जाल:-
उडुपी हे कर्नाटक राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असल्याने वाहतुकीचे अनेक पर्याय उडूपीला जाण्यासाठी उपलब्ध आहेत.
विमान सेवा:-
उडुपी साठी सर्वात जवळचा विमानतळ मंगलोर या ठिकाणी असून ६० कि.मी.अंतरावर आहे.मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील मुंबई,दिल्ली,कोलकाता,चेन्नई या प्रमुख शहरांशी व आखाती देशांशी हवाई मार्गाने जोडला गेला आहे.
रेल्वे सेवा:-
मुंबई ते मंगलोर या कोकण रेल्वे मार्गावरील उडुपी हे महत्वाचे स्थानक असून मुंबई वरून मंगलोर,एर्नाकुलम च्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे उडुपी स्थानकावर थांबा घेतात.
रस्ता सेवा:-
महाराष्ट्र,गोवा व कर्नाटक राज्यातून उडूपीला जाण्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन (KSRTC) च्या बसेस भरपूर प्रमाणात मिळतात.
मुंबई,पुण्यावरून उडूपीला जाण्यासाठी दररोज बसेस सुटतात.मुंबई पासून उडुपी ८६३ कि.मी.तर पुण्यापासून ७१९ कि.मी.अंतरावर आहे.स्वतः च्या अगर भाड्याच्या वाहनाने सहजपणे उडुपी पर्यटनाला जाऊ शकता.
हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.